जात भारतीयांच्या जणू डीएनएमध्येच असावी इतकी ती आपल्यात भिनली आहे. आपल्या प्रगतीचे पाय खेचते, ती जातीव्यवस्था आपण सोडत तर नाहीच, पण दुसरीकडेसुद्धा प्रस्थापित करू बघतो.
- प्रतिमा जोशी pratimajk@gmail.com
जात भारतीयांच्या जणू डीएनएमध्येच असावी इतकी ती आपल्यात भिनली आहे. आपल्या प्रगतीचे पाय खेचते, ती जातीव्यवस्था आपण सोडत तर नाहीच, पण दुसरीकडेसुद्धा प्रस्थापित करू बघतो. सिएटल या अमेरिकन शहरातही असेच झाले आणि त्या देशाला जातीच्या आधारावर भेदाभेद करण्यास मनाई करत तो दंडनीय गुन्हा आहे, हा कायदा करावा लागला...
जातीच्या आधारावर भेदाभेद करण्यास मनाई करत तो दंडनीय गुन्हा आहे, हे कायद्याच्या माध्यमातून बजावणारे सिएटल हे पहिले अमेरिकन शहर ठरले आहे. होय. असं विधेयक त्या देशात संमत करावं लागलं आहे... जिथे जायला आपली माणसं अक्षरशः धडपडत असतात... जिथे स्थायिक होणं ही आपल्या देशातील लक्षावधी लोकांची महत्त्वाकांक्षा असते!
अमेरिकेत सुमारे ५० लाखांच्या वर दक्षिण आशियाई लोक राहतात. भारत, पाकिस्तान, बांगला देश, श्रीलंका, नेपाळ, भूतान या देशांतून हे अमेरिकेत स्थलांतरित झालेले आहेत. करिअर, भौतिक समृद्धी आणि सुखसोयीयुक्त संपन्न जीवन यासाठी आपली मायभूमी सोडून दूर देशात स्थायिक होत असताना ही माणसे केवळ इथले मसाले, खाद्यपदार्थ, कपडे, दागिने, सणवार आणि उपासना पद्धती हेच तिकडे घेऊन गेले नाहीत, तर मायभूमीत जन्माला चिकटलेली जात आणि या जातीच्या उतरंडीत भिनलेला भेदाभेद, अन्य जातींविषयी तुच्छता आणि स्वजातीचा अहंकार हेसुद्धा तिकडे घेऊन गेले. एकाच धर्मात जन्मलेली माणसे जातींच्या कप्प्यात विभागली जातात आणि त्या कुंपणात मोठ्या अभिमानाने आयुष्य काढतात... ‘आमच्यात असं... आमच्यात तसं... त्यांच्यात कुठे आपल्यासारखं?’ असं हयातभर बोलत राहतात.
खाण्यापिण्यापासून ते कर्मकांडापर्यंत आपापली वैशिष्ट्ये ते नुसतीच जपत नाहीत, तर त्यावरून ‘इतर’ जातींना नावेसुद्धा ठेवतात, कमी मानतात. हे सर्वच जाती मनापासून करत असल्यामुळे कोणालाच त्यात काही वावगे वाटत नाही. प्रत्येक जातीला आपलीच जात श्रेष्ठ आणि गौरवशाली वारसा असलेली वाटत राहते. जातीचे मेळावे होतात. जातीतील अनुरूप वधू-वरांचे विवाह जमवणारी मंडळे असतात. एवढेच काय, सार्वजनिक उत्सव, देवस्थाने आणि देवसुद्धा जातीच्या फलकाखाली आणले जातात. गेल्या काही वर्षांत जातींच्या नावे चेंबर ऑफ कॉमर्ससारख्या व्यापारी संघटना आणि बँकासुद्धा उदयाला आल्या आहेत आणि त्या आपापल्या जातीच्या उद्योजकांना, व्यापाऱ्यांना प्रमोट करत असतात. थेट विचारलं, तर ‘आम्ही काही तशा जातीपाती मानत नाही... आमचा स्टाफ पाहा, सर्व प्रकारचा आहे’ अशी उत्तरे तयार असतात. पण प्रत्यक्षात मूळ पीळ विशिष्ट जातीचाच असतो हेच खरं असतं.
हे एवढ्यावरच थांबत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटल्याप्रमाणे जात ही आडवी नाही तर उभी रचना आहे. ती उतरंड आहे. उच्च-नीच भेदभाव ठळक करणारी आहे. शेकडो पायऱ्या असलेली ही शिडी आहे. तिच्या वरच्या पायऱ्यांवर सवर्ण आणि तथाकथित उच्च जाती आणि खालच्या पायऱ्यांवर शूद्र, ‘खालच्या’ जाती. ही शिडी चढता-उतरता येत नाही. कितीही कर्तृत्व गाजवले तरी खालच्या पायरीवरून वरच्या पायरीवर बढती मिळत नाही. प्रत्येकाने आपल्या पायरीने राहावे अशी छुपी ताकीद या व्यवस्थेमध्ये आहे. यातील गुंतागुंतीची बाब अशी, की खाली खाली उतरत जाणाऱ्या खालच्या पायऱ्यांवर असलेली माणसे ही आपल्या वरच्या पायऱ्यांवरून माणसे आपल्याला कमी लेखतात याकडे दुर्लक्ष करत आपल्याही खाली असलेल्या पायऱ्यांवरील माणसांना ‘कमी’, ‘खालचे’ समजण्यात धन्यता मानतात. सर्वांत तळाशी असणाऱ्या जातींबद्दल जरा वरच्या, मधल्या आणि वरच्या पायऱ्यांवरील जातींना हीणकसपणाची भावना असते. आपल्या श्रेष्ठत्वाचा अहंकार असतो. आपण एका पायरीवर आहोत याचा त्यांना अभिमान असतो.
या जात्याभिमानातून केवळ जन्मामुळे ‘वरच्या’ जातीतील माणसे त्यांच्या समजुतीनुसार ‘खालच्या’ जातीच्या माणसांना माणसंसुद्धा मानायला फारशी तयार नसतात. ते स्वतः त्यांच्या वरच्या माणसांच्या दृष्टीने शूद्र असले, तरी अतिशूद्र गणल्या जाणाऱ्या माणसांवर अत्याचार करण्यात त्यांना वावगे वाटत नाही. परस्परांविषयी पराकोटीचा द्वेष या जातीव्यवस्थेने भारतीयांच्या हाडीमाशी रुजवला आहे. वर्णश्रेष्ठत्वाचा विषारी फुत्कार आपले सारे जीवन जहरी, टॉक्सीक बनवून राहिला आहे, याची दखल भारतीयांना नाही हे कटू वास्तव आहे.
हे कटू वास्तव जणू अंगाला चिकटल्यासारखं आपली भारतीय माणसं आपल्या देशातून अमेरिका, युरोप आणि जगभरच्या बहुतेक सर्व देशांत घेऊन गेली आहेत. उच्च शिक्षण, प्रगत देशातील भेदाभेदरहित नागरी जीवन या कशाचाच त्यांच्यावर परिणाम झाला नसावा, असं वाटण्याजोग्या अनेक घटना गेल्या काही वर्षांत समोर येऊ लागल्या. विशेषत: दलित समाजातील व्यक्तींना हा अनुभव अधिक प्रखरपणे येऊ लागला आहे. अमेरिकेसारख्या देशात गुणवत्तेची, कामातील कौशल्याची अधिक कदर असते. या गुणावरच तिथली स्पर्धा तुम्हाला वाव देते. यात तुम्ही कोणत्या जातीत जन्माला आला याचा कसलाही संबंध असण्याचा प्रश्नच नाही. असं असतानाही जातीच्या आधारे त्रास देणं, राहण्यासाठी जागा नाकारणं, वेतनात/ बढतीमध्ये भेदभाव करणं असे प्रकार नोंदवले जाऊ लागले.
‘आम्ही भारतीय बॉसच्या हाताखाली काम करू इच्छित नाही, कारण आम्हाला जातीवरून त्रास दिला जातो. आम्ही अन्य कोणाही बरोबर काम करू’ इथपर्यंत जातिभेदाचे चटके बसल्याची उदाहरणे समोर आल्यानंतर अमेरिकेतील सामाजिक संस्था, व्यक्ती, लोकप्रतिनिधी, धोरणकर्ते या सर्वांचेच लक्ष या प्रश्नाकडे वेधले गेले. सिएटल सिटी कौन्सिलच्या सदस्य क्षमा सावंत यांनी २१ फेब्रुवारी रोजी कौन्सिलमध्ये भेदाभेदविरोधात विधेयक मांडले आणि ते ६ विरुद्ध १ अशा मतांनी संमत झाले. अमेरिकेतील वर्णभेदविरोधी कायद्यांतर्गत आता हीसुद्धा तरतूद अमलात येईल.
जी जातव्यवस्था आणि त्यातून येणारा हिंसाचार नि विषमता, भेदभाव अमेरिका या देशाला मुळात माहीत नव्हता, त्या देशाला आपल्या भूमीत स्थायिक झालेल्या स्थलांतरित परदेशी लोकांमुळे त्यांनी आपल्या सोबत आणलेल्या या भेदाविरोधात कायदा करावा लागण्याची वेळ आपण भारतीयांनी आणली आहे.
परदेशस्थ भारतीय लोकांबद्दल आपल्याकडे आजही कौतुक असतं. जगात भारताची मान वर केली, अशी आपली भावना असते. तिथे जाणारी माणसं बुद्धिमान असतात असाही एक समज आहे. भारतीयांच्या जागतिक कर्तृत्वाचा डंका पिटण्यात आपण मग्न असतो. ते चुकीचं नाही, परंतु श्रेय घेताना अपश्रेयाचेही माप पदरात घेण्याचा मनाचा मोठेपणा आपल्याकडे आहे काय, हा खरा प्रश्न आहे.
जात भारतीयांच्या जणू डीएनएमध्येच असावी इतकी आपल्यात भिनली असेल, तर आपला देश मागासलेला का राहिला, आपल्या मुलांना दुसऱ्या प्रगत देशांचे जे आकर्षण वाटते ते देश प्रगत का झाले याचा वेध आपल्याला घ्यावा लागेल. जी आपल्या प्रगतीचे पाय खेचते, ती जातिव्यवस्था आपण सोडत तर नाहीच, पण दुसरीकडेसुद्धा प्रस्थापित करू बघतो आणि त्या देशाला त्याविरोधात कायदा करावा लागतो हे दुर्दैवी आहे.
(लेखिका ज्येष्ठ पत्रकार आणि सुपरिचित कथाकार असून, सामाजिक प्रश्नांवर सातत्याने लेखन करतात.)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.