सातारा : कोरोना संसर्गाच्या लाटेशी मुकाबला करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जिल्हा रुग्णालयातील ३२ कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना आज तडकाफडकी काम थांबविण्यास सांगण्यात आले आहे. रुग्णालयातील मंजूर स्वच्छता कर्मचाऱ्यांची पदे अपुरी असताना झालेल्या या निर्णयामुळे वॉर्डची सफाई करणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील दाखल होणाऱ्या रुग्णांच्या आरोग्याशी स्वच्छतेअभावी खेळ होणार आहे.
आरोग्यसेवेतील रिक्तपदे हा बऱ्याच वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न आहे. सरकार कोणतेही आले तरी त्यावर मार्ग काढणे शक्य झालेले नाही. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातही अन्य वर्गाप्रमाणेच स्वच्छता कर्मचाऱ्यांचीही पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयाच्या क्षमतेपेक्षा जास्त रुग्ण बाह्य तसेच आंतररुग्ण विभागात दाखल असतात. त्यामुळे शासकीय निमयानुसार मंजूर केलेली पदेच अपुरी पडतात. स्वच्छता कर्मचाऱ्यांचेच पहायचे झाल्यास १६४ मंजूर पदे आहेत. परंतु, रिक्त, हजर नसलेले असे कर्मचारी वगळल्यास त्यातील ९० कर्मचारीच सध्या कार्यरत आहेत. त्यातीलही दहा कर्मचारी सध्या कोरोना रजेवर आहेत. प्रशासकीय यंत्रणांना याची जाणीव असल्यामुळेच सुमारे दहा ते १२ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी जिल्हा रुग्णालयाच्या स्वच्छेतेसाठी नेमण्यात आले. कालांतराने त्यात काही वाढही झाली. सध्या रुग्णालयाच्या स्वच्छेतच्या कामात ३८ कंत्राटी कर्मचारी महत्त्वाची भूमिका बजावत होते. त्यातील २२ कर्मचारी तर १२ वर्षांपासून कार्यरत आहेत. पगार वेळेवर मिळाला नाही तरी, त्यांची जिल्हा रुग्णालयात अविरत सेवा सुरू होती. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील वॉर्ड व परिसर स्वच्छ राहण्यास मदत होत होती. कोरोना संसर्गाच्या काळात अनेकजण रुग्णाच्या व रुग्ण असलेल्या परिसराच्या जवळ जाण्यास कचरत होते. अशा परिस्थितीतही हे कर्मचारी जिल्हा रुग्णालयात कार्यरत राहून सेवा बजावत होते. आवश्यकतेमुळे रजा, साप्ताहिक सुट्या मिळाल्या नाहीत तरी कर्मचाऱ्यांचे काम सुरू होते.
जिल्हा रुग्णालयामध्ये १९ वॉर्ड आहेत. या प्रत्येक वॉर्डमध्ये २४ तासाला किमान पाच कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते. अतिदक्षता विभाग, प्रसूती कक्ष, शस्त्रक्रियागृह अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांची आणखी गरज वाढते. त्याचबरोबर दैनंदिन बाह्यरुग्ण विभागाच्या कामकाजासाठी किमान १२ कर्मचाऱ्यांची गरज असते. कंत्राटी कर्मचारी कमी केल्यास रुग्णालयाच्या दैनंदिन कामकाजासाठी सुमारे ८० कर्मचारीच उरणार आहेत. त्यातही काही जण साप्ताहिक सुटी व रजांवर असणारच आहेत. अशा परिस्थितीत वॉर्डमधील कचरा काढणे, फरशी पुसणे, बाथरूमची सफाई, रुग्णांची एक्स रे, सिटीस्कॅन व अन्य आवश्यक गोष्टींसाठी ने-आण करणे, ऑक्सिजन प्लँट पाहणे, परिसराची स्वच्छता व बाह्यरुग्ण विभागातील कामे होणार कशी, असा प्रश्न निर्माण होणार आहे. स्वच्छेतेची कामे न झाल्यास जिल्हा रुग्णालयातील रुग्णांच्या आरोग्याशी नक्कीच खेळ होऊ शकतो. पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी नेहमीच रुग्णालयाच्या स्वच्छतेकडे गांभीर्याने लक्ष दिले आहे. त्यामुळे रुग्णालयातील स्वच्छता अबाधित राहण्यासाठी त्यांनी तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.
कर्मचाऱ्यांना कामावर घेणे आवश्यक
कंत्राटी कर्मचाऱ्यांना कमी केल्यास रुग्णालयाच्या स्वच्छेतेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. रुग्णांना त्याचा त्रास होईल. त्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांनी या प्रश्नावर तातडीने मार्ग काढावा, अशी आमची मागणी असल्याचे चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षा सुरेखा चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.