उभारी घेण्यासाठी अंध विलासची धडपड; रेल्वेत भरती होण्यासाठी तिशीनंतर मिळविले दहावी परीक्षेत यश

लहानपणी अचानक विलासची दृष्टी कायमचीच गेली. त्यामुळे गेंड कुटुंबाचे संपूर्ण जीवनच अंधारमय बनले.
blind vilas struggling for getting job railway 10th passed after age of 30
blind vilas struggling for getting job railway 10th passed after age of 30 Sakal
Updated on

गोंदवले : हलाखीची परिस्थिती, त्यातच संपूर्ण कुटुंब अंध. त्यामुळे जगण्याची लढाई सुरू असलेल्या विलास गेंड याची अंधत्वावर मात करून जिद्दीने उभे राहण्याची धडपड सुरू आहे. रेल्वेत भरती होण्यासाठी वयाच्या तिशीनंतर त्याने नुकतेच दहावीच्या परीक्षेत यश मिळविले. आपल्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी मनकर्णवाडी (ता. माण) येथील विलासच्या जिद्दीला आता साथ मिळण्याची आवश्यकता आहे.

मनकर्णवाडीच्या लोणारवस्तीत दहा बाय दहाच्या दोन खोल्यात अंध बहीण आणि एक डोळ्याने अंध असलेल्या आईसोबत विलास राहतो. लहानपणी अचानक विलासची दृष्टी कायमचीच गेली. त्यामुळे गेंड कुटुंबाचे संपूर्ण जीवनच अंधारमय बनले.

अशा स्थितीतही विलास मात्र खंबीरपणे उभा राहिला. त्याला त्याच्या आईची साथ होतीच; पण उदरनिर्वाहासाठी आईला हातभार लावण्याशिवाय त्याच्याकडे कोणता मार्गही नव्हता. मनात मात्र शिक्षणाची जिद्द बाळगून त्याने मुक्त विद्यापीठातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. स्पर्धा परीक्षेसाठीही प्रयत्न करू लागला.

याच दरम्यान पोटाची खळगी भरण्यासाठी विलासने पुढचं पाऊल उचलले अन् थेट लातूर गाठले. अंध असला तरी आपल्या बुद्धीच्या आणि कौशल्याच्या जोरावर त्याने ॲक्युप्रेशर आणि बॉडी मसाजचे शिक्षण पूर्ण केले.

छोट्याशा घरातच त्याने हा व्यवसायही सुरू केला; पण तेवढ्यावरच समाधान न मानता काहीही झाले, तरी रेल्वे किंवा पोस्टाच्या भरतीत उतरून यश मिळविण्याची धडपड सुरूच ठेवली. या भरतीसाठी दहावी उत्तीर्ण असणे अनिवार्य असल्याने त्यासाठीची वाटचाल सुरू केली.

दहावीत थेट प्रवेश घेऊन शिक्षण घेणे त्याला शक्य नव्हतेच शिवाय खर्चही परवडणारा नव्हता. त्यामुळे विलासने बाहेरून ही परीक्षा देण्याचे ठरवले. परीक्षेचा अर्ज भरण्याची मुदत संपल्याने दोन- तीन संधी हुकली.

मात्र, अखेर गेल्या वर्षी त्याने परीक्षा दिलीच. ब्रेललिपी अथवा अंधांसाठीची इतर साधने उपलब्ध नसल्याने त्याने मोबाईल व्हाइस रेकॉर्डरचा वापर करून अभ्यासाला सुरुवात केली. पुणे, मुंबई येथून आवाजातील अभ्यासक्रम मागविला आणि पहाटे तीन ते पाच या वेळेत अभ्यास करून परीक्षेसाठी सज्ज झाला.

परीक्षेचा पेपर सोडविण्यासाठी त्याने रायटर घेतला. नुकताच या परीक्षेचा निकाल लागला. त्यात विलासने ६२ टक्के गुण मिळवून ध्येयाच्या मार्गावरील एक टप्पा पूर्ण केला. दहावी उत्तीर्ण झाल्याने त्याला आता स्पर्धा परीक्षेसाठी अडचण येणार नाही;

परंतु त्याचं रेल्वे किंवा पोस्ट या केंद्रीय पातळीवरच्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी कष्ट करावेच लागणार आहेत. त्यासाठी तो सिद्धही झालाय; परंतु ध्येयपूर्तीसाठीची लढाई तितकीशी सोपी सुद्धा नसल्याने विलासचे मनोबल वाढविण्यासाठी सहकार्याची आवश्यकता आहे.

डोळे गेल्याने माझ्यासह कुटुंबाचे जीवन अंधकार झाले. सर्व जीवन माझ्या वयस्कर आईवरच अवलंबून आहे. आता दहावी पास झालोय. त्यामुळे माझ्या आई व अंध बहिणीचे जीवन उजळविण्यासाठी ध्येय प्राप्तीसाठी सिद्ध झालोय.

- विलास गेंड, मनकर्णवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.