मुख्यमंत्र्यांचा दौरा कोयनापुत्रांना वरदायिनी ठरणार?

मुख्यमंत्र्यांचा दौरा कोयनापुत्रांना वरदायिनी ठरणार?
Updated on

कोयनानगर (जि. सातारा) : जवळजवळ दशकानंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे आज (ता. दहा) कोयना विभागाच्या दौऱ्यावर येत आहेत. ज्या कोयना धरण आणि जलविद्युत प्रकल्पामुळे राज्याचे भाग्य बदलले आहे, त्या भाग्यलक्ष्मीची वाताहत, त्यासाठी अनमोल त्याग करणाऱ्या कोयनापुत्रांचे दैन्य आजही कायम आहे. श्री. ठाकरे यांचा दौरा कोयना प्रकल्पाला व विकासाचे सैनिक असणाऱ्या कोयनापुत्रांना वरदायिनी ठरेल का? रखडलेले अनेक बहुउद्देशीय प्रकल्प मार्गी लागणार का? कोयना प्रकल्पग्रस्तांची रखडलेली पुनर्वसन प्रक्रिया गती घेणार का, असे सवाल दौऱ्याच्या निमित्ताने कोयनापुत्रांकडून विचारले जात आहेत. 

राज्याच्या विकासाचे महाशिल्प म्हणून ओळख असणारे 105.25 टीएमसी क्षमतेच्या कोयना धरणाकडे जनतेला तिमिरापासून तेजाकडे नेणारा प्रकल्प म्हणून बघितले जाते. महाराष्ट्रातील एकूण जलविद्युत निर्मितीपैकी 59 टक्के वीज एकट्या कोयना जलविद्युत प्रकल्पात तयार होते. 1962 पासून आजपर्यंत प्रकल्पातून दरवर्षी कोट्यवधी युनिट्‌स विजेची निर्मिती झालेली आहे. चार टप्प्यांच्या माध्यमातून दरवर्षी मिळणारे उत्पन्न 500 ते 600 कोटी आहे. दरवर्षी सरासरी 60 हजार हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली येते. यामुळे कृष्णा खोऱ्यातील लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असल्याने कोयना ही राज्यासाठी भेटलेली सोन्याची खाण आहे. कोयना जलविद्युत प्रकल्पातून आजमितीला वार्षिक 355 कोटी युनिट्‌स एवढी वीजनिर्मिती होते. दिवसाला प्रकल्पातून एक कोटी युनिट्‌स एवढी वीज तयार होते. कोयनेची वीज एक रुपये 20 पैशाला तयार केली जाते. कोयनेची एक युनिट वीज ही चार रुपयाला बाजारपेठेमध्ये ग्राहकाला देण्यात येत असल्याने दरवर्षी कोयनेच्या विजेतून शासनाला 15 अब्ज 20 कोटी रुपयांचा महसूल मिळतो. कोयना जलविद्युत प्रकल्पाचे एकूण दहा टप्पे प्रस्तावित असले तरी चार टप्पे पूर्ण झाल्यावरच या प्रकल्पाला घरघर लागली आहे. 

कर्नाटक राज्याने अलमट्टी धरणाची उंची वाढवलेली आहे. याला महाराष्ट्रातून विरोध होत असला तरी कृष्णा तंटा पाणीवाटप लवादाने कोयना धरणातील 25 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा महाराष्ट्राला देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय केंद्राने दिला आहे. महाराष्ट्र सरकारने कर्नाटक सरकारच्या कृतीला विरोध करण्याऐवजी महाराष्ट्राच्या वाट्याला मंजूर केलेला 25 टीएमसी अतिरिक्त पाणीसाठा पदरात पाडून घेण्यासाठी प्रयत्न करावा. यामुळे जलविद्युत निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे. प्रस्तावित प्रकल्प मार्गी लागले तर कोयना जलविद्युत प्रकल्पातून सात हजार मेगावॉट वीजनिर्मिती होऊन महाराष्ट्र राज्य विजेच्याबाबतीत स्वयंपूर्ण होणार आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे कोयनेत कोणती घोषणा करतात, त्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. 

पायथा वीजगृह प्रकल्पाचे काम बंद 

कोयना धरणाच्या डाव्या तीरावर 80 मेगावॉट क्षमतेचे वीजगृह, कोयना जलविद्युत प्रकल्पाचा टप्पा पाच व टप्पा सहा असे प्रस्तावित असणाऱ्या तीन प्रकल्पांतून सुमारे 1,500 मेगावॉट वीजनिर्मिती होणार आहे. यातील पायथा वीजगृह प्रकल्पाचे काम 40 टक्के पूर्ण झाले आहे. या कामाला शासनाने सुधारित प्रशासकीय मान्यता दिली नसल्याने पाच वर्षांपासून हे काम बंद अवस्थेत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.