सातारा जिल्ह्यातील सद्यःस्थिती पाहता ही पदे रद्द न करण्याची मागणी जिल्हा परिषदेने आरोग्य सेवा व अभियान संचालकांकडे केली आहे.
सातारा: राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील (एनआरएचएम) जिल्ह्यातील २९ आरोग्य सेविका कार्यमुक्त करण्यात येणार आहेत. त्यामुळे आरोग्य विभागात पंधरा वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर अन्याय झाला असून, कोरोना काळातही त्यांनी जीव धोक्यात घालून रुग्णांची सेवा केली होती. दरम्यान, २०२१-२२ च्या प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यात आरोग्य सेविकांची पदे रद्द करण्याचे आदेश आहेत. मात्र, जिल्ह्यातील सद्यःस्थिती पाहता ही पदे रद्द न करण्याची मागणी जिल्हा परिषदेने आरोग्य सेवा व अभियान संचालकांकडे केली आहे.
केंद्र सरकारने आरोग्य विभागासाठी २००५ मध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान राबविण्यास सुरवात केली. ग्रामीण भागातील गरीब महिला आणि मुलांपर्यंत गुणवत्तापूर्ण, अद्ययावत व परिणामकारक आरोग्य सेवा पुरेशा प्रमाणात पोचविण्याचे मिशनचे ध्येय होते, तसेच अर्भक मृत्यू दर आणि माता मृत्यू दर कमी करणे, सार्वजनिक स्वच्छता, पोषक आहार, पाणीपुरवठा यासारख्या मूलभूत सेवांबाबत सार्वजनिक आरोग्य सेवा सुलभतेने उपलब्ध करून देणे, स्थानिक आरोग्य नियंत्रणाबरोबरच इतर संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांचा प्रतिबंध आणि नियंत्रण करणे, सर्व लोकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्याबाबत उपाययोजना आखणे, एकूण जननदर कमी करणे उद्दिष्ट्ये व गाठावयाची उद्दिष्ट्ये या अभियानातून राबविण्यात येतात.
मात्र, केंद्र सरकारने कोविड निधी अंतर्गत मनुष्यबळाकरिता निधी मंजूर न केल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात आणण्याचे आदेश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक डॉ. रामास्वामी एन यांनी दिले आहेत. याचबरोबर, रिक्त पदे रद्द करूनही रद्द करावयाची पदे शिल्लक असल्यास गेल्या एकही वर्षात बाळंतपण न झालेल्या उपकेंद्रातील आरोग्य सेविकांची पदे रद्द करण्याचे आदेश देण्यात आले होते.
संघटनेचे निवेदन
जिल्ह्यात एनआरएचएम अंतर्गत १५६ पदे कार्यरत होते. यामधील २९ उपकेंद्रांतील कर्मचाऱ्यांना जाचक अट लावून कार्यमुक्त करण्यात येणार आहे. १५ वर्ष काम केल्यानंतरही आम्हाला कमी केले जात असून, कर्मचाऱ्यांवर अन्याय होत आहे. पुढील काही दिवसांत आम्हाला पूर्ववत न केल्यास ‘एनआरएचएम’चे सर्व कर्मचारी कामबंद आंदोलन करतील, असा इशारा स्वाभिमानी राष्ट्रीय आरोग्य अभियान कर्मचारी महासंघाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.