निवडणुकीनंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. अनेकांच्या पक्षीय भूमिका बदलल्या. काहीजण राजकारणातून बाहेर पडले.
दहिवडी (सातारा) : दहिवडी नगरपंचायत निवडणुकीचा (Dahiwadi Nagar Panchayat Election) बिगुल वाजला असून बहुरंगी, बहुढंगी लढती पाहण्यास मिळण्याची शक्यता आहे. माणगंगा काठी होणाऱ्या राजकीय लठ्ठालठ्ठीत अनेकांची चलती राहणार, यात शंका नाही. मागील पंचवार्षिक निवडणुकीत १७ जागांपैकी आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने दहा, (कै.) वाघोजीराव पोळ व शेखर गोरे (Shekhar Gore) यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलने सहा, तर अपक्षाने एक जागा जिंकली होती. निवडणुकीनंतर पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. अनेकांच्या पक्षीय भूमिका बदलल्या. काहीजण राजकारणातून बाहेर पडले, तर काहींचा उदय झाला.
या पाच वर्षांत सत्ताधारी सुसाट सुटले, तर विरोधक मुकाट बसले होते. कोरोनामुळे निवडणूक वेळेत होणार की पुढे जाणार, याची उत्सुकता असलेल्या राजकीय मंडळींची अचानक जाहीर झालेल्या निवडणुकीमुळे दमछाक होऊ लागली आहे. प्रभागांचे आरक्षण पूर्वीच जाहीर झालेले असल्यामुळे इच्छुकांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे. प्रभाग राखीव झालेले इच्छुक लगतच्या अथवा सोयीच्या प्रभागाचा शोध घेत आहेत. मात्र, सोयीच्या प्रभागांची मागणी करणारांची संख्या पॅनेलप्रमुखांची डोकेदुखी वाढवणार, हे निश्चित आहे. त्यातच इच्छुक संधी मिळेल त्या पक्षातून, पॅनेलमधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत.
यावेळी आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली भाजप, प्रभाकर देशमुख (Prabhakar Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी, शेखर गोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, रणजितसिंह देशमुख (Ranjitsingh Deshmukh) यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस निवडणुकीच्या मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. रासप, अनिल देसाई गट, डॉ. संदीप पोळ गट, वंचित बहुजन आघाडी हे नक्की काय भूमिका घेणार, यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत. मुख्य चार पक्ष निवडणूक लढविण्यासाठी सज्ज होत असले तरी अंतिम क्षणी युती-आघाड्या अस्तित्वात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. साधारण १३ हजार मतदार असलेल्या या नगरपंचायतीत १७ नगरसेवक निवडून येणार आहेत. मात्र, त्यासाठी साधारण शंभरच्या आसपास इच्छुक निवडणूक लढविण्याची शक्यता आहे.
माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व नुकतीच झालेली सातारा जिल्हा बॅंक निवडणूक या दोन्हींत वेगवेगळी समीकरणे जुळलेली दिसली. समीकरणे दिसताना एक दिसत होती. मात्र, अंतर्गत कुरघोड्या दुसऱ्याच चालल्या होत्या. त्यामुळे या दोन्ही निवडणुकांचा सकारात्मक नव्हे तर नकारात्मक प्रभाव नगरपंचायत निवडणुकीवर पडणार आहे. सामान्य मतदारही राजकीय पक्ष व नेत्यांच्या गमतीजमती पाहून सावध झालेला दिसत आहे. त्यामुळे ही निवडणूक निष्ठेपेक्षा ‘पैसा फेको तमाशा देखो’ अशीच असणार आहे.
संभाव्य नगराध्यक्षपदाच्या दृष्टीने हालचाली
पहिल्या पंचवार्षिकमध्ये सुरुवातीची अडीच वर्षे नगराध्यक्षपद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला व खुल्या प्रवर्गासाठी राखीव होते. साधना गुंडगे, सतीश जाधव, दिलीप जाधव, धनाजी जाधव यांना नगराध्यक्ष होण्याची संधी मिळाली. या पंचवार्षिकसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले नसले, तरी नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण व सर्वसाधारण महिला ही दोन्ही आरक्षणे पडण्याची शक्यता गृहित धरून हालचाली सुरू आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.