डॉक्‍टर.. तुम्ही सुद्धा ! अहाे, हे वागणं बर नव्हं

डॉक्‍टर.. तुम्ही सुद्धा ! अहाे, हे वागणं बर नव्हं
Updated on

सातारा : जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सकांचे प्रयत्न सुरू आहेत. तरीही बाह्यरुग्ण विभागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत अद्याप मोठी सुधारणा करणे अत्यावश्‍यक आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांअभावी होणारी रुग्णांची परवड थांबविण्यासाठी दोन्ही अधिकाऱ्यांनी नियोजनाच्या काटेकोर अंमलबजावणीकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे. 

खासगी रुग्णालयांतील बाह्यरुग्ण विभाग असो वा आंतररुग्ण या ठिकाणी उपचाराचे दर वाढलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभाग हा अत्यंत महत्त्वाचा आधार आहे. दररोज सुमारे हजारांवर लोक येथे विविध आजारांच्या उपचारांसाठी येत असतात. कोरोना काळातील लॉकडाउननंतर ही गर्दी पुन्हा वाढू लागली आहे. बाह्यरुग्ण विभागाची हीच निकड व नागरिकांना होणारा फायदा लक्षात घेऊन शासनाने केवळ सकाळी असणारी ओपीडी सायंकाळीही सुरू केली आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्यानंतर मात्र, बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज काही प्रमाणात ढिसाळ होत गेल्याचे दिसून येत आहे. त्यांच्या नंतरच्या काळात वैद्यकीय अधिकाऱ्यांवर नियंत्रण कमी झाल्याने काही अपवाद वगळता बाह्यरुग्ण विभागाचे काम योग्य राहिले नाही. 

डॉ. श्रीकांत भोई यांच्या काळात त्याचा उच्चांकच झालेला होता. डॉ. गडीकर यांनी सुरवातीच्या टप्प्यात त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, नंतरच्या काळात त्यांचेही नियंत्रण राहिले नाही. त्यातच कोरोना काळामध्ये आरोग्य विभागाची प्राथमिकता बदलली गेली. गेले वर्षभर आरोग्य व्यवस्था कोरोनावरच लक्ष केंद्रित करून आहे. परंतु, लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर जिल्हा रुग्णालयातील बाह्यरुग्ण विभागात पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. त्यामुळे बाह्यरुग्ण विभागाकडे लक्ष देण्याची आवश्‍यकता निर्माण झाली आहे.

डॉ. सुभाष चव्हाण व डॉ. रामचंद्र जाधव यांनी अनुक्रमे जिल्हा शल्यचिकित्सक व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा रुग्णालयाच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. त्याचा परिणाम जिल्हा रुग्णालयामध्ये जाणवत आहे. परंतु, बाह्यरुग्ण विभागाच्या बाबतीत त्यांनी अधिक सतर्क होणे आवश्‍यक आहे हे नक्की. सकाळच्या ओपीडीवेळी नागरिकांच्या रांगा लागतात. अर्धा ते एक तास केसपेपर मिळविण्याच्या धडपडीतच रुग्णाला घालावा लागत आहे. त्यानंतर ओपीडी कक्षात डॉक्‍टरांच्या शोधासाठी त्यांना ताटकळावे लागते. अपवाद वगळता कोणताही वैद्यकीय अधिकारी नऊ वाजता आपल्या कक्षात हजर नसतो. अनेक महाशय दहानंतर कक्षात हजेरी लावतात. चार-दोन रुग्ण पाहिले की पडले बाहेर. त्यानंतर शिकाऊ डॉक्‍टरांकडेच ओपीडीचा ताबा. त्यामुळे रुग्णांच्या आजाराचे योग्य निदान होईल की नाही, असा प्रश्‍न उपस्थित होतो. काही तपासण्या करून येईपर्यंत वैद्यकीय अधिकारी जाग्यावर सापडेलच, याची शाश्‍वती नसते. त्यामुळे रुग्णाला सायंकाळपर्यंत थांबावे लागते. 

सायंकाळची वेळ अधिक जिकिरीची 

सायंकाळच्या ओपीडीचा प्रश्‍न अधिक गंभीर आहे. कोण येते, कोण नाही, याची व्यवस्थापनातील कोणाला माहिती असते का, हाच खरा प्रश्‍न आहे. त्याची तसदीही कोणी घेताना दिसत नाही. चार वाजता कोणी हजर नसते. साडेचार-पावणेपाचला येऊन अनेकजण पाचला बाहेर पडण्याच्या मार्गावर असतात. सहापर्यंतची वेळ असताना साडेपाचनंतर तर सर्व विभाग रिकामेच दिसतात. त्यामुळे सायंकाळच्या ओपीडीचा पुरेपूर लाभ रुग्णांना मिळत नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना करणे आवश्‍यक आहे.

फलटणात कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या टेंपोवर पोलिसांचा छापा; 17 लाख मुद्देमालासह 36 जनावरे ताब्यात

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.