जवान सावंत यांच्या अंत्ययात्रेदरम्यान ‘अमर रहे अमर रहे... सुनील सावंत अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या.
सातारा : लिंब (ता. सातारा) येथील सुपुत्र व सध्या राधाबाडी (West Bengal) येथे बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये (Border Security Force BSF) कार्यरत असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत (वय ३६) यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर काल (बुधवार) सकाळी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
या वेळी ‘बीएसएफ’च्या जवानांनी त्यांना (Jawan Sunil Sawant) मानवंदना देत रायफलच्या तीन फैरी झाडत सलामी दिली. सर्वसामान्य कुटुंबातील सुनील सावंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत २०१० मध्ये बीएसएफमध्ये लातूर येथे भरती झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लिंब, तर माध्यमिक शिक्षण श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह विद्यालयात झाले. महाविद्यालयीन शिक्षण सातारा येथील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये घेतले.
त्यांचे नऊ वर्षांपूर्वी सारिका यांच्याबरोबर लग्न झाले असून, त्यांना सहा वर्षांचा एक मुलगा आहे. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी, एक मुलगा, दोन भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. त्यांचे चुलत भाऊ सागर सावंत हेही रंगापाडा (आसाम) येथे लष्करात सुभेदार पदावर आहेत.
सुनील यांनी गुजरात, राजस्थान, छत्तीसगड येथे सेवा बजाविली आहे. २०२१ पासून राधाबाडी (पश्चिम बंगाल) येथे कार्यरत होते. त्या ठिकाणी कर्तव्य बजावताना दोन आठवड्यांपासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांपासून त्यांना बरे वाटू लागल्याने रुग्णालयातून सोडणार होते. मात्र, अचानक सोमवारी (ता. २३) पुन्हा अस्वस्थ वाटू लागल्याने तत्काळ अतिदक्षता विभागात दाखल केले. यादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे निधन झाले.
राधाबाडी (पश्चिम बंगाल) येथे मानवंदना दिल्यानंतर आज सकाळी त्यांचे पार्थिव लिंबमध्ये आणण्यात आले. या वेळी लिंब फाट्यापासून सजविलेल्या ट्रॅक्टरमध्ये पार्थिव ठेऊन अंत्ययात्रा काढण्यात आली. ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर फुले वाहत मानवंदना दिली जात होती. सुनील यांच्या पार्थिवास वडील तुळशीदास सावंत आणि मुलगा श्रीतेज यांनी अग्नी दिला.
या वेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विश्वजित घोडके, मंडलाधिकारी प्रभाकर कुलकर्णी, सातारा पंचायत समितीच्या माजी सभापती सरिता इंदलकर, सरपंच ॲड. अनिल सोनमळे, अजिंक्यतारा कारखान्याचे माजी अध्यक्ष सर्जेराव सावंत यांच्यासह मान्यवरांनी सुनील यांना श्रद्धांजली वाहिली.
जवान सावंत यांच्या अंत्ययात्रेदरम्यान ‘अमर रहे अमर रहे... सुनील सावंत अमर रहे’च्या घोषणा देण्यात आल्या. मानवंदना देताना त्यांच्या पत्नीने दिलेल्या ‘भारत माता की जय’च्या घोषणेने उपस्थितांना गहिवरून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.