सातारा : मत्स्यपालनातून साधली उन्नती

त्रिपुटीच्या देविका महिला स्वयंसहायता समूहाच्या महिलांचे चाकोरीबाहेरील व्यवसायात यश
Fisher
FisherSakal
Updated on

बचत गट चळवळ सुरू झाल्यानंतर महिलांनी जे सहज शक्य आहेत, असे उद्योग सुरू केले. कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटीमधील देविका महिला स्वयंसहायता समूहाच्या माध्यमातून प्रीती काटकर आणि त्यांच्या सहकारी महिलांनी मत्स्यपालनाचा उद्योग सुरू केला. चाकोरीबाहेरील या व्यवसायातही त्यांनी उत्कृष्ट यश मिळविले आहे. सातारा जिल्ह्यातील त्रिपुटी (ता. कोरेगाव) हे ३०० उंबरठ्यांचे गाव. राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानातून (उमेद) गावात देविका महिला स्वयंसहायता समूहाची स्थापना केली. त्यात अध्यक्षा प्रीती काटकर, सचिव संतोषी काटकर, माधुरी काटकर, दीपिका काटकर, मंगल काटकर, पूजा देवधर, मंगल नलवडे, कुसुम काटकर, पुष्पा घाडगे, प्रफुल्ला मोरे, रूपाली काटकर, अनिता घोलप यांचा समावेश आहे.

देविका महिला गटातील महिला बचत करू लागल्या. समूहाला तीन वर्षे पूर्ण झाल्यावर जमलेली रक्कम आपासात वाटून न घेता कोणता तरी व्यवसाय करण्यासाठी ती भांडवल म्हणून वापरण्याचे ठरविले. मत्स्यपालन हा व्यवसाय करण्याचे निश्‍चित केले. त्यासाठी खटाव, कोरेगावमधील मत्स्यपालन व्यवसायाची पाहणीही केली. गावामध्ये १०० वर्षांपूर्वीचा दगडी बांधकामात तयार केलेला मोठा तलाव आहे. तेथे मत्सपालन करण्याचे ठरले. समूहाची आणि प्रत्येक महिलेने दोन हजार रुपये जादा असे ८० हजारांच्या गुंतवणुकीतून व्यवसाय केला.

समूहाच्या सचिव संतोषी काटकर यांच्या स्वमालकीच्या पाच गुंठे जागेत तीन शेततळी खोदण्यात आली. तेथे मत्स्यपालन सुरू केले. शेततळे खोदल्यानंतर त्यासाठी लागणारा प्लॅस्टिक कागद, पाण्याची मोटार, दोरी आदी साहित्य स्थानिक बाजारपेठेतून खरेदी केले. मत्स्यबीज सोडले. त्यातील बरेचसे बीज वायाही गेले. मात्र, महिलांनी न खचून जाता व्यवसाय सुरू ठेवला. दुसऱ्या टप्‍प्यात त्यांनी १० हजार कटला, चिलापी मत्स्यबीज मागवून त्याचे यशस्वी संगोपन करून १० हजारपैकी ९ हजार ४०० मासे जोपासून त्यांची विक्री केली.

स्थानिक बाजारपेठेत ताज्या माशाला मोठी मागणी असल्याने २०० ते २५० रुपये किलोने जाग्यावरच मासे विक्री सुरू झाली. सध्या राष्ट्रीयीकृत बँकेतर्फे समूहाला दोन लाख रुपये कर्ज मिळाले आहे. त्यातून समूहाने कटला, चिलापी या जातीचे मत्स्यबीज तळ्यामध्ये सोडले आहेत. तळ्यातील पाण्याची पूर्ण काळजी घेतली जाते. तळ्यातील पाणी बदलत असताना पाणी वाया न घालवता समूहाद्वारे लावलेल्या फळझाडे, भाजीपाल्याच्या मळ्यामध्ये सोडले जाते. यामुळे पिकांना खत मिळते. महिलांना या व्यवसायातून आता बऱ्यापैकी अर्थार्जन होत आहे.

बचत गटाच्या महिला अनेक पारंपरिक व्यवसाय निवडतात. आम्ही चाकोरी-बाहेरचा हा मत्सपालनाचा व्यवसाय निवडला. आम्ही समूहातील सर्व महिला एकोप्याने पडेल ते काम करून व्यवसाय यशस्वी करत आहोत.

- संतोषी काटकर, सचिव, देविका महिला स्वयंसहायता समूह, त्रिपुटी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()