सातारा : व्हॉटस्ॲपवरून लॉटरीसाठी तुमचा क्रमांक निवडल्याचे मेसेज येतात. तुम्हाला भेटवस्तू मिळणार असून, ती घेण्यासाठी कुरिअर सेवा अधिकारी फोन करतो. कुरिअर विमानतळावर अडकले असून, ते सोडविण्यासाठी पैशांची मागणी होते, तसेच काही वेळा लॉटरीचे पैसे खात्यावर वर्ग करण्यासाठी अनोळखी ॲप डाऊनलोड करण्यास सांगून तुमच्या खात्यातील रकमेवर डल्ला मारला जातो. अशा फसव्या कॉल्सपासून सावध राहून फसवणूक टाळण्याची गरज आहे.
लोकांचा शेअर बाजारात गुंतवणुकीकडे वाढत असलेला कल पाहून लोकांना फसवणुकीच्या जाळण्यात ओढण्याचे प्रकार वाढत आहेत. शेअर बाजारातून ३०-४० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखविण्यात येते. टेलिग्रामवर अशी गुंतवणूक करवून घेणारे अनेक ग्रुप सध्या कार्यरत आहेत. यातील अनेक संचालक परदेशातून सेमिनारद्वारे माहिती देतात. मात्र, जेव्हा पैसे काढण्याची वेळ येते, तेव्हा तुम्ही पैसे काढू शकत नाही. सायबर भामटे तुमची फसवणूक करून पसार झालेले असतात.
बनावट शेअर मार्केट प्लॅटफॉर्मचा सुळसुळाट...
सोशल मीडियावर बनावट शेअर मार्केट प्लॅटफॉर्ममध्ये वाढ झाली आहे. गुंतवणुकीसाठीच्या जाहिराती यावरून पाठविल्या जात आहेत. अशावेळी संकेतस्थळाला मिळालेले रिव्ह्यू, प्रायव्हसी पॉलिसी, अटी व नियम यांची तपासणी करून घेणे गरजेचे आहे.
कोणत्याही चॅनेलवर गुंतवणुकीपूर्वी थोडा विचार करून त्याची माहिती घेतली पाहिजे. फेसबुक, इन्स्टाग्राम, व्हॉटस्ॲप, टेलिग्रामवर जाहिरात करणाऱ्या अनधिकृत युआरएलवर क्लिक अथवा डाऊनलोड करणे टाळले पाहिजे.
क्रेडिट स्कोअर वाढविण्याचे आमिष
सध्या बॅंकांमध्ये कर्ज काढताना संबंधित कर्जदाराचा क्रेडिट स्कोअर तपासला जातो. यामुळे प्रत्येकाची हा क्रेडिट स्कोअर सुधारण्याची धडपड सुरू असते. याचाच गैरफायदा घेत हॅकर्स क्रेडिट कार्ड कंपनीतून बोलत असल्याचे सांगून तुमच्या खात्यावरून मोठे व्यवहार झाल्याची भीती घालतात.
क्रेडिट स्कोअर सुधारून देण्यासाठी कार्डची माहिती घेतात. यानंतर काही वेळातच खात्यावरून रक्कम काढून घेतली जाते. यासाठी आपल्या खात्याची माहिती अशा अनोळखी कॉल्सद्वारे न देता बॅंकेत जाऊन योग्य माहिती घेणे हिताचे ठरेल.
नजरचुकीने पैसे आल्याचा दावा
बॅंक व्यवहारात चूक झाल्याने तुमच्या खात्यावर चुकून रक्कम आल्याचा कॉल येतो. अशी रक्कम काही काळ दिसतेही. मात्र, सायबर गुन्हेगार तुमच्या खात्याची माहिती मिळवून सर्वच रक्कम हडप करतात. तुमची रक्कम काही दिवसांनी मिळेल असे सांगून वेळ मारून नेतात; पण प्रत्यक्षात तुमच्याच खात्यातील रक्कम हडपली जाते.
स्कॅम ॲपपासून सावध राहा
तुमचे लॉगिन तपशील, ओटीपी चोरण्यासाठी.apk हे बनावट ॲप बनविले आहे. ई-मेल, व्हॉटस्ॲपवर अशा फाइल पाठविण्यात येतात. ते उघडताच तुमच्या मोबाईलचा किंवा संगणकाचा ताबा हॅकर्सच्या हाती जातो. याद्वारे तो तुमच्या खात्यातील रक्कम काढू शकतो. अशा खोट्या माहिती देणाऱ्या ॲपपासून सावध राहणे आवश्यक आहे.
अशी घ्यावी दक्षता...
कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नका.
.apk या फाइल ओपन केल्यास तुमचा फोन हॅक होऊ शकतो.
तुम्हाला फोन करणाऱ्या अनोळखी व्यक्तीची ओळख पटवून घ्या.
वैयक्तिक माहिती मागणारे कॉल, ई-मेलपासून सावध राहा.
मौल्यवान वस्तू कुरिअरद्वारे पाठविणे टाळा.
आर्थिक फसवणूक झाल्यास cybercrime.gov.in या वेबसाइटवर तक्रार नोंदवा.
#ElectionWithSakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.