कराड बसस्थानकापासून जवळच असलेल्या वस्तीला मध्यरात्री अचानक भीषण आग लागलीय.
कऱ्हाड (सातारा) : कराड बसस्थानकापासून (Karad Bus Stand) जवळच असलेल्या परिसरातील वस्तीला मध्यरात्री अचानक भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह कराड न्यायालयाच्या (Karad Court) सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. परंतु, या भयावह आगीत 24 घरे जळून खाक झाली आहेत, तर काही जण किरकोळ जखमी झाले आहेत.
कऱ्हाडमधील टाऊन हॉल शेजारील व बापूजी साळुंखे पुतळ्याच्या पूर्वेकडील बाजूस असणाऱ्या एका वस्तीस मध्यरात्री अचानक आग लागली. त्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने आगीने अधिकच रौद्ररूप धारण केलं. आगीमध्ये त्या परिसरातील संबंधित महिलांची घरं आणि त्या परिसरातील व्यावसायिकांचे दुकान गाळे जळून खाक झाले आहेत. या आगीत तीन महिलाही जखमी झाल्या आहेत.
या आगीची माहिती न्यायालय परिसरात असणाऱ्या होमगार्डला मिळाल्यावर, त्यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन काही महिलांना बाहेर काढण्यास मदत केली. दरम्यान, घटनास्थळी पालिकेचा अग्निशमन बंब आणि कृष्णा हॉस्पिटलचा (Krishna Hospital) अग्निशमन बंब दाखल झाल्याने आग आटोक्यात आणण्यात आलीय. संबंधित आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केल्यानंतर आग विझवण्यात यश आलं. दरम्यान, संबंधित महिलांना येथील पालिका शाळा क्रमांक 3 मध्ये तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्याची कार्यवाही हाती घेण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, नगरसेवक राजेंद्र यादव, फारुख पटवेकर, विजय यादव व सहकाऱ्यांनी भेट देऊन तेथील पुढील कार्यवाही सुरू केलीय. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी भेट दिलीय.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.