कोरेगाव (सातारा) : विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान माझ्याकडून झालेली चूक मी कबूल करतो, अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे (MLA Shashikant Shinde) यांनी त्यांच्याकडून झालेल्या चुकीची जाहीर कबुली दिली. दरम्यान, आमच्या काही चुकांमुळे आमदार शिंदे यांची राजकीय अडचण झाल्याचे व यापूर्वीचे मतभेद संपवून यापुढे त्यांच्यासोबत कार्यरत राहणार असल्याचे राष्ट्रवादीमध्ये (NCP) पुनर्प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी सांगितले.
त्रास देण्यासाठी सत्तेचा वापर कोणी करू नये, मी कधीच असे केले नाही.
विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी स्वाभिमानी विचार मंचच्या (Swabhimani Vichar Manch) माध्यमातून एकत्र आलेल्या राष्ट्रवादीच्या काही कार्यकर्त्यांनी नंतर चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यापैकी तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अजय कदम, लक्ष्मण ऊर्फ नाना भिलारे, हणमंतराव नलावडे, विलासआबा पवार, शहाजी साळुंखे यांनी पिंपोडे खुर्द (ता. कोरेगाव) येथे आमदार शशिकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादीमध्ये पुनर्प्रवेश केला, तर चंद्रकांत उबाळे यांच्यासह गावातील दीपक कदम, विकास कदम यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. याप्रसंगी विकास सेवा सोसायटी कार्यालयाच्या दुसऱ्या मजल्याच्या बांधकामाचे व गावातील अंतर्गत रस्त्यावर पेवर ब्लॉक बसविण्याच्या कामाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी आमदार शिंदे बोलत होते.
याप्रसंगी राष्ट्रवादीच्या आयटी सेलचे प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील, कृषी समितीचे सभापती मंगेश धुमाळ, पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे, शिवाजीराव महाडिक, संजय झंवर, रमेश उबाळे, अरुण माने, डॉ. अभय तावरे, राजेंद्र भोसले, प्रताप कुमुकले, भास्कर कदम, श्रीमंत झांजुर्णे, ॲड. पांडुरंग भोसले, राहुल साबळे आदी प्रमुख उपस्थित होते. त्रास देण्यासाठी सत्तेचा वापर कोणी करू नये, मी कधीच असे केले नाही, असे नमूद करून आमदार शिंदे म्हणाले, ‘‘सहन होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी विरोधी गटातील कार्यकर्त्यांची अवस्था झाल्याचे काही जण मला खासगीमध्ये सांगत आहेत. दोन वर्षांत कामे किती झाली, हे तपासून बघा. पूर्वी ‘ते’ भाजपमध्ये असताना केंद्र सरकारकडून निधी आणल्याचे सांगायचे. आता शिवसेनेचे असल्याने राज्यातील आघाडीकडून निधी आणल्याचे सांगत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्येही ‘आपण नेमके कोणत्या पक्षात आहोत,’ असा संभ्रम आहे.’’
निष्ठा काय असते, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे खासदार श्रीनिवास पाटील आणि आमदार शशिकांत शिंदे हे दोघे आहेत, असे नमूद करून सारंग पाटील म्हणाले, ‘‘कोरेगाव मतदारसंघात भुलभुलैय्याचे नाणे आम्ही उरावर घेतले आहे. त्याचे परिणाम दिसू लागल्याने त्या वेळी चूक करून बसल्याचे कार्यकर्त्यांनी मान्य करणे, ही मोठी गोष्ट आहे.’’ या वेळी शिवाजीराव महाडिक, मंगेश धुमाळ, अजय कदम, भास्कर कदम, नीलेश जगदाळे, प्रशांत पवार, चंद्रकांत उबाळे यांची भाषणे झाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.