मंदिरं खुली करण्यासाठी साताऱ्यात खणखणली भाजपची घंटा!

मंदिरं खुली करण्यासाठी साताऱ्यात खणखणली भाजपची घंटा!
Updated on

सातारा : दारूची दुकानं उघडली, मंदिरं कधी उघडणार?, असा सरकारला सवाल करत दार उघड उद्धवा.. दार उघड.., मंदिरं बंद करणाऱ्या सरकारचा धिक्कार असो.., अशी घोषणाबाजी करत भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या सूचनेनुसार आज (ता. २९) पोवईनाक्‍यासह सातारा शहरातील अकरा ठिकाणी घंटानाद आंदोलन केले. 

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात भाजपने मंदिरं खुली करावीत या मागणीसाठी झोपलेल्या राज्य सरकारला जागे करण्यासाठी घंटानाद आंदोलने केली. दरम्यान, सातारा शहरात अकरा ठिकाणी भाजपच्या पदाधिकाऱ्यांकडून आंदोलने करण्यात आली. पोवईनाक्‍यावर सातारा शहराध्यक्ष व नगरसेवक विकास गोसावी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.

यावेळी बोलताना विकास गोसावी म्हणाले, राज्यातील तिघाडी सरकारने आजपर्यंत अनेक चुकीचे निर्णय घेतले आहेत. मंदिरांवर अनेक कुटुंबं अवलंबून आहेत. लॉकडाउन शिथिल करताना विविध व्यवसाय, दारूची दुकाने खुली केली. पण, मंदिरं उघडण्यास परवानगी दिलेली नाही. प्रार्थना स्थळांवर हजारो कुटुंबं अवलंबून आहेत अशावेळी सरकार डोळे बंद करून झोपेचे सोंग घेत आहे. मंदिरं उघडण्यासाठी शासनाला जाग यावी यासाठी आम्ही घंटानाद आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले. 

मंदिरं सुरू करावीत, या मागणीसाठी सिद्धी मारुती मंदिर राजवाडा येथे सातारा शहर कार्यकारणी पदाधिकारी व आजी-माजी नगरसेवक यांनी आंदोलन केले. नवदुर्गा अंबामाता मंदिर मोळाचा ओढा येथे व्यापारी आघाडी, समर्थ मंदिर येथे वैद्यकीय आघाडी, काळा राम मंदिर, मंगळवार पेठ येथे औद्योगिक आघाडी, हनुमान मंदिर सदरबझार येथे कामगार आघाडी, तुळजाभवानी मंदिर पोलिस मुख्यालय शेजारी येथे महिला मोर्चा, मारुती मंदिर झेंडा चौक करंजे येथे भाजपा युवा मोर्चा, आनंदवाडी दत्त मंदिर येथे अनुसूचित जाती मोर्चा, शनि मारुती मंदिर शनिवार पेठ येथे युवती मोर्चा, शाहूनगर दत्त मंदिर, शाहूपुरी दत्त मंदिर येथे आंदोलने झाली. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. तसेच मंदिरं सुरू केली नाहीत, तर आणखी तीव्र आंदोलने करण्याचा इशारा दिला. 

यावेळी जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, ऍड. प्रशांत खामकर, राहुल शिवनामे, सुहास पोरे, किशोर गोडबोले, सिद्धी पवार, विजय काटवटे, प्राची शहाणे, प्रवीण शहाणे, जयदीप ठुसे, विक्रांत भोसले, शैलेंद्र कांबळे, डॉ. उत्कर्ष रेपाळ, डॉ. सचिन साळुंखे, नीलेश शहा, विवेक कदम, प्रदीप मोरे, मनीषा पांडे, डॉ. अजय साठे, वैशाली टंकसाळे, रवि आपटे, रीना भणगे, विक्रम बोराटे, संदीप वायदंडे, दीपिका झाड, किशोर पंडित, नितीन कदम, तानाजी भणंगे आदी सहभागी झाले होते.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.