सातारा : देशाला कोरोनाचा विळखा पडल्याने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची (सीबीएसई) दहावीची परीक्षा रद्द केली. तर, बारावीची स्थगित केली आहे. त्या पध्दतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दहावी व बारावीच्या परीक्षा रद्द कराव्यात, अशी चर्चा सोशल मीडियाद्वारे व विद्यार्थ्यांमध्ये होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षांबाबत शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ, विद्यार्थी व पालकांची मत-मतांतरे जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
यावेळी अनेक जाणकारांनी परीक्षा रद्द न करता ऑनलाइन पध्दतीने घेण्याच्या पर्यायाला पसंती दिल्याचे दिसून आले. ही परीक्षा रद्द केल्यास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया कमकुवत होईल. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांवर "कोरोना बॅच' असा शिक्काही पडेल, असे अनेकांनी नमूद केले.
बोर्डाने दहावीच्या परीक्षा रद्द करू नयेत. खरे तर नववी आणि दहावी हा अकरावी, बारावी तसेच सीईटीसह सर्व स्पर्धा परीक्षा आणि पुढील प्रोफेशनल शिक्षणाचा पाया असतो. मुळात शिक्षण कायद्यानुसार आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना नापास करायचे नाही. दहावीची पहिली एकमेव परीक्षा विद्यार्थी गांभीर्याने देत असतात. त्यामध्ये त्यांची किमान कसोटी लागते. तीच परीक्षा रद्द केली तर मुले तशीच पुढे जातील. ती पूर्ण क्षमतेने पुढील शिक्षणाला सामोरी जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे दहावीची परीक्षा रद्द करू नये. थोडी वाट पाहा. थोडी उशिरा, काही अभ्यासक्रम कमी करून का होईना दहावीच्या परीक्षा घेतल्याच पाहिजेत.
डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष, रयत शिक्षण संस्था
दहावी आणि बारावीच्या परीक्षा पूर्णपणे रद्द करणे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे आहे. गेल्या वर्षभरात विद्यार्थ्यांच्या सेमिस्टर परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या. त्याच पध्दतीने दहावी आणि बारावीच्या अंतिम परीक्षा ऑनलाइन पध्दतीने घेणे शक्य आहे. तसेच वर्षभरात आतापर्यंत झालेल्या परीक्षा व अंतिम परीक्षांच्या आधारावर विद्यार्थ्यांना गुण देणे सोईचे ठरणार आहे.''
प्रा. डॉ. दीपक ताटपुजे, शिक्षण तज्ज्ञ
परीक्षा जीवनाचा अविभाज्य घटक असल्याने आतापर्यंत सर्वच ठिकाणी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर करून परीक्षा घेण्यात आल्या पाहिजेत. परंतु, कोरोनाच्या काळात परीक्षेला पर्याय देता येणे शक्य आहे. यामध्ये ज्या विद्यार्थ्यांची पुढील सहा महिन्यांत किंवा वर्षभरात परीक्षा देण्याची मानसिकता आहे, अशा विद्यार्थ्यांना पर्याय दिला पाहिजे.
डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ज्ञ
सीबीएससी बोर्डाप्रमाणे महाराष्ट्र बोर्डानेही दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करावी, कारण सर्वांत प्रथम विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि दुसरे महत्त्वाचे कारण विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक वर्षाचे होणारे नुकसान. विशेषतः जे विद्यार्थी "जेईई', "नीट'सारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांची तयारी करणार आहेत, त्यांना सीबीएसई बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेमध्ये या परीक्षांच्या तयारीसाठी वेळ कमी मिळेल. कारण सीबीएसईचे विद्यार्थी आत्तापासूनच तयारीला लागतील, तर महाराष्ट्र बोर्डाचे विद्यार्थी परीक्षा होईपर्यंत तयारी सुरू करू शकणार नाहीत. हा कालावधी कदाचित 3 ते 4 महिन्यांचा असू शकतो. आधीच स्टेट बोर्डचे विद्यार्थी या परीक्षांच्या तयारीमध्ये मागे पडतात.
प्रा. डॉ. नितीन कदम, दिशा ऍकॅडमी, वाई
मागील वर्षी नववीचे सत्र दोनचे मूल्यमापन झालेले नाही. याही वर्षी झाले नाही तर पुढील प्रवेशास व शाखा निवडीस अडथळे निर्माण होतील. विद्यार्थ्याचा शालेय जीवनाचा पाया कच्चा राहील. बोर्डाने कमी केलेला अभ्यासक्रम वगळून 75 टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. शाळा पातळीवर घटक चाचणी व सराव परीक्षाही झालेल्या आहेत. 18 वर्षांखालील विद्यार्थ्यांमध्ये कोविडचा प्रादुर्भाव अत्यल्प आहे. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांचे मूल्यमापन होणे गरजेचे आहे.
बी. एस. खाडे, प्राचार्य, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, दहिवडी, ता. माण
बोर्ड परीक्षा रद्द करणे हा उपाय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताचा नाही. मूल्यमापनाचे निकष सुधारून ऑफलाइन परीक्षा पद्धतीत बदल करावेत. शाळा तेथे परीक्षा केंद्रे, गटातील शाळांचे नियोजनही उपयुक्त ठरेल. रयत शिक्षण संस्थेच्या "रोज' प्रकल्पाप्रमाणे ऑनलाइन सामायिक परीक्षेची यंत्रणाही निर्माण करावी. कोविडचे सर्व नियम पाळून टप्प्याटप्प्याने सुरक्षित वातावरणात परीक्षा घेण्याबाबत विचार झाला पाहिजे.
सचिन अभंग, उपशिक्षक, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय, बिजवडी, ता. माण
परीक्षा झाल्याच पाहिजेत. सध्या ते शक्य नसले तरी परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर स्वरूप बदलून कमी कालावधीत ऑफलाइन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिल्यास पुढील प्रवेशाच्या व इतर समस्या टाळणे शक्य होईल.
इंद्रायणी जवळ-म्हस्के, पालक
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षा घेतल्या पाहिजेत. त्यामुळे त्यांच्या विद्यार्थ्यांना अकरावीत फारशा अडचणी येणार नाहीत. मात्र, अनेक कारणाने राज्य परीक्षा बोर्डाला अडचणी आहेत. दहावीचा ऑनलाइन अभ्यास घेतला गेला. मात्र, त्याचा फारसा प्रसार होऊ शकलेला नाही. अनेक विद्यार्थी वंचित राहिले आहेत. त्यामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करून त्यांना अकरावीत घातल्यास त्यांना पुढच्या शिक्षणाची स्थिती अत्यंत अवघड होईल. त्यापेक्षा त्यांच्या परीक्षा घेतल्या पाहिजेत.
सौ. एस. डी. परांजपे, शिक्षक, एसएमएस स्कूल, कऱ्हाड
लॉकडाउन व कोरोनामुळे निर्माण झालेली स्थिती अत्यंत अवघड असली तरी शासनाने मूल्याकंनानुसार दहावीच्या परीक्षा घ्याव्यात. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासक्रम देऊन ठराविक गुणांची परीक्षा होणे गरजेचे आहे. अन्यथा त्या मुलांची मानसिकता डिप्रेशनमध्ये जाण्याचीही भीती आहे. कोरोना असूनही ऑनलाइन पद्धतीने केलेल्या अभ्यासामुळे परीक्षा देण्याची मानसिकता विद्यार्थ्यांची आहे. त्याचाही विचार शासकीय पातळीवर होण्याची गरज आहे.
ऍड. अभिजित रैनाक, पालक, कऱ्हाड
शाळेने ऑनलाइन अभ्यास घेतला आहे. मध्यंतरी काही दिवस शाळाही सुरू होत्या. त्यामुळे बऱ्यापैकी अभ्यास करत आहोत. अभ्यासालाही प्रत्येकाने वेळ दिला आहे. अशा स्थितीत परीक्षा रद्द होणार असतील तर अभ्यासासाठी घेतलेले कष्ट वाया जाण्याची भीती आहे. त्याशिवाय त्या कष्टाचे काही चीज होणार नसेल तर आम्हालाही वाईट वाटते. त्यामुळे शासनाने काहीही करून परीक्षा रद्द न करता त्या कमी-जास्त प्रमाणात घ्याव्यात.
ज्ञानदा शिंदे, विद्यार्थी, कऱ्हाड
दहावीची ऑनलाइन परीक्षा घेऊन नेमके गुणांकन करणे शक्यच नाही. म्हणून दहावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच घेण्यात यावी. त्यासाठी परीक्षा अधिक लांबणीवर गेली तरी चालेल. ही परीक्षा ज्या-त्या शाळेतच घेण्यात यावी. मात्र, त्यामुळे कॉपी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी शासनाने पर्यवेक्षक पध्दत अधिक कडक करावी.
सिध्दराम माळी, वर्गशिक्षक, समर्थ विद्यामंदिर, कण्हेरी, ता. खंडाळा
दहावीची परीक्षा ही सीबीएससी बोर्डाप्रमाणे रद्दच करावी. गतवर्षीही आम्हाला इयत्ता नववीतून थेट दहावीत प्रवेश दिला आहे. यावर्षीही शाळा भरली नाही. ऑनलाइन म्हणावा तसा स्टडी होत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करून महाराष्ट्र बोर्डाने दहावीची परीक्षा रद्द करावी. तसेच पुढील वर्गात कोणत्याही शाखेत प्रवेश घेण्यासाठी आठवी व नववीचे गुणांकन ग्राह्य धरावे.
सृष्टी कासुर्डे, विद्यार्थिनी, ज्ञानसंवर्धिनी माध्यमिक विद्यालय, शिरवळ, ता. खंडाळा
दहावीच्या मुलांनी बोर्डाची परीक्षा म्हणून अनेक ऑनलाइन माध्यमातून अभ्यास केलेला आहे. यावेळी दीक्षा ऍप, टिलिमिली, स्वाध्याय उपक्रम, ऑनलाइन क्लासेस, झुम मिटिंग आदी पध्दतीने अभ्यास केलेला आहे. म्हणून दहावीची परीक्षा रद्द करू नये. ऑफलाइन शक्य नसल्यास ऑनलाइन परीक्षा तरी घ्यावी. परीक्षा रद्द केल्यास हुशार मुलांचे अधिक नुकसान होणार आहे.
मोहन नवले, पालक, माध्यमिक विद्यालय, मोर्वे, ता. खंडाळा
सीबीएससीप्रमाणे महाराष्ट्र बोर्डाचा अभ्यासक्रम राबविणाऱ्या शाळांमधून सराव परीक्षा घेण्यात आल्या आहेत. त्याआधारे शाळास्तरावर दहावीचा निकाल तयार करणे शक्य आहे. परंतु, योग्य ती काळजी घेऊन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना त्यांची क्षमता आजमावून पुढील करिअरसाठी योग्य दिशा निवडता येईल.
शशिकांत खैरमोडे, मुख्याध्यापक, भुतेश्वर विद्यामंदिर, अंबवडे, ता. खटाव
विद्यार्थी जीवनातील दहावीचे वर्ष अत्यंत महत्त्वाचे असल्याने बोर्ड परीक्षेद्वारेच त्यांचे योग्य मूल्यमापन होणार आहे. अन्य कोणत्याही प्रकारचे मूल्यमापन खात्रीशीर होणार नाही. त्यामुळे बोर्ड परीक्षा होणे गरजेचेच आहे. योग्य ती सर्व प्रकारची काळजी घेऊन परीक्षा व्हावी. बोर्डाकडून मूल्यमापन झाल्याशिवाय पुढील शिक्षणाची योग्य निवड होणार नाही.
विठ्ठल भागवत, पालक, मायणी, ता. खटाव
वर्षभर केलेला अभ्यास, शिक्षकांनी ऑनलाइन व ऑफलाइन केलेले मार्गदर्शन, घेतलेले कष्ट वाया जायला नकोत. त्यासाठी बोर्डाची परीक्षा व्हायलाच हवी. त्याशिवाय पुढे कॉलेजला कोणत्या बेसवर प्रवेश मिळणार? सरसकट सगळेच पास होतील. त्यामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होईल.
वैष्णवी घाडगे, विद्यार्थिनी, चंद्रसेन विद्यामंदिर, धोंडेवाडी, ता. खटाव
बोर्ड परीक्षेद्वारे मिळणाऱ्या गुणांचा वेगळा आनंद असतो. त्यासाठी वर्षभर मुलांनी, शिक्षकांनी कठोर परिश्रम घेतलेले असतात. दहावीनंतर काय करणार, याचे आडाखे बांधलेले असतात. मात्र, परीक्षाच रद्द झाल्यास त्यांचा हिरमोड होऊन पुढील शिक्षणाचा उत्साह कमी होऊ शकतो. परंतु, विद्यार्थ्यांच्या जीवावरच बेतणार असेल तर परीक्षा रद्द करणेच हिताचे.
सतीश पवार, गणित शिक्षक, कमळेश्वर विद्यामंदिर, विखळे, ता. खटाव
शासनाने सर्वसमावेशक विचार करून प्रत्येक घरातील आर्थिक परिस्थिती व शैक्षणिक वातावरण भिन्न असल्यामुळे त्याचा विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर वेगवेगळा परिणाम होतो, हे लक्षात घ्यावे. यावर्षी शासनाने दहावीच्या परीक्षा न घेता इयत्ता सहावी ते नववीच्या गुणांचा विचार करून त्यांना लेखी परीक्षेसाठी गुणदान करावे आणि अंतर्गत गुणांचे गुणदान शाळांनी करण्याचा अधिकार शाळांना द्यावा. बेस्ट ऑफ फाइव्ह ही पद्धतीही विचारात घेऊन प्रत्यक्ष गुणदान करावे.
राधा गणेश ससाणे, विद्यार्थिनी, त. ल. जोशी विद्यालय, वाई
सद्य:स्थितीत दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाची परिस्थिती गंभीर होत गेल्यास ऑनलाइन परीक्षांचा पर्याय दिसत आहे. गेल्या वर्षभरात अभियांत्रिकी व इतर परीक्षा ऑनलाइन घेण्यात आल्या आहेत. त्याच पध्दतीने पुढील परीक्षा ऑनलाइन घेतल्यास कोरोनाचा धोका संभविण्याची शक्यता कमी आहे. मात्र, या परीक्षा घेताना काही प्रमाणात परीक्षेचे स्वरूप बदलण्याची गरज आहे.
मेघा मोरे, पालक, सातारा
कोरोना संसर्गाच्या काळात मुलांनी शाळांच्या ऑनलाइन शिक्षणातून, अगदी शेवटच्या टप्प्यात वर्ग अध्यापनातूनही शिक्षण घेतले. अभ्यासासाठी पालकांनीही कष्ट घेतले आहेत. अशा स्थितीत दहावीची परीक्षा रद्द झाल्यास मुलांचे फारसे नुकसान होणार नाही, ते उत्तीर्ण होतील. मात्र, मेडिकल, इंजिनिअरिंग अथवा अन्य उच्च ध्येय असलेल्या मुलांसाठी अचूक मूल्यमापन होणे आवश्यक आहे. शासनाला पुढील वर्षाची प्रवेशप्रक्रिया राबवण्यासाठी परीक्षा होणे अधिक चांगले आहे.
के. बी. खुरंगे, प्राचार्य, मुधोजी हायस्कूल, फलटण
ऑफलाइन परीक्षा घेण्यास अडचणी असल्या तरी सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यासाठी किमान ऑनलाइन परीक्षा होणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत मुलेही मोबाईलचा चांगला वापर करत आहेत. त्यामुळे परीक्षा ऑनलाइन पध्दतीने काठीण्य पातळीच्या तीन स्तरावर घेता येऊ शकतील. शासनस्तरावर किमान ऑनलाइन परीक्षा घेण्याचा विचार होणे आवश्यक आहे.
निलकंठ निंबाळकर, शिक्षक, जानाई विद्यालय, राजाळे, ता. फलटण
दहावीची परीक्षा कोणत्याही परिस्थितीत रद्द होऊ देऊ नये. दहावी हा शिक्षणाचा महत्त्वाचा टप्पा आहे, या टप्प्यावरच विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती समजते. त्यावरून पालक व विद्यार्थ्यांना पुढील महाविद्यालयीन शिक्षण व करिअरच्या दृष्टीने शैक्षणिक नियोजन करता येते. त्यामुळे दहावीची परीक्षा झालीच पाहिजे. कोरोनाच्या नावाखाली ही परीक्षा रद्द करणे म्हणजे शिक्षणाचा खेळखंडोबा ठरणार आहे.
राजेंद्र बर्गे, पालक, कोरेगाव
दहावीची परीक्षा कोणत्याही परिस्थितीत आणि तीही ऑफलाइन पद्धतीने व्हायलाच हवी. ही परीक्षा रद्द करून आमच्यावर कोरोनाची बॅच हा शिक्का लावून घेणे आम्हाला कदापिही मान्य नाही. दहावीचे वर्ष आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असल्याने आम्ही सातत्याने अभ्यास केला आहे. शाळा बंद असूनही आम्हाला शिक्षकांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. पालकांनीही मोठा सपोर्ट केला आहे. ही परीक्षा रद्द झाल्यास आमचे भवितव्य धोक्यात येईल.
राघवी बर्गे, विद्यार्थिनी, कोरेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.