मोरगिरी - मणदुरे विभागातील मणदुरे या गावातील सुमारे २५ ते ३० शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान सोमवारी सायंकाळी रानगव्याच्या कळपाने केले आहे. सुमारे ७० एकर परिसराच्या लागवडीसाठी पेरण्यात आलेले भाताचे तरवे रानगव्यांनी खाऊन फस्त केले असून, नाचून तरव्यांचे नुकसानही केले आहे. त्यामुळे सध्या येथील शेतकरी संकटात सापडला असून, हातातोंडाशी आलेले भाताचे पीक याही हंगामात वाया जाणार, अशी भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
वन्यप्राणी रात्री अपरात्री शेतकऱ्यांच्या शेतात येऊन शेतकऱ्यांनी पेरलेले बी बियाणे, भाताचे तरवे यांचे प्रचंड नुकसान करत आहे, तर यावर्षी शेतकऱ्यांनी भात लागवडीसाठी मोठ्या प्रमाणात भाताच्या रोपांची पेरणी केली आहे. हजारो रुपये खर्च करून बाजारातून बी बियाणे विकत घेतली आहेत, तर मेहनत करून ती शेतामध्ये पेरली आहेत. शेतामध्ये उभे असणाऱ्या पिकांना नुकसान झाले, तर भरपाई देता येते मात्र बी- बियाणे तरवे यांच्यासाठी भरपाई देता येत नसल्याचे वन विभागाकडून सांगण्यात येते. सध्या मणदुरे गावांमधील, तसेच आजूबाजूंच्या गावांमध्येही रानगव्यांकडून मोठे नुकसान केले आहे. भातशेतीसाठी पेरण्यात येणारे तरवे खाऊन टाकले आहेत. कळपाने येऊन पेरलेल्या तरव्यांमध्ये नाचून प्रचंड मोठे नुकसान केले आहे. हे रानगवे कळपाने येत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे सध्या मणदुरे विभागातील शेतकरी या जंगली जनावरांना त्रस्त झाला असून, प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान ररानगव्यांकडून केले जात आहे.
तालुक्यात नाचणी, भाताचे नुकसान
पाटण : तालुक्यात रानगव्यांनी नाचणी, भाताचे तरवे, ऊस तुडवून नुकसान सुरू केले आहे. त्यामुळे भात व नाचणीचे पुनर्लागणीचे क्षेत्र लावणी विना पडून राहणार असल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे. धुमाकूळ घालणाऱ्या रानगव्यांचा, रानडुकरांचा वन व वन्यजीव विभागाने बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.
तारळे, चाफळ, कोयना, केरा, मोरगिरी, ढेबेवाडी व काळगाव विभागाच्या पश्चिम भागात भात व नाचणी पुनर्लागणीचे क्षेत्र मोठे आहे, तसेच या विभागात वन व वन्य जीव विभागाचे घनदाट राखीव जंगल परिसर आहे. दिवसभर जंगलात सुरक्षित ठिकाणी असणारे रानगवे रात्री १२ वाजल्यानंतर आसपासच्या परिसरातील गावांकडे येत आहेत. त्यामुळे मुसळधार पावसात तरव्यांची राखण रात्रीच्या अंधारात कशी करायची व धोका नको म्हणून शेतकरी घराबाहेर पडताना दिसत नाहीत. रानगव्यांनी भात व नाचणीचे तरवे तुडविल्याने या पिकांची पुनर्लागणीसाठी तरव्यांची टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शेकडो एकर क्षेत्र पुनर्लागणी विना पडून राहणार आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे.
रानडुकरांचाही मोठा त्रास
पाटण तालुक्याच्या पूर्व भागात रानडुकरे भुईमूग व ऊस पिकाची नासधूस करीत आहेत. १५ ते वीस रानडुकरांचा कळप रात्रीच्या अंधारात होत्याचे नव्हते करीत आहे. एका रात्रीत खातात कमी; पण नुकसान सहा ते सात गुंठ्यांतील उसाचे करतात. वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांचे हे नुकसान सहन करण्याची क्षमता नाही. त्यामुळे वन व वन्यजीव विभागाने वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.