घाबरू नका! कोरोनावरील लशीमुळे एड्‌स होत नाही; ऑक्‍सफर्डचा दावा

घाबरू नका! कोरोनावरील लशीमुळे एड्‌स होत नाही; ऑक्‍सफर्डचा दावा
Updated on

मायणी (जि. सातारा) : ऑस्ट्रेलियात विकसित केलेल्या कोरोना लशीमुळे काही लोकांना एड्‌स (एचआयव्ही) झाल्याची ब्रेकिंग न्यूज काही मराठी वृत्तवाहिन्यांनी चालवून खळबळ माजवली. मात्र, ते वृत्त दिशाभूल करणारे असून, नागरिकांनी अकारण घाबरू नये, असे आवाहन ऑक्‍सफर्डच्या मेडिकल सायन्स डिव्हिजनचे वरिष्ठ संशोधक डॉ. नानासाहेब थोरात यांनी केले आहे.
लढाई कोरोनाच्या लशीची... (डॉ. नानासाहेब थोरात )
 
कोरोना लशीमुळे काहींना एड्‌स (एचआयव्ही) झाल्याचे वृत्त काही मराठी वृत्तवाहिन्यांनी प्रसारित केले. त्यामुळे उलटसुलट चर्चा होऊन लोकांमध्ये लशीबाबत भीती निर्माण होत आहे. म्हणून डॉ. थोरात यांनी "सकाळ'शी संवाद साधून त्याबाबतचे वास्तव समोर आणले. डॉ. थोरात म्हणाले, ""ऑस्ट्रेलिया किंवा जगभरात विकसित होत असलेल्या लशीमुळे कोणालाही एचआयव्ही वा इतर आजार झालेले नाहीत. ऑस्ट्रेलियामधील क्वीन्सलॅंड विद्यापीठ आणि सीएसएल कंपनीच्या साह्याने कोरोनावरील लस विकसित केली. मार्च 2020 पासून त्या लशीच्या फेज एक व फेज दोन चाचण्या सुरू होत्या. एप्रिल 2021 पर्यंत फेज-तीनच्या चाचण्या पूर्ण करून लस लोकांना देण्याचे नियोजन करण्यात आले होते. कोरोना व्हायरसचा स्पाइक प्रोटीन व मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसमधील एक छोटासा घटक एकत्र करून तयार केलेली लस मानवी रोगप्रतिकारक संस्थेकडे पाठवण्यासाठी "मोलेक्‍युलर क्‍लॅम्प' हे विशिष्ट तंत्रज्ञान निर्माण केले होते. इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा एचआयव्ही म्हणून ओळखला जातो.''

ऑक्‍सफर्डची कोरोनावरील लस दीडशे रुपयांत!
 
"मोलेक्‍युलर क्‍लॅम्प' टेक्‍नॉलॉजीमध्ये असणाऱ्या इम्युनोडेफिशियन्सी व्हायरसकडील असणारे प्रोटीन लोकांना कोणत्याही प्रकारे एचआयव्ही संसर्गित करण्यास किंवा एचआयव्ही व्हायरसची निर्मिती करण्यास सक्षम नाही. मात्र, त्या तंत्रज्ञानामुळे शरीरात कोरोना व एचआयव्ही या दोन्ही व्हायरसविरुद्ध प्रतिकारशक्ती तयार होत होती. लस देताना सर्व स्वयंसेवकांना त्याबाबतची माहिती देण्यात आली होती. एचआयव्ही प्रोटिन्सचा भाग प्रयोगशाळेत तयार केला होता. त्याचा लोकांच्या आरोग्यास कसलाही धोका नाही. डॉ. थोरात म्हणाले, ""प्रयोगशाळेत तयार केलेले एचआयव्ही प्रोटिन्स कोरोना व्हायरस लशीची कार्यक्षमता वाढवत असल्याचे दिसून आले होते. म्हणूनच त्या प्रोटिन्सचा वापर लशीसाठी केला होता. स्वयंसेवकांना ती लस दिल्यानंतर काही दिवसांनी त्यांच्यात कोरोना व्हायरस व एचआयव्ही विरुद्धही अँटीबॉडीज तयार होताहेत का ते पाहिले. तेव्हा दोन्ही विरुद्ध अँटीबॉडीज तयार झालेल्या आढळले. या वास्तवाची माहिती न घेताच, लशीमुळे लोकांना एचआयव्ही झाल्याचे वृत्त प्रसारित करण्यात आले.'' 

18 ते 55 वयोगटातील आणि 56 वर्षांवरील दोनशेहून अधिक स्वयंसेवकांना दोन गटांमध्ये विभागून (लस +प्लेसबो) या चाचण्या घेण्यात आल्या. त्यामध्ये ही लस सुरक्षित असल्याचे दिसून आले. त्या सर्व स्वयंसेवकांची प्रकृती सामान्य असून, एचआयव्ही रोगाची लक्षणे दिसून आली नाहीत. भविष्यातही एचआयव्ही होण्याची कोणतीही शक्‍यता नाही. शिवाय, ती लस फक्त ऑस्ट्रेलियामध्येच वितरित होणार होती. त्यामुळे भारतीय लोकांनी घाबरून जाण्याची गरज नसल्याचेही डॉ. थोरात यांनी स्पष्ट केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.