Aircraft Manufacturing : अमोल यादवांची विमाननिर्मिती सुखकर; शासन देणार १२ कोटी

भारतीय बनावटीचे पहिले विमान आणि त्याचे निर्माते अमोल यादव यांचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला संघर्षमय आणि अडथळ्यांचा प्रवास आता सुखकर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
Amol Yadav
Amol YadavSakal
Updated on
Summary

भारतीय बनावटीचे पहिले विमान आणि त्याचे निर्माते अमोल यादव यांचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला संघर्षमय आणि अडथळ्यांचा प्रवास आता सुखकर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ढेबेवाडी - भारतीय बनावटीचे पहिले विमान आणि त्याचे निर्माते अमोल यादव यांचा गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेला संघर्षमय आणि अडथळ्यांचा प्रवास आता सुखकर होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी १२ कोटी रुपये देण्याचा निर्णय राज्य शासनाच्या बैठकीत घेण्यात आल्याने पुढील संशोधनाच्या वाटेवर एक महत्त्वपूर्ण आणि सकारात्मक पाऊल पडल्याचे अमोल यादव यांनी आज दै. ‘सकाळ’ला सांगितले.

या विभागातील सळवे (ता. पाटण) हे कॅप्टन यादव यांचे मूळ गाव. भारतीय बनावटीचे पहिले विमान बनवून ते ‘मेक इन इंडिया’मध्ये प्रदर्शित केल्यानंतर देशभर चर्चेत आलेल्या कॅप्टन यादव यांचा संघर्षमय व जिद्दीचा प्रवास नव्या पिढीसाठी आदर्शवत ठरावा, असा आहे. १९९७ पासून ते विमान तयार करण्याचा प्रयत्न करत होते. तिसऱ्या प्रयत्नानंतर २००९ मध्ये त्यात यश आले. एका सर्वसामान्य कुटुंबातील माणसासाठी हे आर्थिक धाडस खूप मोठे होते. मुलाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यादव कुटुंबीयांनी खूप हाल सोसले. रस्त्यावर येण्यासारखी परिस्थिती आली असतानाही ते डगमगले नाहीत.

अनेकांनी मदत, प्रोत्साहन व कौतुकाचे पाठबळ दिले. त्यातूनच घराच्या छतावर विमान निर्मितीचे स्वप्न सत्यात आले. २०१६ मध्ये मेक इन इंडियामध्ये त्यांनी हे विमान प्रदर्शित केले. २०१९ मध्ये परमीट टू फ्लाय मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही श्री. यादव यांचे त्या वेळी विशेष कौतुक केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कारकिर्दीत श्री. यादव यांच्या कर्तृत्वाचे कौतुक करून सहकार्याचे आश्वासन मिळाले होते. मात्र, पुढे दुर्लक्ष होत गेल्याने विमान निर्मितीचा प्रवास खडतर बनत गेला. अमोल यादव यांनाही अनेक अडचणीशी सामना करावा लागला. मात्र, विमान निर्मितीच्या पुढील संशोधनासाठी १२.९१ कोटी रुपये देण्याचा निर्णय काल झालेल्या बैठकीत घेण्यात आला. त्यामुळे संशोधनाच्या वाटेवर एक महत्त्वपूर्ण व सकारात्मक पाऊल पडल्याचे श्री. यादव यांनी सांगितले.

ते म्हणाले, ‘शासनाकडून विशेष बाब म्हणून निधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले. ही छोटीसी सुरुवात असली, तरी त्यातून पुढे नक्कीच काहीतरी मोठे घडणार आहे. तयार केलेले विमान सहा आसनी व विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. भारतातील उपलब्ध धावपट्ट्यांवर ते उतरू शकते. ते थांबलेल्या ठिकाणी धावपळ करत विशिष्ट पेट्रोल पोचविणेही आवश्यक नाही. उपलब्ध पेट्रोलवरही ते चालू शकेल, अशी इंजिनची रचना आहे.

मोठ्या विमानांच्या सेवेवर मर्यादा असतात. त्यांना मोठ्या धावपट्ट्या लागतात. त्यामुळे छोट्या विमानाची उपयुक्तता मोठी आहे. काही देशांनी ती यापूर्वीच ओळखली आहे. पुढे भारतातही हे क्षेत्र विस्तारेल. माझ्या विमानाच्या विविध चाचण्या पूर्ण झाल्या असून, आता १९ आसनी विमानाच्या निर्मितीचे काम सुरू आहे. भविष्यातील विमान निर्मिती प्रकल्पासाठीही केंद्र व राज्य शासन नक्की मदत करेल. त्याबद्दल आशावादी आहे. आता झालेली सुरुवात त्यादृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

मी पाहिलेले स्वप्न माझ्या एकट्याचे राहिलेले नसून ते जनतेचे बनले आहे. खूप उशीर झाला असला, तरी संशोधनासाठी निधी देण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने एक सकारात्मक पाऊल पडले आहे. देशाची गरज बनलेल्या स्वदेशी विमानांचे संशोधन व निर्मिती कमीत कमी वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

- कॅप्टन अमोल यादव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.