कऱ्हाड - चोऱ्या, फसवणूक करणाऱ्या टोळीची एक चूक पोलिसांच्या रेकॉर्डवर आली अन् तोच धागा पकडून पोलिसांनी त्या टोळीचा पर्दाफाश केला. सातारा जिल्ह्यात डोकेदुखी ठरलेली परराज्यातील बनावट सोने विकणाऱ्या भामट्यांची टोळीला कऱ्हाड पोलिसांनी गजाआड केले. कोणताही पुरावा नसताना केवळ भामट्यांचा अंदाज आल्याने, टोळी गजाआड झाली. त्यांच्याकडून बारापेक्षाही जास्त फसवणुकीचे गुन्हे उघडकीस आले. त्यानंतर जिल्ह्यात अशी टोळी आलीच नसल्याचे पोलिसांच्या रेकॉर्डला नोंद आहे.
सोन्याच्या खाणीतील कामगार आहोत, खाणीतील खनिज खोदताना सापडलेले सोने विकण्यासाठी आलो आहे, असे सांगून कऱ्हाडसह सातारा जिल्ह्यातील विविध गावांतील महिला, ज्येष्ठ नागरिकांसह नागरिकांनाही भावनिक करून त्यांनाच गंडा घालणाऱ्या टोळीने अक्षरशः धुडगूस घातला होता. कोण आहेत, त्यांचे वर्णन काय? याची काहीच माहिती पोलिसांच्या हाती नसताना टोळीचा पर्दाफाश केला. तो केवळ डमी खरेदीदारामुळेच.
फसवणूक झालेली व्यक्ती आली, की त्यांच्याकडून पोलिस माहिती घेत होते. खबऱ्याद्वारे सोन्याच्या दागिन्याची तस्करीद्वारे विक्री करणारे भागात आल्याची पोलिसांना माहिती मिळाली. डमी खरेदीदार तयार करून त्याद्वारे सापळा रचून पाच जणांच्या टोळीचा पाठलाग करून पोलिसांनी पकडले. कऱ्हाड शहर, तालुक्यासह जिल्ह्यातील सुमारे १३ हून अधिक ठिकाणी बनावट सोने विकल्याचे तपासात समोर आले. सोन्याचे म्हणून पितळेचे दागिने विकले होते. तेच दागिने विकताना त्यांचा घात झाला अन् ते पोलिसांच्या हाती सापडले.
भामट्यांच्या टोळीने पोलिस हैराण झाले होते. बनावट सोने विकणाऱ्या टोळीने जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात सुमारे २५ गुन्हे दाखल होते. त्या ठराविक कालावधीत एकाच वेळी महिन्याच्या फरकात घटना घडल्या होत्या. त्यामुळे पोलिसही हैराण होते. दाखलपेक्षा पोलिसांत न आलेल्या तक्रारींची संख्या जास्त होती. तक्रार देणार नाही, असे सांगणारे फोनही येत होते. पोलिस हैराण तर भामटे सुसाट होते. काय करावे, तेच कळत नव्हते. त्यात कऱ्हाड शहरात नऊ गुन्हे घडले होते. पोलिसांनी त्यांच्या खबऱ्यांना अलर्ट केले. खेड्यात राहणारे खबरीही अलर्ट होते. त्यांना घटनेची माहिती देऊनही हाती काहीच येत नव्हते.
तत्कालीन पोलिस निरीक्षक एम. एस. गावडे, पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे व त्यांचे डीबी पथकाला यश मिळत नव्हते. पोलिसांनी घटनांचा अभ्यास केला. त्या घटना दुपारी घडल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्याप्रमाणे वॉच ठेवला. एके दिवशी पोलिस निरीक्षक पायगुडे यांना फोन आला. साहेब, काही लोक माझ्याकडे आले आहेत. ते मध्य प्रदेशातील आहेत, असे सांगून सोने विकण्यास आल्याचे त्यांना पलीकडून सांगण्यात आले. त्यामुळे पोलिसांचे डोळे विस्फारले. ते सोने कऱ्हाडला विकत घेतो, असे सांगून येथे आणण्याचे पायगुडे यांनी खबऱ्याला सुचवले. पोलिसांनीही तसा सापळा रचला. त्यानुसार कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रत्यक्षात काही लोक आले. बनावट सोन्याच्या माळा बाहेर काढताच पोलिसांनी छापा टाकून त्यांना पकडले. त्यातील दोघांना पाठलाग करून पकडले. संबंधित संशयित मध्य प्रदेशातील होते. त्यांनी ३० हून अधिक लोकांना गंडा घातला होता. त्या सगळ्या गुन्ह्याचा छडा पोलिसांनी लावला.
तपासातील शिलेदार...
तत्कालीन पोलिस उपअधीक्षक मनोज पाटील, पोलिस निरीक्षक एम. एस. गावडे, पोलिस निरीक्षक जयराम पायगुडे, फौजदार अर्जुन चोरगे, अनिल चौधरी, धनंजय कोळी, चंद्रकांत राजे- कुंभार, फिरोज मुल्ला, लक्ष्मण जाधव, महेश सपकाळ, संजय बोबडे, संतोष कोळी यांचा समन्वय व कल्पकतेने तपास झाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.