आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या राजकीय नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.
सातारा : ओबीसी आरक्षणाच्या (OBC Reservation) मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) दिलेल्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग खुला झाला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्याने सातारा नगरपालिकेची (Satara Municipality) सत्ता टिकवण्यासाठीच्या घुसळणीला वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून सातारा विकास आघाडीकडून Satara Vikas Aghadi (साविआ) सत्तेसाठी या सर्व पर्यायांची चाचपणी सुरू आहे. ही आघाडी ॲक्शन मोडवर आली असली तरी नगरविकास आघाडी Nagarvikas Aghadi(नविआ) मात्र अद्याप सायलेंट मोडमध्येच असल्याचे दिसते. मूळ भाजप (BJP) व महाविकास आघाडीच्याही हालचाली दिसून येत नाहीत.
मनोमिलन खंडित झाल्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीत सातारा विकास आघाडीने नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह 22 नगरसेवक निवडून आणत पालिकेची सत्ता ताब्यात घेतली. ही निवडणूक प्रतिष्ठेची करत ‘साविआ’ने सर्व हातखंडे वापरले. त्याची परिणती पहिल्याच सार्वत्रिक निवडणुकीत वेदांतिकाराजे भोसलेंचा (Vedantikaraje Bhosle) पराभव झाला आणि ‘नविआ’ला फक्त १२ जागा मिळाल्या. या निवडणुकीनंतर ‘नविआ’ने पालिकेच्या सभागृहात आपले अस्तित्व दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु, दोन्ही राजांच्या भाजप प्रवेशामुळे त्यावर नंतर मर्यादा आल्या व ‘नविआ’चा सभागृहातील आवाज कमी झाला. बहुमताच्या जोरावर ‘साविआ’ने पालिकेचे कामकाज रेटत असतानाच हद्दवाढ मंजूर झाली. शाहूपुरी, विलासपूरसह इतर भाग पालिकेत आले. विस्तारामुळे यंदाच्या निवडणुकीनतंर पालिकेच्या सभागृहातील सदस्य संख्या ५० होणार आहे. त्यामुळे शहरावर मांड घट्ट करण्यासाठी या वेळेच्या निवडणुकीला वेगळे महत्त्व आहे.
गत निवडणुकीतील बहुमताच्या जोरावर ‘साविआ’ने अनेक विकासकामे केली. शहरातील प्रत्येक भागात सध्याही कोणते ना कोणते विकासकाम सुरू आहे. त्याआधारेच आगामी निवडणुकांना ते सामोरे जाणार आहेत. ‘साविआ’चे नेत्तृत्व एकहाती, एकखांबी ठेवत निवडणुकीवेळी इतर पक्ष, गटांचे योग्य पध्दतीने ‘साविआ’त समायोजन करण्याची रणनीती उदयनराजेंनी (Udayanraje Bhosale) आखल्याचे दिसून येते. त्या अनुषंगाने बैठकाही सुरू केल्या आहेत. आघाडीत एकसंधपणा टिकवून ठेवत ‘साविआ’ने निवडणुकांवर लक्ष केंद्रित केल्याने साताऱ्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्यास सुरुवात होणार आहे.
‘नविआ’चे सध्याचे नगरसेवकही सक्रिय झाले असले तरी आघाडीचा एकसंधपणा त्यांच्यात दिसत नाही. ‘नविआ’चे सुप्रिमो आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गटबांधणीवर जोर दिला असला तरी दुसऱ्या फळीतील फाटाफुटीमुळे त्यावर मर्यादा पडताना दिसतात. त्यातच गेल्या काही महिन्यांपासून ‘नविआ’विरोधातील अपप्रचार, कुजबुज, अपप्रचार मोहिमेने वेग पकडला आहे. त्यातून आघाडीचे होणारे नुकसान भरून काढण्याचे प्रयत्न शिवेंद्रसिंहराजेंकडून (Shivendrasinharaje Bhosale) होत नसल्याचे दिसते. कुजबुज मोहिमेमुळे शांत, संयमी असणाऱ्या शिवेंद्रसिंहराजेंच्या राजकीय नेतृत्वाची कसोटी या निवडणुकीत लागणार आहे.
दोन्ही राजे भाजपत असल्याने महाविकास आघाडीमधून सातारा पलिकेची निवडणूक लढविण्याचे आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी जाहीर केले. त्याअगोदरपासून राष्ट्रवादीचे नेते दीपक पवार यांनी त्यासाठीची तयारी सुरू केली आहे. शिवसेना, काँग्रेस मात्र अजूनही निद्रावस्थेतच आहे. शशिकांत शिंदे हे पक्षीय पातळीवरून येणाऱ्या सूचनांनुसार आगामी काळात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
सातारा पालिकेच्या यापूर्वी झालेल्या प्रत्येक निवडणुकीत अनेकांनी स्वतंत्रपणे, तर काही जणांनी पक्षांचा आधार घेत स्वतंत्र पॅनेल उतरवली होती. या प्रयत्नांना फारसे यश मिळाले नसले तरी सातारकर विकासाच्या मुद्यावर तिसऱ्या पर्यायाचाही शोध घेताना दिसतात. हा तिसरा पर्याय महविकास आघाडी किंवा शहर सुधारणेच्या बाजूने असणारे मतदारांना उपलब्ध करून देणार का, याची अजून काही काळ वाट बघावी लागेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.