सातारा : माझा जन्म इंदूरचा. त्या वेळी माझे वडील होळकर संस्थानमध्ये कायदा सल्लागार होते. ते कायद्याचे उच्चशिक्षित पदवीधर होते. पश्चिम महाराष्ट्रातले ते बहुतेक पहिलेच एलएलएम असावेत. भारतातून ब्रिटिशांची सत्ता गेल्यानंतर संस्थानांची परिस्थिती कशी असेल, याविषयी मोठ्या संस्थानांनी अटकळी बांधायला सुरवात केली होती. 'ब्रिटिश गेल्यावर प्रत्येक संस्थान हे स्वतंत्र राज्य होईल व त्याला एक राज्यघटना लागेल...' अशीही एक अटकळ त्या वेळी बांधली जात होती. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळातल्या होळकर संस्थानांची घटना तयार करण्याचे काम वडिलांना मिळालं. कायदेशीर सल्लागार म्हणून ते इंदूरमध्ये काम करत असताना देशाला स्वातंत्र्य मिळाले; पण सर्व संस्थानं खालसा झाली. स्वतंत्र राज्यघटनेचा प्रश्नच संपुष्टात आला. त्यानंतर वडिलांना प्रशासकीय सेवेत घेण्याचा प्रस्ताव होळकरमहाराजांनी सरकारपुढं ठेवला. त्यानुसार प्रशासकीय सेवेच्या प्रशिक्षणासाठी त्यांना दिल्लीला पाठवण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्हाधिकारी म्हणून नोकरीची संधी मिळाली; पण वडील कन्हाडला परत आले. वडिलांचा मुळातच राजकारणाचा पिंड असल्यामुळे आम्ही कन्हाडला परतलो होतो. सन 1942 मध्ये सातारा जिल्हा लोकल बोर्ड अध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लढवली होती.
पाचगणीच्या बोर्डिंग स्कूलमध्ये मी शिक्षण घ्यावं, असा विचार पुढे आला. मात्र, मला कन्हाड नगरपालिकेच्या शाळेतच शिकवण्याचा निर्णय वडिलांनी घेतला. पालिकेच्या शाळेतून मी सातवीपर्यंतचं शिक्षण घेतलं. सातवीची परीक्षा ही त्या वेळी बोर्डाची परीक्षा असे. त्या परीक्षेत जिल्ह्यात मला चांगलं यश मिळालं. त्यानंतर टिळक हायस्कूलमध्ये आठवीसाठी मी प्रवेश घेतला. याच शाळेत यशवंतराव चव्हाण यांचंही शिक्षण झालं होतं. दरम्यान, त्याच वेळी वडील लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे शिक्षणासाठी कन्हाडला राहावं की दिल्लीला जावं, असा विचार घरात झाला. 'पाच वर्ष तरी दिल्लीत राहावं लागेल, तेव्हा आठवी ते बारावीपर्यंतचं माझे शिक्षण दिल्लीतच करावं,' असं ठरलं. त्यावर घरी बराचसा विवादही झाला; पण शेवटी दिल्लीला जायचा निर्णय पक्का झाला. टिळक हायस्कूलमध्ये आठवीत असताना शाळेच्या पहिल्याच दिवशी इंग्लिशचा तास होता. शिक्षकांनी पहिल्याच दिवशी फलकावर 'ए बी सी डी' लिहायला सुरवात केली. मी 'मला हे येतंय.' या आविर्भावात होतो. मात्र, त्यानंतरच्या आयुष्यात माझ्या मनावर त्याचा खोलवर परिणाम झाला. त्या वेळी राजकीय निर्णय म्हणून आठवीपासूनच इंग्लिश विषय शिकवण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. तो आमच्या पिढीच्या दृष्टीनं घातक निर्णय ठरला! त्यामुळे महाराष्ट्राच्या दोन पिढ्यांचं नुकसान झालेले आहे. आठवीत इंग्लिश या विषयाचं शिक्षण सुरू करून बहुजन समाजातले विद्यार्थी मॅट्रिकनंतरच्या स्पर्धापरीक्षेत यश मिळवतील, याची सुतराम शक्यता नव्हती. कारण, त्या वेळी सर्वच्या सर्व स्पर्धापरीक्षा इंग्लिशमधूनच असायच्या. आज इतक्या वर्षांनंतर त्याचे परिणाम दिसतात. हे परिणाम म्हणजे कुणी सैन्यात अत्युच्च पदापर्यंत चढले नाही... सुरक्षा प्रबोधिनीत गेलं नाही...केंद्रात सचिवपदावर ग्रामीण भागातली माणसं - एखादा अपवाद वगळता अजूनही पोचलेली नाहीत.
दिल्लीच्या शाळेत प्रवेशच मिळेना!
दिल्लीत शिक्षण घ्यायचा निर्णय तर झाला; पण दिल्लीत गेल्यानंतर मला कोणत्याही शाळेत प्रवेश मिळत नव्हता. मला इंग्लिश, हिंदी येत नव्हते. संस्कृत येत नव्हते. इंग्लिश, हिंदी न येणाऱ्या मुलाला कसा प्रवेश द्यायचा, हा प्रश्न होता. दिल्लीत चांगलं शिक्षण मिळेल, असा आईचा आग्रह होता; पण मला प्रवेशच मिळेना! त्यामुळे कन्हाडला परंतण्याचे ठरलं. अशातच एका मराठी संस्थेची नूतन मराठी विद्यालय' ही शाळा दिल्लीत असून, तिथं प्रवेश मिळू शकेल,' अशी माहिती मिळाली. शेवटचा प्रयत्न म्हणून मी आणि आई त्या शाळेत गेलो. शाळेच्या मुख्याध्यापिका व-हाडपांडे बाई होत्या. दिल्ली बोर्डाचा अभ्यासक्रम कसा चालतो, याची माहिती त्यांनी आम्हाला दिली. त्या मला म्हणाल्या : "तुला सुरवातीला त्रास झाला तरी मी तयारी करून घेईन." त्या वेळी मी आठवीत होतो. मात्र, 'सातवीच्या वर्गात बसावं लागेल,' असं बाईंनी मला सांगितलं. माझ्या वयाचा विचार करून त्यांनी ही अट घातली होती. ही गोष्ट वडिलांना सांगितल्यावर एक वर्ष वाया जातंय' म्हणून त्यांना संताप आला. नंतर बाईंनी त्यांचा मुद्दा वडिलांना पटवून दिला. त्या म्हणाल्या : सोळाव्या वर्षापर्यंत अकरावीची परीक्षा देता येणार नाही. सोळाव्या वर्षी इतरांप्रमाणे अकरावीची परीक्षा देता येईल. नुकसान होणार नाही." त्यानंतर माझे दिल्लीत शिक्षण सुरू झाले. मी पहिल्या पाच-सहा महिन्यांत तिथं रुळलो; पण सुरवातीला इंग्लिश, हिंदी येत नाही म्हणून मी शिक्षकांच्या छड्या खाल्ल्या आहेत. त्या शाळेतले बरेच शिक्षक मराठी होते. त्यांनी मला सांभाळून घेतलं. सातवीच्या परीक्षेत मी चांगलं यश मिळवले. पुढं काही अडचण आली नाही. हा माझ्या आयुष्यातील 'टर्निंग पॉइंट' होता. नूतन मराठी विद्यालयात अकरावीपर्यंत शिक्षण घेतलं. तिथं आपुलकीच्या वातावरणात माझ माध्यमिक शिक्षण झालं. शाळेत मी क्रिकेट, बॅडमिंटनही खेळायचो.
पिलानीत प्रथमच घराबाहेर राहिलो
नूतन मराठी विद्यालयातून अकरावीची (हायर सेकंडरी) बोर्डाची परीक्षा चांगले गुण मिळवून उत्तीर्ण झाल्यावर पुढं इंजिनिअरिंगकर्ड जाण्याचा निर्णय झाला. दिल्लीपासून दूर राजस्थानातल्या पिलानी इथं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पिलानी हे वाळवंटातलं गाव आहे. बिल्ला कुटुंबाचं जन्मस्थान, मुलांनी शिकावं, या हेतूनं त्यांच्या पूर्वजांनी तिथं शाळा सुरू केली, त्या शाळेचंच आज सिद्ध विश्वविद्यालय झालेलं आहे. तिथं वाळवंटाचा अनुभव मला पहिल्यांदा आला. वाळवंटात पाच वर्षं राहावं लागेल, ही कल्पनाच धक्कादायक होती. आई-वडिलांना माझी काळजी वाटायची. मी राहीन की पळून येईन, असं त्यांना वाटायचं. मात्र, पिलानीतही मी चांगला रुळलो. त्या वेळी मी अभ्यासाबरोबरच खेळाकडंही लक्ष देत होतो. खेळाकडं जास्त लक्ष देतो म्हणून प्राचार्य मला रागवायचे. मात्र, घरून मला प्रोत्साहन मिळायचं. अभ्यासाबरोबरच खेळ व व्यक्तिमत्त्वविकासाला वडील महत्त्व देत असत. वडील फार व्यग्र असायचे; त्यामुळं शिकवणं, अभ्यास घेत बसणं असं त्यांनी कधीच केलं नाही. मात्र, त्यांचं माझ्याकडं लक्ष असायचं. 'शिकलं पाहिजे,' हा त्यांचा आग्रह असे. त्यांचं स्वतःचं जीवन शिक्षणामुळं बदललं असल्यानं शिक्षणासाठी ते खूप आग्रही होते. मला पिलानीत चांगलं शिक्षण मिळालं. घराबाहेर मी प्रथमच राहत होतो. माझ्यामुळं कन्हाडची अनेक मंडळी शिक्षणासाठी पिलानी इथं आली. बाबा कल्याणी, 'सकाळ' चे प्रतापराव पवार अशा आपल्याकडच्या अनेकांनी माझ्यानंतर तिथं प्रवेश घेतला होता. जर्मनीमधली शिष्यवृत्ती...
पिलानीतलं इंजिनिअरिंगचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर माझ्या मित्रांनी शिक्षणासाठी परदेशी जायचा निर्णय घेतला होता. उच्च शिक्षणासाठी परदेशी जायचं की भारतात नोकरी करायची, या विचारात मीही होतो; पण मी परदेशी कुठंही अर्ज केला नव्हता. मात्र, जर्मनीत संयुक्त राष्ट्र संघाच्या अभियंता प्रशिक्षणाच्या शिष्यवृत्तीसाठी सहज म्हणून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडं अर्ज केलेला होता. मी ती गोष्ट विसरूनसुद्धा गेलो होतो. मात्र, या शिष्यवृत्तीसाठी माझी निवड झाली असल्याचं पत्र मला एके दिवशी अचानकच आलं. जर्मनीत सहा महिने प्रशिक्षणाची शिष्यवृत्ती होती. तोपर्यंत माझे बरेच मित्र अमेरिकेला गेले होते. मी अर्ज न केल्यामुळे मला मात्र तिकडं प्रवेश मिळाला नव्हता. त्यामुळे मी जर्मनीला जाण्याचा निर्णय घेतला. वडिलांकडून तिकिटाचे पैसे घेतले. रिझर्व्ह बॅंकेकडून खर्चासाठी थोडं फार परकीय चलन मिळालं. जर्मनीत कुणीही ओळखीचं नव्हतं. जर्मनीत विमानतळावर पोचल्यानंतर रेल्वेचं तिकीट काढून प्रशिक्षणाच्या ठिकाणी एका लहानशा गावात पोचलो. फोन करून प्रशिक्षणाच्या ठिकाणी कसा तरी पोचलो. 'असं धाडस मी त्या वेळी कसं केलं असेल, याचं आता मागं वळून पाहताना आश्चर्य वाटतं. प्रशिक्षण कालावधीत मला जर्मनीच्या कार्यशैलीची ओळख झाली. जर्मनीहून अमेरिकेला...
अशी भरुन घ्या वीजबिलांची थकबाकी; उदयनराजेंचा MSEB ला सल्ला
जर्मनीत पोचल्याबरोबरच मी अमेरिकेत उच्च शिक्षणासाठी प्रवेशअर्ज केले. बहुतेक सर्व ठिकाणी प्रवेश मिळाला. जर्मनीतलं प्रशिक्षण संपल्यावर व जमा झालेले शिष्यवृत्तीचे पैसे घेऊन मी बर्कले इथल्या विख्यात अशा कॅलिफोर्निया विश्वविद्यालयात प्रवेश घेतला. दीड वर्षात 'एमएस'ची पदवी घेतली. तिथंच अनुभवासाठी जवळच्या पालो अल्टो या गावी एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत रिसर्च इंजिनिअरिंगची नोकरी मिळाली. त्या परिसराचं नाव तेव्हा सांताक्लारा व्हॅली असं होतं. आज तोच परिसर 'सिलिकॉन व्हॅली' म्हणून ओळखला जातो! त्या वेळी 'मायक्रोसॉफ्ट', 'ऍपल' यांसारख्या कंपन्यांची सुरवात होत होती. मायक्रोप्रोसेसरचा शोध लागलेला होता. आयटी-युगाची चाहूल लागू लागली होती. मला संशोधनप्रकल्पात काम करण्याची चांगली संधी मिळाली. संरक्षण खात्यात लागणारी उपकरणं तयार करण्याचे ते काम होतं. अमेरिका त्या वेळी व्हिएतनामशा युद्धात गुरफटलेली होती. संरक्षणावर व इलेक्ट्रिक युद्धाच्या उपकरणांच्या संशोधनावर खूप प्रयत्न त्या वेळी चालले होते. खर्चही खूपच होत होता. अणुबुडीविरोधी युद्धात वापरली जाणारी उपकरणं, बॉंबफेकी विमानात बसवली जाणारी उपकरणं, संगणकाची जोड-उपकरण आदी उपकरणांच्या निर्मितीचे संशोधन केलं. लोकशाही म्हणजे काय, विचारस्वातंत्र्य म्हणजे काय या बाबींचा अमेरिकेतल्या वास्तव्यात माझ्या मनावर खूप परिणाम झाला. मला तिथं डिझाईन इंजिनिअर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तिथं खूप शिकता आलं. मी करत असलेलं ते काम संरक्षण खात्याचं काम होतं. पगारही चांगला होता. त्यामुळे इथंच राहायचं की भारतात परतायचं, याबाबत मनात चलबिचल सुरू होती. मात्र, बऱ्याच विचारान्ती मी भारतात परतलाे.
भारतीय भाषा संगणकात
सन 1972 च्या अखेरीस मी भारतात परतलो. त्यानंतर पाच-सह महिन्यांतच वडिलांचे निधन झालं. त्यानंतर पोटनिवडणूक जाहीर झाली. राजकारणात मी तसा सक्रिय नव्हतो. पूर्ण वेळ राजकारण करावं, असं मी ठरवलेलं नव्हतं. मी माझी वेगळी ओळख निर्माण केली होती. मी त्या वेळी छोटीशी कंपनी सुरू केली होती. संगणकयुक्त उपकरणं निर्माण करून संरक्षणविषयक काम करू लागलो होतो;। पण हे नेमकं काय काम होते, ते बाहेरच्या कुणालाच कळत नव्हतं. त्या वेळी संगणक इंग्लिशमध्ये चालायचे. कन्हाड, पाटणचे लोक माझ्याकडं यायचं. त्यांना मी काय करतोय हे सांगता येत नसे. त्यांना काही समजायचं नाही. काम करताना कुठंही ठोकाठोकी नाही. मोठी यंत्रं नाहीत. त्यामुळं गावाकडच्या लोकांना कळायचं नाही, की ही कसली कंपनी आहे ते! त्यामुळे एक गोष्ट प्रकनि लक्षात आली, की संगणकाच्या या नवीन तंत्रज्ञानापासून इंग्लिश न येणारे आपले बांधव पूर्णपणे वंचित राहतील आणि संगणकाची क्रांती या सर्वांना मागं सोडून पुढं जाईल. जे युरोप खंडात औद्योगिक क्रांतीच्या बाबतीत झालं, तेच संगणकक्रांतीसंदर्भात भारतात होईल... तसं होऊ नये म्हणून आपण मराठी भाषा संगणकात आणली पाहिजे, नाही तर नुकसान होईल, असं मला त्या वेळी तीव्रतेनं वाटून गेलं. त्यासाठी मी संगणकात मराठीचा वापर करण्याबाबतच्या संशोधनात भाग घेतला. या कामाबद्दल मला आजही समाधान आहे.
अर्थात आम्ही जरी हे काम केलं नसतं तरी आणखी कुणीतरी ते काम केलंच असतं. 'भारतीय भाषांत संगणक निर्माण करा, असं राजीव गांधी यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं. त्यानुसार अधिकाऱ्यांसमवेत त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञांची बैठक झाली त्या वेळी राजीव गांधी यांना माझ्या कामाचा परिचय झाला त्यातूनच त्यांनी 1991 च्या निवडणुकीसाठी मला उमेदवारी दिली.
...अन् आम्ही अपघातातून बचावलो
कॉंग्रेस पक्षानं माझ्याकडे 2004 च्या लोकसभा निवडणुकीत गुजरात राज्याचा प्रभारी म्हणून महत्त्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यावेळी सोनिया गांधी यांची सिल्वासाजवळ प्रचारसभाहोती.आमचर्चा दोन हेलिकॉप्टर होती. त्यातलं एक सोनिया गांधी यांच्यासाठीच होत माझ्या हेलिकॉप्टरमध्ये शैलजा, अहमद पटेल व मी असे तियं जण बसलेलो होतो. ते हेलिकॉप्टर जुनं होतं. सोनियाजींचं हेलिकॉप्टर पुढे गेलं. आमचं हेलिकॉप्टर उतरवताना त्याचा पंखा तुटला. चालकान प्रसंगावधान दाखवत हेलिकॉप्टर उतरवलं. हेलिकॉप्टर आपटलं- पण आग लागली नाही. मी व शैलजा बाहेर फेकलो गेलो. डोक्याला लागले होतं. आम्हाला तातडीनं रुग्णवाहिकेतून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. उपचार झाले. सोनियाजी मला पाहण्यासाठी आल्या. त्या वेळी आम्ही तिघं जिवावरच्या प्रसंगातून बचावलो. तो प्रसंग आजही लक्षात राहिला आहे. त्या निवडणुकीत कॉंग्रेसला यश मिळालं.
उदयनराजेंची भाषा याेग्य नाही
मोदींचं आव्हान स्वीकारलं
गुजरातमध्ये 2004 पूर्वी कॉंग्रेसचे पाच खासदार व भाजपचे 21 खासदार होते. कॉंग्रेसचा एकही खासदार विजयी होणार नाही, असं तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी म्हणाले होते. तिथला प्रभारी म्हणून काम पाहत असताना ऐन निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा धाडसी निर्णय मी घेतला. सोनिया गांधी यांनी तो मान्य केला. पक्षांतर्गत अन्य बदल केले गेले. त्या निवडणुकीत कॉंग्रेसनं पाच जागांवरून 12 जागांवर विजय मिळवला आणि या निवडणुकीत देशात कॉंग्रेसला 145 आणि भाजपला 138 जागा मिळाल्या. जर गुजरातमध्ये कॉंग्रेसच्या सात जागा वाढल्या नसत्या, तर कॉंग्रेस व भाजपच्या संख्याबळात नेमकं उलटं झालं असतं. म्हणजे भाजपला 145 व कॉंग्रेसला 138 असं झालं असतं. त्यामुळं सर्वाधिक जागा असलेल्या अटलबिहारी वाजपेयी यांना पुन्हा सरकार स्थापनेसाठी निमंत्रण मिळालं असतं. त्यामुळे गुजरातचं यश महत्त्वाचे ठले. त्यानंतर मला पक्षानं नऊ राज्यांचा प्रभारी, अखिल भारतीय कांग्रेस समितीचा सरचिटणीस अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या. सात खात्यांच्या मंत्रिपदाचा कार्यभार माझ्याकडे सोपवला. त्यात सहा वर्ष पंतप्रधानांच्या कार्यालयात राज्यमंत्री म्हणून काम करताना देशाच्या प्रशासनाचा अनुभव मिळाला. अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यामुळे व त्याच्याशी निगडित असलेल्या विज्ञान, तंत्रज्ञान आदींसारख्या महत्त्वाच्या खात्याचे काम करताना आनंद मिळाला. अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना रात्र रात्र जागून अभ्यास करायची सवय लागली होती. तीच सवय खासदार, केंद्रीय मंत्री व महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून काम करताना उपयोगी पडली. रात्री उशिरापर्यंत बसून अनेक कामांचा निपटारा त्यामुळे करता आला.
रात्रीचा दूरध्वनी अन् संधी...
लोकसभेच्या 1991 मध्ये झालेल्या निवडणुकीत मला कॉंग्रेसनं उमेदवारी दिली. राजीव गांधी यांना तंत्रज्ञानातली उच्चशिक्षित, आंतरराष्ट्रीय अनुभव असणाऱ्यांची टीम निवडायची होती. त्यात त्यांनी माझी निवड करत मला उमेदवारी दिली. त्या वेळी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये मुक्कामी होतो. रात्री दोनच्या सुमारास सर्किट हाऊसमधला दूरध्वनी खणाणला. कॉंग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राजीव गांधी यांचा तो दूरध्वनी होता. माझी आई दूरध्वनीवर त्यांच्याशी बोलत होती. त्यानुसार क-हाड लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी दिल्याचं राजीव गांधी यांनी सांगितलं होतं व त्यानुसार तातडीनं कऱ्हाडला जाऊन शेवटच्या दिवशी अर्ज दाखल करावा, असंही मला सांगण्यात आलं. त्या वेळी माझ्याशीही त्यांनी दूरध्वनीवर संवाद साधून शुभेच्छा दिल्या व 'प्रचाराला येतो', असं स्पष्ट केलं. तो माझा राजकारणातला प्रवेश ठरला. त्या निवडणुकीत मी मताधिक्यानं विजयी झालो. दहा नोव्हेंबर 2010 रोजीसुद्धा मध्यरात्री तीनच्या सुमाराला दिल्लीतल्या माझ्या निवासस्थानी दूरध्वनी आला. कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचा तो दूरध्वनी होता. 'महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी तुमच्यावर सोपवत आहे,' असं त्यांनी मला दूरध्वनीवर सांगितलं. त्यामुळे 1991 मध्ये लोकसभेच्या उमेदवारीसाठी रात्री दोन वाजता आलेला दूरध्वनी असो अथवा दहा नोव्हेंबर 2010 ला मध्यरात्री तीन वाजता मुख्यमंत्रिपदासाठी निवड झाल्याची बातमी असो... आयुष्यात मिळालेल्या या दोन्ही मोठ्या राजकीय संधी मध्यरात्रीनंतर आलेल्या दूरध्वनीवरच कळल्यानं त्या स्मरणात राहणाऱ्या आहेत!
संपादन : सिद्धार्थ लाटकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.