जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर 'डॅशिंग' अधिकारी मुंडेंची नजर?

जीवन प्राधिकरणाच्या कारभारावर 'डॅशिंग' अधिकारी मुंडेंची नजर?
Updated on

सातारा : जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयातील पाणी मीटर रीडिंग व बिलांच्या वाटपातील सावळागोंधळ सुरूच आहे. कोरोनामुळे अनागोंदी कारभाराला चांगलीच संधी मिळाली असून, त्याचा नागरिकांना दुहेरी फटका बसत आहे. एकतर, सहा-सहा महिन्यांची अंदाजे बिले काढण्यात आली असून, आता कर्मचारी आजारी असल्याचे कारण देत बिलांमधील दुरस्तीही होणार नसल्याचा फलक लावण्यात आलेला आहे. त्यामुळे शहर आणि उपनगरांतील नागरिकांना झटका बसत आहे.
 
शहरालगतच्या शाहूपुरी, शाहूनगर, खेडसह इतर उपनगरांत जीवन प्राधिकरणाच्या वतीने सुमारे चार हजारांपेक्षा जास्त ग्राहकांना पाणीपुरवठा करण्यात येतो. पुरविण्यात आलेल्या पाण्याची नोंद घेणे आणि त्यानुसार त्याची आकारणी करणारे बिल देण्यासाठी प्राधिकरणाच्या वतीने एका ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती; परंतु या ठेकेदाराला गेल्या वर्षभरापासून या कामाचे नियोजन योग्य पद्धतीने करणे जमलेले नाही. वास्तविक दर दोन महिन्यांनी ग्राहकांना कोणत्याही परिस्थितीत पाणीबिलाचे वाटप केले जाणे बंधनकारक आहे. तसे राज्य शासनाचे आदेश आहेत; परंतु सुरवातीपासूनच या ठेकेदाराच्या कालावधीत शासनाच्या या धोरणाला हरताळ फासला गेला आहे. 

चार-चार महिन्यांनी बिलांचे वाटप केले जाते. तेही काही जणांना मिळत नाही. मीटर रीडिंग न करताच काहींना बिले आकारल्यामुळे अव्वाच्या सव्वा बिले नागरिकांना दिली जात आहेत. काहींना तर लाखो रुपयांची बिले पाहून धक्काच बसला होता. कोरोनामुळे तर प्राधिकरणाच्या या कारभाराला आयती संधी मिळत आहे. वीज वितरण कंपनीने तातडीने मीटर रीडिंग सुरू करून ग्राहकांना योग्य बिले पाठविण्यास सुरुवात केली; परंतु कोरोनाची संधी साधत प्राधिकरणाने पाण्याची सहा-सहा महिन्यांची बिले एकदम काढली आहेत. त्यातही सर्व रीडिंग हे अंदाजेच टाकण्यात आली आहेत. त्यामुळे अनेकांना वापरापेक्षा जास्त बिले आली आहेत. एक तर, उशिरा बिले मिळाली तीही अंदाजे. त्यामुळे नागरिक बिलांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी कार्यालयाच्या पायऱ्या झिजवत आहेत; परंतु तेथेही कोरोनाचा दुहेरी फटका नागरिकांना बसत आहे. 

कार्यालयातील काही जण आजारी आहेत, त्यामुळे सहा तारखेपर्यंत कोणी बिल दुरुस्तीसाठी येऊ नये, असा फलक कार्यालयात लावण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना फुकटचा हेलपाटा पडत आहे. वास्तविक ठेकेदाराच्या नियमबाह्य कार्यपद्धतीबाबत जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून ठोस कारवाई होणे आवश्‍यक होते; परंतु जीवन प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी या चुकीच्या कारभाराकडे का डोळे झाक करतायत हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. टेंडर संपले असताना काम तेही चुकीच्या पद्धतीने का सुरू ठेवण्यामागचे कारण काय हे ग्राहकांना समजत नाही. त्यामुळे नागरिकांना चुकीच्या बिलांचा फटका बसत आहे. 

सातारच्या प्राधिकरणाकडे तुकाराम मुंडेंनीच लक्ष द्यावे 
साताऱ्यातील जीवन प्राधिकरणाच्या कामकाजातील अनागोंदीमुळे नागरिकांना वारंवार त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच अधिकाऱ्यांच्या धृतराष्ट्री भूमिकेमुळे ठेकेदार आणि त्यांच्या बगलबच्च्यांच्या अंधाधुंद कारभारात काहीच फरक पडत नाहीये. त्यामुळे ठेकेदाराला पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवरच कारवाई होण्याची आवश्‍यकता आहे. राज्यामध्ये एक 'डॅशिंग' अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढेंकडे आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जबाबदारी आली आहे. त्यांनी सातारा जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयाच्या एकूणच कारभाराचे पोस्टमार्टम करणे आवश्‍यक आहे, तरच सातारकरांची सततच्या त्रासातून मुक्तता होईल. अन्यथा हा प्रकार असाच सुरु राहणार असून याचा नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागणार आहे.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.