Body Builder : ‘सिक्स पॅक्स’ला स्टेरॉईडचा विळखा; युवकांनी जागरूक होणे आवश्‍यक

पीळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी काहीही करायची तयारी असलेल्या तरुणाईसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली सप्लिमेंट किंवा औषधे धोकादायक ठरू शकतात.
Steroids
SteroidsSakal
Updated on

सातारा - पीळदार शरीरयष्टी बनविण्यासाठी काहीही करायची तयारी असलेल्या तरुणाईसाठी तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय घेतलेली सप्लिमेंट किंवा औषधे धोकादायक ठरू शकतात. या औषधांमुळे ऐन तारुण्यात हृदयविकाराच्या धोक्याला सामोरे जाऊ शकते.

त्यामुळे मेफेंटरमाईन सल्फेट, स्टेरॉईड यासारख्या औषधांचे सेवन करण्यापासून लांब राहणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत सातत्यपूर्ण तपासणी मोहीम राबवीत जिमच्या माध्यमातून घातक पदार्थाची विक्री होत नाही ना, याकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

1) पीळदार शरीराचे आकर्षण

तंदुरुस्त शरीर यापेक्षा पीळदार व आकर्षक आणि डौलदार शरीराचे तरुणाईमध्ये आकर्षण आहे. त्यामुळे पारंपरिक व्यायामाच्या पद्धतीच्या तुलनेत जिममध्ये जाण्याकडे युवकांचा कल आहे. त्यातही शरीरावर होणाऱ्या परिणामांचा विचार न करता कोणत्याही थराला जाण्याची मानसिकता धोकादायक आहे. त्यातूनच औषधे व अप्रमाणित सप्लिमेंटचा वापर केला जातो. तो अनेकदा धोकादायक ठरलेला आहे.

2) पक्षाघाताचा धोका

धोकादायक औषधे व फूड सप्लिमेंटचा सर्रासपणे तरुणाईकडून वापर होतो. या औषधांच्या अतिसेवनाने हृदयावर परिणाम होतो, तसेच स्नायूही ताणले जातात. या पदार्थांचा वापर बंद केल्यावर स्नायू एकदम आकसतात. त्यामुळे हृदयरोगाबरोबरच पक्षाघाताचा झटका येण्याची शक्यता असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आहारतज्ज्ञही यांचे सेवन करू नये, असेच सांगतात. अशा औषधांची व प्रोटिनची शरीराला गरजच नसते व ही गरज इतर नैसर्गिक पदार्थांमधून भरून काढण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे.

3) किडनी अन्‌ डोळ्यावरही परिणाम

जिममध्ये मिळणाऱ्या प्रोटिन्समध्ये बऱ्याच वेळा ॲनाबोलिक स्टेरॉईड नामक गोष्टींची भेसळ केली जाते. ज्यामुळे शरीर दिसायला पीळदार तर दिसते; परंतु ते आतून पोखरले जाते. या प्रोटिन्सव्यतिरिक्त मेफेंटरमाईन, इफेड्रिन या स्वरूपाची इंजेक्शन दिली जातात. त्यामुळे बऱ्याच वेळा किडनी खराब होणे, हृदयविकाराचा झटका येणे, डोळ्याची दृष्टी जाणे यासारखे प्रकार होऊ शकतात. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधे घेणे धोकादायक आहे.

युवकांना शरीर कमवायचेच असेल, तर ते नैसर्गिक पदार्थांच्या मदतीने करायला हवे. प्रथिने घ्यायची असतील तर ती ऑरगॅनिक आणि नैसर्गिक स्वरूपाची असावीत. अंडी, चिकन तसेच शाकाहारी लोकांसाठी ब्रोकोली, सोयाबीन, कडधान्य व डाळी आदी अनेक पर्याय उपलब्ध आहेत. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे व सप्लिमेंट घेण्याचे टाळले पाहिजे.

- डॉ. रमेश चौगुले, हृदयरोग तज्ज्ञ

फूड सप्लिमेंट आणि न्युट्रा सिटीकल यावर आमच्या विभागाचे नियंत्रण असते; परंतु त्याचा परवाना केंद्र सरकार एफएसएसआयकडून दिला जातो. त्याच्या रिटेलर व होलसेलर दुकानांची विभाकडून तपासणी होत असते. मागील काही दिवसांत आमच्या विभागाने दोन ठिकाणचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. त्याचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे. मेफेंटरमाईन सल्फेट इंजेक्शनचा विषय आमच्या विभागाशी संबंधित येत नाही.

- मंगेश माने, सहायक आयुक्त अन्न विभाग, सातारा

स्टेरॉईड ही खूप घातक आहे. सध्याच्या मुलांकडे संयम कमी आहे. त्यांना लवकर बॉडी बनवायची असते; परंतु प्रत्येक गोष्टीला त्याचा-त्याचा वेळ दिलाच पाहिजे. युट्यूब व गुगलवर अनेक सर्टिफाईड ट्रेनरच्या नावाखाली युवकांना वेडे बनवत आहेत. नवीन ट्रेनरपासून हा सर्वांत जास्त धोका आहे. चुकीच्या औषधांमुळे बनलेले शरीर तात्पुरते ठरते. औषधे बंद केले, की शरीर संपते आणि त्रासही सुरू होतो. त्यामुळे वजन वाढविणे असो किंवा कमी करणे युवकांनी चुकीच्या गोष्टींपासून लांब राहिले पाहिजे. त्यामुळे पैसेही जातात आणि शरीरही. मेहनत करायची नसेल, तर या क्षेत्रात येऊच नये.

- नवनाथ साळुंखे, महाराष्ट्र श्री व जिम असोसिएशन अध्यक्ष

पाच-सहा महिन्यांत भारदस्त पीळदार शरीर व्हावे, तगडं दिसावे, यासाठी आत्ताची पिढी इंजेक्शन, स्टेरॉईड यासारख्या गोष्टींना प्राधान्य देते, याचं वाईट वाटतं. या सर्व गोष्टी आरोग्याच्या दृष्टीने घातक आहेत. या गोष्टींचा आधार घेतल्याने तरुणांवर झालेल्या विपरित परिणामांची उदाहरणं देखील आपल्या डोळ्यासमोर घडल्याचे आपण पाहिले आहे. व्यायाम करणाऱ्या प्रत्येकाने आहारात चिकन, अंडी, केळी, काजू, बदाम, दूध, डाळी याला प्राधान्य द्यावे, हेच आम्ही व्यायामशाळेतील मुलांना सुचवितो.

- सुनील लावंघरे, व्यवस्थापक, भिडे व्यायाम शाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com