फलटण : वारकरी संप्रदायात जात-पात, धर्म-पंथ नसतो. ‘सर्वघटी एकच परमात्मा भरलेला आहे’, ही वारकरी संप्रदायाची भावना आहे. त्याची प्रचिती वारीच्या वाटचालीत तरडगावच्या मुक्कामात आली. प्रचंड पावसामुळे गावाच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते. मंदिरे, सभागृह वारकऱ्यांनी तुडूंब भरली होती. तरीही बरेचसे वारकरी पावसात भिजत होते. रात्रीची वेळ होती. चालून थकल्याने त्यांना घटकाभर आरामाची गरज होती. अशा वेळी त्यांच्यासाठी गावातील सर्वधर्मीय तरुणांनी पुढाकार घेत बुद्धविहार आणि मशीद वारकऱ्यांसाठी खुले करून निवारा दिला. त्यात आश्रय मिळालेल्या वारकऱ्यांना आणि सेवा करणाऱ्यांना तरुणाईला ‘भेदाभेदभ्रम अमंगळ’ या संतवचनाची अनुभूती आली.
लोणंद ते तरडगावच्या वाटचालीत सोमवारी सायंकाळी चांदोबाच्या लिंबजवळ संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण सोहळा झाला. अश्वाची धाव पूर्ण झाल्यानंतर जोरदार पावसाला सुरुवात झाली. अंगावर पावसाच्या सरी झेलत वारकरी तरडगावकडे मार्गस्थ झाले. गावात आल्यानंतर पावसाचा जोर अधिकच वाढला. त्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. पाऊस पडण्याआधीच राहुट्या उभारल्या होत्या. पण, त्यांतही पाणी साचले होते. काहींना पाण्याचा उपसा करून प्लॅस्टिकचा कागद टाकून कशीबशी झोपायची व्यवस्था करून देण्यात आली.मात्र, बहुतांश वारकऱ्यांना पाठ टेकणेही शक्य नव्हते. रात्र बसूनच काढावी लागते की काय अशी स्थिती होती. पाऊस थांबत नव्हता.
गावातील सर्व मंदिरे, हॉल वारकऱ्यांनी भरून गेले होते. शक्य आहे, तिथे गावकऱ्यांनी आपल्या घरांमध्ये वारकऱ्यांना झोपण्यासाठी जागा दिली. ग्रामस्थांनी होईल तेवढे सहकार्य केले. तरीही अनेक वारकरी भिजत होते. राहुल मित्र मंडळ आणि ज्योतिर्लिंग कला विकास तरुण मंडळाचे कार्यकर्ते वारकऱ्यांना निवारा उपलब्ध करून देण्यासाठी धडपडत होते. त्यांनी जीम उघडून दिली. बुद्धनगरमधील अभ्यासिकाही वारकऱ्यांना उघडून दिली. वारकऱ्यांचे हाल पाहून वारकऱ्यांना बुद्धविहार उघडून दिले. तसेच मंडळातील काही मुस्लिम सदस्यांनी मशिदीचे दरवाजे उघडून दिले. त्यामुळे वारकऱ्यांची सोय झाली. तेही निःसंकोचपणे विहार आणि मशिदीत झोपी गेले. सर्व ठिकाणी एकच ईश्वर भरून राहिलेला आहे, हा भाव वारकऱ्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिला. तसेच ग्रामस्थ आणि सर्वधर्मीय भाविकांनीही मनोभावे वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी पुढाकार घेतला.
पालखी सोहळा तरडगावमध्ये असताना इतका पाऊस आधी कधी झाला नव्हता. अतिपावसामुळे वारकऱ्यांची गैरसोय होत होती. त्यामुळे राहुल मित्र मंडळ व ज्योतिर्लिंग कला विकास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन त्यांची सेवा केली.
- अमोल गायकवाड,
माजी उपसरपंच, तरडगाव
काल येथे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय झाली. त्यांची अडचण लक्षात घेऊन आम्ही त्यांच्या निवाऱ्यासाठी मशिदीची जागा उपलब्ध करून दिली. तसेच, वीजपुरवठा, मोबाईल चार्जिंगसाठी सोईसुविधा उपलब्ध करून देत सेवा दिली.
- अस्पाक मोमीन, ग्रामस्थ, तरडगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.