'आगामी निवडणुकीत भाजप एक नंबरवर नेण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध राहणार आहोत.'
बिजवडी (सातारा) : जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे (BJP) संघटन वाढविण्यात युवा मोर्चा सक्षमपणे काम करत आहे. मोर्च्याचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गटागटांत, गणागणांत जबाबदारी घेऊन पक्षाने केलेली लोकहिताची कामे आणि विचारधारा जनतेपर्यंत पोचवावीत, असे आवाहन पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jayakumar Gore) यांनी केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या वाढदिवसापासून सुरू झालेल्या संवाद यात्रेनिमित्त वाई तालुक्यात विविध ठिकाणी आयोजिलेल्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला माजी आमदार मदन भोसले, अतुल पवार, युवा उपाध्यक्ष तेजस जमदाडे, सरचिटणीस यशराज भोसले, प्रदीप कृषीसागर, भाऊसाहेब शेळके, संदीप शेळके, हर्षवर्धन शेळके आणि तालुक्यातील भाजपचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार गोरे म्हणाले, ‘‘गेल्या अडीच वर्षांत पक्षाच्या कार्यकर्त्यांवर काही ठिकाणी अन्याय झाले. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. काही मनमानी अधिकाऱ्यांनी राज्याचा बिहार करायची वेळ आणली होती. आता त्या अधिकाऱ्यांना सुधारणा करून लोकहित समोर ठेऊनच काम करावे लागणार आहे. भाजप युवा मोर्च्याच्या प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याने गावागावांत, घराघरांत पोचून आपली ध्येयधोरणे तळागाळापर्यंत रुजविण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. वाई तालुक्यातील युवा मोर्च्याला लागेल ती ताकद आम्ही देत आहोत. आता कुणाला घाबरायची गरज नाही. जशास तसे उत्तर देत आपण मार्गक्रमण करायचे आहे. लोकांच्या व्यथा ऐकून त्यावर तोडगा काढण्याला कार्यकर्त्यांनी प्राधान्य द्यायचे आहे. लोकांची कामे करताना आता सर्वच अधिकारी आपले ऐकतील. त्यामुळे वेगाने कामे करण्यावर सर्वांनी भर द्यायचा आहे.’’
युवा मोर्च्याचा प्रत्येक कार्यकर्ता सर्व बाजूंनी सक्षम असला पाहिजे. युवक हे संघटनेचा कणा असल्याने वरिष्ठांनीही युवा मोर्चाला पक्ष संघटनेच्या कामात सामावून घ्यायचे आहे. दबावाचे आणि आडवाआडवीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देत मार्गक्रमण करा, असे आवाहनही गोरे यांनी केले. मदन भोसले म्हणाले, ‘‘वाई, खंडाळा तालुक्यातील भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याला लागेल ती ताकद देण्यात आम्ही कमी पडणार नाही. पक्ष संघटन वाढवून आगामी प्रत्येक निवडणुकीत भाजप एक नंबरवर नेण्यासाठी आम्ही सर्व जण कटिबद्ध राहणार आहोत.’’
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.