गोंदवले : वडिलांचे छत्र हरवल्याने आता आईशिवाय कोणाचाच आधार उरलेला नाही. पण, कष्टातून मोठे अधिकारी होण्याचे स्वप्न घेतलेल्या नवनाथला ''अमृता''चा आधार मिळालाय. किरकसालच्या अमृता काटकर हिने आपल्या वाढदिवसाचा खर्च टाळून पाचवीत शिकणाऱ्या नवनाथ चव्हाणला शैक्षणिक साहित्य देऊन वर्षभरासाठी दत्तक घेतले आहे. घरातून सामाजिक बांधिलकीचे बाळकडू मिळालेली अमृता ही निवृत्त फौजी सुनील काटकर यांची एकुलती कन्या. अभ्यासात चुणचुणीत असलेली अमृता सध्या बारावीनंतर वैद्यकीय अभ्यासासाठीच्या प्रवेश परीक्षेची लातूरला तयारी करत आहे. बालपणापासूनच तिला सामाजिक जाण असल्याने गरजूंना मदत आणि पर्यावरणाला हातभार लावण्याचा तिचा प्रयत्न राहिला आहे.
याच भावनेतून तिने आपल्या अठराव्या वाढदिवसाचा खर्च पालकांजवळ नाकारला. वाढदिवसासाठी होणारा खर्च गरीब आणि गरजू विद्यार्थ्याच्या शिक्षणासाठी करण्याची तिची भूमिका पालकांनीही लगेच मान्य केली. किरकसालमधील एका विद्यार्थ्याचा यावर्षीचा शैक्षणिक खर्च उचलण्याची अमृताची इच्छा पूर्ण करण्यात आली. गेल्या वर्षी अपघातात वडिलांचे निधन झाल्याने मागे केवळ लेकुरवाळ्या आईचाच आधार असलेल्या नवनाथ सुखदेव चव्हाणची निवड यासाठी काटकर कुटुंबीयांनी केली. नवनाथ सध्या किरकसाल माध्यमिक विद्यालयात पाचवीच्या वर्गात शिकत आहे. त्याला शिक्षणासाठी लागणारी सर्व वह्या-पुस्तके, दप्तर, पेन, बुटासह गणवेशाचे दोन जोड देण्यात आले. वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन नवनाथला शिक्षणासाठी जणू ‘अमृत’चं मिळाले आहे.
समाजातून मदतीचा ओघ...
कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असल्याने नवनाथच्या वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर किरकसालकरांनी गेल्या वर्षी ८३ हजार रुपये गोळा करून चव्हाण कुटुंबाला आधार दिला होता. एक वर्षाचा तान्हुला असलेल्या नवनाथच्या आईची शैक्षणिक खर्चाची काळजी अमृताच्या मदतीमुळे यंदा तरी मिटली आहे.
माझा वाढदिवस महत्त्वाचा नाही. हा खर्च गरजूच्या शिक्षणासाठी करता आला, याचे मला खूप समाधान मिळत आहे.
- अमृता सुनील काटकर, किरकसाल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.