सातारा : कोरोनाची लाट (covid19 wave) शिथिल होत असतानाच आता आगामी काही महिन्यांत निवडणुकांची (election) लाट येत आहे. यामध्ये पालिका, नगरपंचायती, त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका होणार आहेत. यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. त्यासोबतच पक्षीय पातळीवरूनही (political parites) हालचाली गतिमान झाल्या आहेत. काँग्रेस (congress) व भाजपने (bjp) स्वबळावर या निवडणुका लढण्याची तयारी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (ncp) आणि शिवसेना (shivsena) महाविकास आघाडीच्या (mahavikas aghadi) माध्यमातून निवडणुकांसाठी पक्षश्रेष्ठींच्या सूचनेची वाट पाहात बसलेली आहे. जिल्ह्यातील बहुतांशी स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असले तरी भाजप, शिवसेनेने यामध्ये शिरकाव केलेला आहे. तर काँग्रेसच्या हातून आजपर्यंत जे गेले आहे, ते परत मिळविण्याचा प्रयत्न या निवडणुकीच्या माध्यमातून होणार आहे. दरम्यान, आघाडी झाल्यास राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या ठिकाणी ६०-४० चा फॉर्मुला राबविला जाणार आहे. (congress-ncp-shivsena-to-lead-fothcoming-elections-independently-satara-political-news)
कोरोनाचा संसर्ग कमी होऊ लागल्यामुळे लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे आता या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबरमध्ये पालिका व नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यासोबतच पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे तीही निवडणूक यापाठोपाठ होणार आहे. त्यामुळे प्रशासकीय पातळीवरून तयारी सुरू झाली आहे. त्यासोबतच आता पक्षीय पातळीवरूनही हालचाली गतिमान झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचे प्रगती पुस्तक तपासण्यासाठीची तयारी सुरू केली आहे. यावर्षी सदस्यांचे तब्बल सव्वा वर्ष हे कोरोना संसर्गात गेले आहे. त्यामुळे उर्वरित कालावधीत पक्षाच्या सदस्यांनी कोणती कामे केली, पक्षाने राबविलेल्या विविध योजना, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोचविल्या का, याची माहितीही आता घेतली जाणार आहे.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असून, या महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच आगामी निवडणुका लढण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. त्यासाठी पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार (sharad pawar) यांच्या सूचनेकडे जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे लक्ष लागलेले आहे. जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असूनही त्यांना यावेळेस स्वबळावर लढण्याची भीती वाटत असल्याचे चित्र आहे. यापूर्वीच्या सर्व निवडणुका राष्ट्रवादीने स्वबळावर लढलेल्या आहेत.
भारतीय जनता पक्षाने मागील जिल्हा परिषद निवडणुकीत सात सदस्य निवडून आणले. त्यामुळे आता यावेळेस त्यामध्ये आणखी भर टाकण्याची तयारी त्यांनी केली आहे. त्यासाठी पालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुका भाजपने स्वबळावर आणि पक्षाच्या चिन्हावर लढण्याची तयारी केली आहे. त्यासाठी त्यांचा प्रत्येक कार्यकर्ता केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी राबविलेल्या योजना तळागाळापर्यंत पोचविण्याचे काम करत आहे. तसेच कोरोनाच्या काळात केलेली मदत या सर्व गोष्टी घेऊन ते लोकांपर्यंत जाणार आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वबळाचा नारा दिलेला आहे. त्यानुसार सातारा जिल्ह्यातील काँग्रेसही स्वबळावर लढण्याची तयारी करत आहे. आजपर्यंत काँग्रेसकडे असलेली सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीने हिसकावून घेतली आहेत. तसेच जिल्हा परिषदेच्या सत्तेत बरोबरीने असूनही काँग्रेसला कधीच सत्तेत स्थान दिलेले नाही. ही सल काँग्रेसच्या नेत्यांत आहेत. परिणामी काँग्रेसने यावेळेस सर्व निवडणुका स्वबळावर लढण्याची तयारी केलेली आहे. शिवसेनेचे जिल्ह्यात दोन आमदार व दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. या ताकतीवर शिवसेना आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहे. पण, स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून, याबाबत मात्र पक्षप्रमुखांच्या आदेशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नेत्यांनी पक्ष, संघटना बांधणीवर लक्ष केंद्रित केले आहे.
आगामी निवडणुका स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून, याबाबतचा निर्णय पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार हेच घेतील. त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्यात वाटचाल करणार आहोत. आघाडी झाल्यास राष्ट्रवादीचा आमदार असलेल्या मतदारसंघात राष्ट्रवादीला ६० टक्के तर शिवसेना व काँग्रेसला प्रत्येकी २० टक्के प्रमाणे जागा वाटप ठरलेले आहे. त्यामुळे पक्षाच्या अध्यक्षांच्या भूमिकेवर आगामी निवडणुकांचे नियोजन होईल.
सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस
भाजपचे जिल्ह्यात दोन खासदार व दोन आमदार असून, या ताकदीवर आगामी निवडणुकांचे नियोजन आम्ही करणार आहोत. भाजप सर्व निवडणुका स्वबळावर व पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहे. जिल्हा परिषदेतही आमचे सात सदस्य आहेत. त्यामुळे आगामी काळात केंद्र शासनाने राबविलेल्या योजना व घेतलेले निर्णय सर्वसामान्य मतदारांपर्यंत पोचविण्यावर आमचा भर आहे. त्याचा आम्हाला निवडणुकीत निश्चित फायदा होईल.
विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष, भाजप
शिवसेना पक्ष हा पक्षप्रमुखांच्या आदेशावर चालतो. त्यामुळे आगामी निवडणुका आम्ही स्वबळावर की आघाडीच्या माध्यमातून लढायच्या, हे पक्षप्रमुख ठरविणार आहेत. त्यांचा जो आदेश येईल, त्याप्रमाणे जिल्ह्यात आम्ही वाटचाल करू. जिल्ह्यात शिवसेनेचे दोन आमदार असून, एक मंत्री आहे. तसेच दोन जिल्हा परिषद सदस्य आहेत. या ताकदीच्या जोरावर आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत.
प्रा. नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना, सातारा जिल्हा
काँग्रेस पक्ष आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे. यासंदर्भात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भूमिका जाहीर केलेली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितींसह पालिकांच्या निवडणुकीत आम्ही स्वबळावर लढू. आजपर्यंत राष्ट्रवादीसोबत सत्तेत असूनही काँग्रेसला कोणतेही महत्त्वाचे पद जिल्ह्यात दिले नव्हते. नेहमीच डावलण्याची भूमिका घेतली होती. त्यामुळे काँग्रेस पक्षाने गमविलेले सदस्य परत मिळविण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.
डॉ. सुरेश जाधव, प्र. जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.