ढेबेवाडी (जि. सातारा) : साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाल्याबरोबर ठिकठिकाणी वर्दळीच्या रस्त्यांवर दिवस-रात्र उभ्या राहणाऱ्या ऊस भरलेल्या ट्रॉल्यांची समस्या परिसरात वाढली आहे. वाहनचालकांना अचानक त्याचा अंदाज येत नसल्याने अपघातांची भीती वाढली असताना संबंधित यंत्रणा गप्प कशी? असा प्रश्न सर्वांनाच पडत आहे.
पूर्वी ढेबेवाडी खोऱ्यात पाण्याची उपलब्धता नसल्याने उसाचे क्षेत्र मर्यादित होते. हंगामात ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची तुरळक ये-जा दिसायची. मात्र, आता महिंद आणि मराठवाडी धरणाचे पाणी उपलब्ध झाल्याने उसाच्या क्षेत्रात वर्षागणिक वाढ दिसून येत आहे. मात्र, सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याने त्यातून काही समस्याही डोके वर काढत आहेत. दिवस-रात्र रस्त्यावर उभ्या ऊस भरलेल्या ट्रॉल्या ही तर त्यापैकीच एक गंभीर समस्या आहे. चौपदरीकरण केलेल्या ढेबेवाडी-कऱ्हाड रस्त्यावर तसेच ढेबेवाडी परिसरातील अन्य अंतर्गत रस्त्यांवरही प्रामुख्याने असे धोकादायक चित्र दृष्टीला पडत आहे.
विविध साखर कारखान्यांना येथून ऊस पाठवला जातो. शेताकडे जाणारे रस्ते खराब असल्याने अनेकदा ट्रॅक्टरने तेथून ऊस भरलेल्या दोन ट्रॉल्या एकदम ओढणे अशक्य होते, त्यामुळे एक-एक ट्रॉली भरल्यावर मुख्य रस्त्यावर आणून उभी केली जाते. अशा उसाने भरलेल्या ट्रॉल्या वर्दळीच्या रस्त्यावर दिवस-दिवस उभ्या असतात. अचानक त्यांचा अंदाज न आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडते. काही वेळा ट्रॉलीच्या टायर्सना लावलेले मोठे दगड ट्रॉली नेल्यावर तेथेच किंवा साइडपट्टीवर पडून असतात. रस्त्यात ट्रॉली उभी केल्यावर त्याला लाल झेंडे, कापड, रिफ्लेक्टर किंवा अन्य सुरक्षेच्या उपाययोजना केल्याचेही दिसत नाही.
वर्षागणिक या समस्येत वाढच दिसून येत आहे. वाहनचालक व प्रवाशांच्या जीवन-मरणाशी निगडित या गंभीर समस्येकडे संबंधित यंत्रणेचे लक्ष व नियंत्रण आहे की नाही, अपघात झाल्यावरच त्यांचे डोळे उघडणार का?
-कमलाकर पाटील माजी तालुकाध्यक्ष, पाटण तालुका भाजप
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.