चाफळ (जि. सातारा) : चाफळसह परिसरात काही दिवसांपासून सुरू असलेला पाऊस रब्बी हंगामासाठी चांगला असल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे. वापसा आलेल्या काही ठिकाणी शाळू पेरणीसही सुरुवात झाल्याने बळीराजा रब्बी हंगाम पेरणीच्या कामात व्यस्त दिसत आहे.
विभागात चाफळ, गमेवाडी, जाळगेवाडी, माथणेवाडी, जाधववाडी, माजगाव, नाणेगाव, कडववाडी, डेरवण, वाघजाईवाडी, शिंगणवाडी या बागायती पट्ट्यात मुख्यत्वे सोयाबीन पिकाची पेरणी केली जाते. आता बहुतेक सर्वत्र सोयाबीन काढून मळून झाले आहे. या मोकळ्या शिवारात सध्या शाळू पेरणीच्या कामात बळीराजा व्यस्त आहे. परतीच्या पावसाने काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी तुरळक हजेरी लावली. त्यामुळे आंतरमशागतीची कामे कमी अधिक प्रमाणात झाली. मात्र, गेल्या सात ते आठ महिन्यांपासून कोरोनाचे संकटात शेतकऱ्यांनी शेतातील कामांना जास्त वेळ दिला आहे. शेताची नांगरट, कुळवणी, फणपाळी आदी कामे शेतकऱ्यांनी उरकली. हवामान खात्याच्या अंदाजानुसार परतीचा पाऊस चांगला पडणार, असे संकेत वर्तवल्याने बळीराजा रब्बीची पेरणी उरकताना दिसत आहे.
पाटण तालुक्यातील चाफळसह भागातील डोंगरमाथ्यावर भात शेतीस जास्त प्राधान्य आहे. याठिकाणी खडवी भाते मोठ्या प्रमाणात घेतली जातात. ही भातेही काढणीस सुरुवात झाली असून, याठिकाणीही शाळू पेरणी सुरू आहे. हंगामात कोरोना संकटामुळे नवीन संकरित बी-बियाणे, खते मिळतील का, याबाबत साशंकताच आहे. वाहने बंद असल्याने शेतकरी वर्गाला बियाणे खते घेऊन जाताना अडचणी निर्माण होत आहेत. सध्या चाफळ येथील बियाणांच्या दुकानात सर्व प्रकारचे बियाणे उपलब्ध आहेत, तरीही शेतकऱ्यांची बियाणे हुडकण्यासाठी धांदल उडाल्याचे दिसून येत आहे. कृषी विभागाने तातडीने सर्व प्रकारच्या बियाणाची उपलब्धता चाफळ बाजारपेठेत करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.