सातारा : कोरोनाच्या संकटात प्रत्येक रुग्णाचे नातेवाईक मदतीसाठी आर्त हाक मारताना दिसून येत आहे. मात्र, या काळात रुग्णांची ने-आण करणाऱ्या रुग्णवाहिका चालकांकडून रुग्णांच्या नातेवाइकांची आर्थिक लूट होत असल्याचे दिसते. परिवहन विभागाने रुग्णवाहिकांना दरपत्रक ठरवून दिल्याप्रमाणे दर आकारणे बंधनकारक असते; परंतु नियमाचे उल्लंघन करत रुग्णवाहिका चालक जादा भाडे आकारणी करत असल्याचे दिसून येत आहे. या रुग्णवाहिकांवर आरटीओ प्रशासनाने कारवाईचा इशारा दिला आहे.
सद्यःस्थितीत जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीचे प्रमाण सर्वाधिक आहे. या काळात रुग्णांना कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका अधिक असल्याने खासगी वाहनांपेक्षा रुग्णवाहिकांची जास्त गरज असते. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची ने-आण करण्यासाठी रुग्णवाहिकांची मागणी वाढली आहे. रुग्णांचे प्रमाण सर्वाधिक असल्याने रुग्णवाहिकाही कमी पडू लागल्या आहेत. कोरोनाच्या या भीषण परिस्थितीत अनेक रुग्णांची स्थिती चिंताजनक असल्याने वेळ न घालवता रुग्णांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज असते. या परिस्थितीचा अनेक रुग्णवाहिका चालक गैरफायदा घेत नातेवाइकांकडून जादा दर आकारणी करीत असल्याचे समोर आले आहे.
प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या नियमानुसार रुग्णवाहिकांनी 20 किलोमीटरहून अधिक अंतर कापल्यास परतीचे अंतरही विचारात घेऊन एकूण भाडेदर ठरविणे गरजेचे आहे, तसेच दरपत्रकातील भाडेदरापेक्षा रुग्णवाहिका कमी अथवा मोफत सेवा देऊ शकतात. मात्र, नियमानुसार जादा दर आकारणी करता येत नाही. त्याशिवाय प्रादेशिक परिवहन विभागाचे दरपत्रक रुग्णवाहिकेमध्ये दर्शनी भागात लावणे बंधनकारक असताना बहुतांश वाहनांमध्ये ते लावले जात नाही. त्यामुळे अनेक रुग्णवाहिका चालकांकडून या नियमाचे उल्लंघन सुरू असून, नातेवाईकांकडून भरमसाट पैसे आकारले जात आहे.
नागठाणे-सातारा 2200 रुपये
नागठाणे येथील रुग्णालयातून कोविडच्या रुग्णाला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करायचे होते. त्यासाठी सुरुवातीला रुग्णवाहिका चालकांकडून 2,500 रुपये भाडे सांगण्यात आले. नातेवाईकाने विणवण्या करत थोडेफार कमी करण्यास सांगितले. शेवटी 2,200 रुपयांना रुग्णवाहिका ठरवित रुग्णाला साताऱ्यात आणण्यात आले. रुग्णाला तातडीने उपचार मिळण्यासाठी कुठलाही पर्याय नसल्याने पैसे दिल्याचे रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले.
नियमानुसार रुग्णवाहिकांचे दर
वाहनांचा प्रकार 20 किमी अथवा दोन तासांकरता प्रतिकिमी 12 रुपये 24 तासांकरिता (इंधन वगळता)
मारुती व्हॅन- 350 12 1200
टाटा सुमो, मॅटेडोर- 450 13 1500
टाटा 407, स्वराज माझदा- 550 14 2000
वातानुकूलित रुग्णवाहिका- 700 20 3000
या ठिकाणी करा तक्रार....
परिवहन विभागाने ठरवून दिल्यानुसार रुग्णवाहिका चालकांनी दर आकारणी करणे बंधनकारक आहे. नियमापेक्षा जादा दर आकारल्यास नागरिकांनी dyrto.11-mh@gov.in या मेल आयडीवर वाहनांच्या नंबरसह तक्रार करण्याचे आवाहन आरटीओ विभागाने केले आहे.
जिल्ह्यातील रुग्णवाहिकांना प्रादेशिक परिवहन विभागाने दरपत्रक ठरवून दिले आहे. त्यानुसारच दर आकारणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करून जादा आकारणी केल्यास संबंधित रुग्णवाहिकेवर कारवाई केली जाईल, तसेच रुग्णवाहिकांमध्ये दरपत्रक लावणे बंधनकारक आहे.
-विनोद चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा
Edited By : Balkrishna Madhale
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.