'पैशाच्या बळावर विजय मिळवायचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला जनतेने लोकसभा निवडणुकीत जागा दाखवली आहे. आता सुद्धा भाजपकडून विविध योजनांचे प्रलोभन दाखविण्यात येत आहे.'
दहिवडी : ज्यांना काँग्रेसने (Congress) मोठं केलं, ते भाजपमध्ये गेले. काँग्रेसचा वापर करून भाजपमध्ये गेलेल्या गद्दारांना गाडण्यासाठी कामाला लागा, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख (Ranjit Singh Deshmukh) यांनी केले.
दहिवडी येथे आयोजित माण तालुका काँग्रेस कमिटीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी सातारा जिल्ह्याचे प्रभारी पक्ष निरीक्षक श्रीरंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, जिल्हा उपाध्यक्ष एम. के. भोसले, तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, मनीषा पाटील, जिल्हा युवक अध्यक्ष अमरजित कांबळे, वडूजचे माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, महिला तालुकाध्यक्ष नकुसा जाधव, वसंतराव अवघडे, शिवाजीराव यादव, अॅड. संदीप सजगणे, नीलेश पोळ, बाळासाहेब आटपाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
देशमुख म्हणाले, ‘‘माण मतदारसंघ काँग्रेस विचारसरणीचा आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा आहे. या मतदारसंघात ‘हाताचा पंजा’ हे चिन्ह मिळावं ही येथील दलित, वंचितांसह सर्वांचीच लोकभावना आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मतदारसंघ मिळावा, ही आमची आग्रही मागणी आहे.’’ श्रीरंग चव्हाण म्हणाले, ‘‘आम्ही सर्व मतदारसंघांत जाऊन कार्यकर्त्यांचे मनोगत ऐकत आहोत. मते जाणून घेत आहोत. आपण आघाडीच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहोत. भाजपने फोडा अन् राज्य करा ही नीती अवलंबली आहे. या भाजप सरकारला जनता कंटाळली असून, हे सरकार हद्दपार करायचे आहे.’’
डॉ. सुरेश जाधव म्हणाले, ‘‘कार्यकर्त्यांनी बूथ कमिटीमध्ये सोशल इंजिनिअरिंग राबविले आहे का हे पाहा. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार व महायुतीच्या विरोधात वातावरण ढवळून काढावे लागेल. पृथ्वीराज चव्हाण यांनी मराठ्यांना टिकणारे आरक्षण दिले होते; पण देवेंद्र फडणवीस यांनी ते घालवून टाकले.’’ अल्पना यादव म्हणाल्या, ‘‘केंद्र असो वा राज्य सरकार हे हुकूमशाही पद्धतीने काम करत आहे. या जुलमी सरकारकडून महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहे. त्यामुळे या सरकारला पाडण्यासाठी आपल्याला वज्रमूठ बांधावी लागेल.’’
एम. के. भोसले म्हणाले, ‘‘माण मतदारसंघ आमचा आहे अन् आम्हालाच मिळाला पाहिजे. पैशाच्या बळावर विजय मिळवायचे स्वप्न पाहणाऱ्या भाजपला जनतेने लोकसभा निवडणुकीत जागा दाखवली आहे. आता सुद्धा भाजपकडून विविध योजनांचे प्रलोभन दाखविण्यात येत आहे. त्याला मतदारांनी भुलू नये.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.