कऱ्हाड : ‘आरं कुणचा म्हणतोय देत न्हाय, घेतल्याशिवाय राहत नाय, बळीराजा शेतकरी संघटनेचा विजय असो...’ आदी घोषणांनी परिसर दणाणला. उसाची एकरकमी एफआरपीसह सहाशे रुपये जादा दर देण्याच्या मागणीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेने सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या घरावर काढलेली संघर्ष यात्रा पोलिसांनी आज येथील दत्त चौकात रोखली. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना अडविल्यानंतर त्यांनी तहसीलदार कार्यालयासमोर जावून धरणे आंदोलन केले.
बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते पंजाबराव पाटील, प्रदेशाध्यक्ष बी. जी. पाटील, प्रदेश युवाध्यक्ष नितीन बागल, जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, सांगली जिल्हाध्यक्ष उन्मेश देशमुख, सोलापूर जिल्हाध्यक्ष रामदास खराडे, जयंत गायकवाड, माऊली जवळेकर, धनाजी चुडमुंगे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
बळीराजा शेतकरी संघटनेने आज येडेमच्छिंद्र ते कऱ्हाड अशी पायी संघर्ष यात्रा काढली. दुपारी चारच्या सुमारास यात्रा कऱ्हाडला पोचली. कार्वे नाका, पोपटभाई पेट्रोल पंपमार्गे दत्ता चौक व तेथून सहकामंत्री पाटील यांच्या घरावर ती संघर्ष यात्रा जाणार होती. मात्र, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी ती संघर्ष यात्रा दत्त चौकात अडविली. तेथेच त्या आंदोलनकर्त्यांना थांबविण्यात आले. त्यानिमित्त शहरात पोलिसांनी बंदोबस्तही ठेवला होता. शहरात जाणारे सारे मार्ग पोलिसांनी रोखले होते. बळीराजा शेतकरी संघटनेने कऱ्हाड शहरातील दत्त चौकात रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले. सहकारमंत्री पाटील यांच्या निवासस्थानी धडकणारी यात्रा अखेर तहसीलदार कार्यालयावर नेण्यात आली. तेथे सभेत त्याचे रूपांतर झाले.
अध्यक्ष पाटील म्हणाले,‘‘ उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळाला पहिजे, या मागणीसाठी संघर्ष यात्रा काढून सहकारमंत्र्यांच्या दारात ठिय्या आंदोलन करणार होते. शासनाने आमची कोंडी करून रोखून धरले.
परंतु, कऱ्हाडला कुठेही बसलो, तरीही त्यांच्या दारात ठिय्या दिल्यासारखा आहे. शेतकऱ्यांना त्यांच्याच हक्काचे पैसे मागण्यासाठी आंदोलने करावी लागत आहे. जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही. साखरेला २८०० रुपये दर असताना शेतकऱ्यांना जो दर मिळत होता. तोच दर ३६०० रुपये झाला तरीही तो दर मिळत आहे. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांची पिळवणूक खपवून घेणार नाही. जोपर्यंत उसाला एफआरपी अधिक सहाशे रुपये दर मिळत नाही, तोपर्यंत आम्ही येथेच ठिय्या मांडणार आहे.’’ या वेळी प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.