लज्जास्पद! माण तालुक्‍यात गर्भवती महिलेला मारहाण, तीन महिलांसह सहा संशयितांवर गुन्हा

लज्जास्पद! माण तालुक्‍यात गर्भवती महिलेला मारहाण, तीन महिलांसह सहा संशयितांवर गुन्हा
Updated on

म्हसवड (जि. सातारा) : शेजारी राहणाऱ्या मुलीस पळून जाण्यास मदत केल्याच्या रागातून संबंधित मुलीच्या कुटुंबीयांनी माण तालुक्‍यातील एका गावातील 27 वर्षीय विवाहित गर्भवती महिलेला विवस्त्र करून मारहाण केली. ही घटना 25 ऑक्‍टोबरला सकाळी 11 वाजता घडली. मात्र, काल रात्री गुन्ह्याची नोंद झाली आहे. या प्रकरणातील सहाही संशयित फरारी आहेत. त्यात तीन महिलांचाही समावेश आहे. 

पोलिसांनी सांगितले, की संबंधित महिला ही माण तालुक्‍यातील एका गावात मुलगी व सासू-सासऱ्यांसह राहते. तिचे पती हे नोकरीनिमित्त पुण्यात राहतात. या महिलेच्या घराशेजारीच संजय श्रीरंग तुपे हे कुटुंबीयांसह राहतात. ही महिला तीन महिन्यांची गर्भवती आहे. या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या मुलीने महिन्यापूर्वी पळून जाऊन प्रेमविवाह केला आहे. त्यासाठी संबंधित महिलेने मदत केल्याच्या रागातून संजय तुपे व त्यांच्या कुटुंबातील लोक या महिलेसह तिच्या कुटुंबीयांना वारंवार शिवीगाळ करत होते. 25 ऑक्‍टोबरला सकाळी अकराच्या सुमारास ही महिला भांडी घासण्यासाठी घराबाहेर गेली. त्या वेळी शेजारी राहणारे मीनाक्षी संजय तुपे, साकरूबाई विष्णू तुपे, कल्पना आण्णा तुपे, संतोष विष्णू तुपे, संजय श्रीरंग तुपे, आण्णा श्रीरंग तुपे हे सर्व जण महिलेच्या घरासमोर आले. "आमच्या पोरीला तू पळवून न्यायला मदत केलीस, तुला आता सोडणार नाही, तुझ्या पोटातील बाळ आता येऊ देणार नाही,' असे म्हणत मीनाक्षी हिने त्या महिलेचा डावा हात धरून ओढले. त्यामुळे ती महिला तोल जाऊन खाली पडली. 

तेवढ्यात साकरूबाई, कल्पना, संतोष, संजय व आण्णा या सर्वांनी या महिलेस शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. महिलेच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिच्या घराशेजारी राहणाऱ्या कलावती दत्तू साळुंखे, सुरेखा दादा साळुंखे या दोघींनी भांडणे सोडविण्याचा प्रयत्न केला. त्या दोघींनाही सर्वांनी धमकावत परत पाठवले. "मोहन मोतिराम साळुंखे हे वालुबाईच्या शिवारात शेळ्या राखत आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊन झालेल्या प्रकाराबाबत सविस्तर बोलू,' असे सांगत साकरूबाई व कल्पना यांच्याबरोबर संबंधित महिलेस घेऊन गेले. दुपारी एकच्या सुमारास सर्व जण तेथे पोचले. त्या ठिकाणी झाल्या प्रकाराबाबत चर्चा झाली. त्यानंतर तहान लागल्याने जवळच असलेल्या झऱ्यावर पाणी पिण्यासाठी जाताना काही अंतरावर साकरूबाई, कल्पना, मीनाक्षी या तिघींनी गर्भवती महिलेला हाताने ओढत "हिला आता सोडायची नाही,' असे म्हणत डोंगरावर खेचत नेले. 

त्यानंतर साकरूबाई व मीनाक्षी यांनी त्या महिलेस इतर पुरुषांच्या समोरच विवस्त्र करून हाताने, लाथाबुक्‍यांनी मारहाण केली. "कोण हिला मदत करते ते बघूया. हिला अशीच गावातून विवस्त्र अवस्थेत फिरवायची आहे,' असे म्हणत सर्व जण तेथेच थांबले. या झटापटीत संबंधित महिलेच्या गळ्यातील दीड तोळ्याचे सोन्याचे मणीमंगळसूत्र तुटून गहाळ झाले. अंगावर कपडे नसल्याने ही महिला मदतीसाठी ओरडत होती. त्या आवाजाने जवळच शेतात काम करणारे जनार्दन संदिपान साळुंखे, बालिका जनार्दन साळुंखे, महादेव गणपत साळुंखे हे तेथे आले. त्यांनी दिलेली कपडे महिलेने घातली. गर्भवती महिलेच्या मदतीकरिता तेथे आलेल्या जनार्दन, बालिका व महादेव यांना शिवीगाळ करत सर्व जण तेथून निघून गेले. 
 
सर्व संशयित फरारी 
संबंधित गर्भवती महिलेने काल (ता. 28) मीनाक्षी तुपे, साकरूबाई तुपे, कल्पना तुपे, संतोष तुपे, संजय तुपे, आण्णा तुपे यांच्याविरुद्ध म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. हे सर्व संशयित फरारी आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.