मायणी : येथील मुख्य बाजारपेठेत, मेन रोडला असलेल्या बालाजी ज्वेलर्स वर सशस्त्र दरोड्याचा प्रयत्न फसला. ज्वेलरीचे जिगरबाज मालक अमित माने यांनी सर्व शक्तिनिशी चार दरोडेखोरांशी दोन हात करीत पळवून लावले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली असून व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, काहीही करून दोन दिवसात आरोपी मिळालेच पाहिजेत. असे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिल्याने पोलिस अधिकाऱ्यांची झोप उडाली आहे.
त्याबाबतची माहिती अशी : येथील यशवंत बाबा मंदिर परिसरात मेन रोडला अमित प्रभाकर माने (रा. भवानी माळ, पाटील वस्ती विटा, सध्या रा. मायणी) यांचे बालाजी ज्वेलर्स हे सोन्या चांदीच्या दागिन्यांचे शोरूम आहे. काल रात्री आठच्या दरम्यान, बहुतांशी दुकाने बंद करून दुकानदार घरी गेले होते. मात्र, नेहमीप्रमाणे गुरुवारी रात्री आठ वाजता माने दिवसभरातील हिशोब लिहीत होते. त्यावेळी अचानक पांढरा, निळा, काळा व केसरी अशा वेगवेगळ्या रंगाचे जरकिन, ट्रॅक सूट घातलेले व तोंडाला गोल मास्क लावलेले चौघेजण दुकानात आले. त्यापैकी एकाने 'माल काढ' असे म्हणत माने यांच्या गचांडीला पकडले.
दुसऱ्याने लगेच माने यांचेवर बंदूक रोखली. मात्र बंदुकीच्या धाकाला भीक न घालता माने यांनी सर्व शक्तीनिशी त्यांना प्रतिकार केला. दरोडेखोर व माने यांच्यात झटापट झाली. त्यावेळी माने यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यामुळे शेजारील व पेठेतील काही दुकानदार तेथे धावून आले. मात्र त्यांचेवरही तिसऱ्या दरोडेखोरांने बंदूक रोखल्याने ते घाबरून जिवाच्या भीतीने सुरक्षित ठिकाणी थांबले. मात्र, घटनास्थळाकडे धाव घेणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याचे दिसताच दरोडेखोरांनी काढता पाय घेतला. दुकानाबाहेर उभ्या केलेल्या दुचाकीवरून त्यांनी धूम ठोकली. बाहेर अंधार असल्याने त्या गाड्यांचे नंबर दिसू शकले नाहीत. तसेच तोंडावर मास्क असल्याने, दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्यात त्यांचे चेहरे दिसत नाहीत.
मारहाणीस सुरुवात करत दुकानातील सोने चांदी आणि पैसे असा सर्व ऐवज देण्यासाठी धमकावले. दरम्यान, घटनेची नोंद पोलिसात झाली असून तपासासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. पथके तयार करून तपासासाठी ठिकठिकाणी रवाना केलीत. मात्र अद्याप हाती काहीही लागलेले नाही.पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजित बोराडे, उपअधीक्षक डॉ.निलेश देशमुख यांनी आज घटनास्थळी भेट दिली. काहीही करून आरोपी ताब्यात घेण्याचे आदेश वरिष्ठांनी दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांची झोप उडाली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.