राजकारण्यांचे मनसुबे धुळीला; माणमधील 30 पंचायतींवर प्रशासकराज

राजकारण्यांचे मनसुबे धुळीला; माणमधील 30 पंचायतींवर प्रशासकराज
Updated on

दहिवडी (जि. सातारा) :  माण तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतींच्या पदाधिकाऱ्यांची मुदत 23 ऑगस्ट रोजी संपली आहे. त्यामुळे या 30 ग्रामपंचायतींचा कारभार प्रशासकांच्या हाती गेला आहे. यामुळे प्रशासक म्हणून वर्णी लागावी, अशी अपेक्षा असणाऱ्या राजकारण्यांचे मनसुबे धुळीला मिळाले आहेत. प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या विस्तार अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतीच्या विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
 
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचा प्रभाव सर्वच क्षेत्रांवर पडला असून, राजकारणही त्यातून सुटले नाही. विविध निवडणुका रद्द कराव्या लागल्या आहेत, पुढे ढकलाव्या लागल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. तालुक्‍यातील 30 ग्रामपंचायतींच्या 24 ऑगस्ट 2015 रोजी निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे त्यांची मुदत 23 ऑगस्ट 2020 रोजी संपली आहे. शासनाच्या निर्देशानुसार या ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासक म्हणून कोणाची नियुक्ती करायची, यावर बऱ्याच चर्चा घडल्यानंतर शासकीय कर्मचारीच प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे निश्‍चित करण्यात आले. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांच्या आदेशानुसार पंचायत समितीस्तरावर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचायत समितीच्या ग्रामपंचायत, आरोग्य, कृषी व शिक्षण विभागातील विस्तार अधिकाऱ्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निर्णयामुळे थोड्या कालावधीसाठी का होईना सरपंच होण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांचे स्वप्न भंगले आहे. तूर्तास निवडणुकींना ब्रेक बसून गावकारभार हा प्रशासकांच्या हातात आला आहे. एका प्रशासकाकडे चार ते पाच गावांचा पदभार देण्यात आला आहे. आपला मूळ कारभार सांभाळत संबंधित ग्रामपंचायतीची निवडणूक होईपर्यंत ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार व कर्तव्य पार पाडण्याची जबाबदारी या अधिकाऱ्यांवर आली आहे. आपल्या प्रशासकीय अनुभवाच्या जोरावर हे प्रशासक ग्रामपंचायतीच्या कारभाराला गती देण्यात यशस्वी होतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, त्यामुळे प्रशासक मंडळींच्या कामात वाढ होणार आहे. 

प्रशासक व नियुक्ती असलेल्या पंचायती 

पी. बी. सातपुते (विस्तार अधिकारी आरोग्य) - श्रीपालवण, कुळकजाई, शिंदी बुद्रुक, गोंदवले खुर्द, धामणी. 
व्ही. पी. कुलकर्णी (विस्तार अधिकारी आरोग्य) - हवालदारवाडी, काळचौंडी, संभूखेड, गंगोती. 
बी. बी. भोसले (विस्तार अधिकारी पंचायत) - मार्डी, वरकुटे म्हसवड, राजवडी, येळेवाडी. 
एम. एस. अडागळे (विस्तार अधिकारी पंचायत) - पळसावडे, पुकळेवाडी, कुकुडवाड, खडकी. 
एम. के. चितरळकर (विस्तार अधिकारी कृषी) - टाकेवाडी, थदाळे, गटेवाडी, जांभूळणी. 
जी. एल. दडस (विस्तार अधिकारी कृषी) - भांडवली, मोही, राणंद, ढाकणी. 
संगीता गायकवाड (विस्तार अधिकारी शिक्षण) - पर्यंती, पानवण, वळई, हिंगणी, सोकासन. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.