सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. परंतु, कोरोनाबाधितांच्या उपचारांकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांसाठी जीवनदायी ठरणाऱ्या रेमडिसिव्हर इंजेक्शनचा जिल्ह्यात या आठवड्यात खडखडाट झाला आहे. परिणामी रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरच्या जिल्ह्यांत धावाधाव करावी लागत आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांची जीवनरेखा रामभरोसे असल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे सकाळ माध्यम समूहाने विविध फ्लॅटफार्मच्या माध्यमातून मांडले. दरम्यान जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काेविड 19 रुग्णांना व नातेवाईकांना काेणतीही अडचण भासू नये यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ यांची नियुक्ती केली आहे.
मध्यंतरी काही महिने थंडावलेल्या कोरोना संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या महिन्यात कोरोना संसर्ग जिल्ह्यामध्ये वेगाने वाढतो आहे. दररोज 500 ते 700 च्यादरम्यान रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहेत. आत्तापर्यंत जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येने 68 हजारांचा आकडा ओलांडला आहे. रुग्णांची संख्या वाढत असतानाच आता कोरोनाने मृत्यू होण्याच्या प्रमाणातही वाढ होताना दिसत आहे. आत्तापर्यंतच्या कोरोनाने मृत्यू झालेल्यांची संख्या दोन हजारांकडे गेली आहे. गेल्या काही महिन्यांत दररोज एक किंवा दोन नागरिकांचा मृत्यू होत होता. अनेक दिवस मृत्यूविनाही गेले आहेत. परंतु, सध्या रुग्णसंख्या वाढू लागल्याने मृत्यूचा आकडाही वाढू लागला आहे. कालच सहा रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यात Covid 19 ची लस संपली! दोन लाख नागरिकांचा दुसरा डोस लांबणीवर
कोरोनाबाधितांवर उपचारासाठी जिल्ह्यात जम्बो कोविड रुग्णालय आहे. त्याचबरोबर जिल्हा रुग्णालय तसेच ग्रामीण रुग्णालयांमध्येही कोरोना रुग्णांवर उपचाराची सुविधा आहे. परंतु, वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही रुग्णालये अपुरी पडत आहेत. अनेक कोरोनाबाधित खासगी रुग्णालयांतही उपचार घेत आहेत. अत्यवस्थ स्थितीत जाणाऱ्या कोरोनाबाधितांसाठी रेमडिसिव्हरचे इंजेक्शन हे जीवनदायी असे ठरत आहे. या इंजेक्शनच्या उपयोगामुळे अनेकांची अत्यंत क्रिटिकल झालेली अवस्था सुधारण्यास मदत झाली आहे. आजवर अनेक रुग्णांवरील उपचारादरम्यान हे समोर आले आहे.
शासकीय रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णाला ही इंजेक्शन मोफत उपलब्ध होतात. परंतु, खासगी रुग्णालयातील रुग्णांना ही विकत घ्यावी लागतात. ही इंजेक्शन स्वस्तात मिळावीत, यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने खरेदी किमतीच्या दहा टक्केच रक्कम घेऊन विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे रुग्णांना लाभ होत होता. परंतु, सध्या जिल्ह्यामध्ये या इंजेक्शनचा खडखडाट झाला आहे. त्यामुळे इंजेक्शनच्या उपलब्धतेसाठी नातेवाईकांना धावाधाव करावी लागत आहे. तरीही ती जिल्ह्यात उपलब्ध होत नसल्याने अनेकांना कोल्हापूर, पुणे किंवा मुंबई येथे शोधाशोध करून इंजेक्शन आणण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. पूर्वी शासकीय रुग्णालयांतून इंजेक्शन उपलब्ध करून दिली जायची. परंतु, आता ती उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे "शासकीयमधून मिळेना आणि खासगीत उपलब्ध होईना' अशी इकडे आड, तिकडे विहीर अशी अवस्था रुग्णांच्या नातेवाईकांची होत आहे. त्यामुळे अनेकांना मृत्यूशी झगडावे लागत आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी व उपचारासाठी जिल्हाधिकारी व आरोग्य विभाग झटत आहे. परंतु, रेमडिसिव्हरच्या उपलब्धतेबाबत एकंदर प्रशासनाची उदासीन भूमिका दिसत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. रेमडिसिव्हरच्या उपलब्धतेसाठी एखादी हेल्पलाइन तयार केल्यास त्याचा नागरिकांना चांगला फायदा होऊ शकतो.
शंभू महादेवाची चैत्री यात्रा सलग दुसऱ्या वर्षी रद्द; शिंगणापुरात प्रांताधिकाऱ्यांच्या बैठकीत महत्वपूर्ण निर्णय
शासकीय व खासगीतील घोळ!
दरम्यान, यापूर्वी फिजिशिअनच्या सल्ल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सहीने ही औषधे उपलब्ध होत होती. शासनाने अधिगृहित केलेल्या खासगी दवाखान्यांतील रुग्णांनाही ही पुरवली जात होती. परंतु, तीन दिवसांच्या आत ती परत देण्याची अट संबंधित रुग्णालयाला घातली जाते. या अटींचे अनेकांनी पालन केले नाही. त्यामुळे सुमारे तीन हजार इंजेक्शन आरोग्य विभागाला परत मिळाली नाहीत. त्यामुळे सध्या गरज असलेल्या रुग्णांना इंजेक्शन उपलब्ध होण्यास अडथळा येत आहे. त्यामुळे इंजेक्शनचा लाभ घेतलेल्यांनी आरोग्य विभागाला ती पुन्हा परत करणेही आवश्यक आहे.
आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी उपाययाेजना
सातारा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग वाढत असून कोविड बाधित रुग्णांवर विविध रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्यांना आवश्यक ती वैद्यकीय सुविधा पुरविणे आवश्यक असून यासाठी पुरेशा प्रमाणात औषधसाठा असणे आवश्यक आहे. याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे व त्याबाबत नियोजन करणे आवश्यक आहे. संशयित रुग्णांमुळे आपत्तीजनक परिस्थिती सातारा जिल्ह्यात उद्भवू नये यासाठी पूर्वतयारी करणे अगत्याचे झाले आहे. कामकाज पूर्ण करण्याकामी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त मनिषा जवंजाळ यांची जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नियुक्ती आदेशान्वये केली आहे.
कोविड-19 संक्रमित रुग्णांची रुग्णालयातील दैनंदिन दाखल संख्येबाबत सर्व हॉस्पीटल प्रशासन यांच्याशी श्रीमती जवंजाळ समन्वय ठेवतील. जिल्ह्यातील मेडिकल ऑक्सीजन, रेमिडिसवर इंजेक्शन व अन्य अनुषंगिक औषधांचा तुटवडा भासणार नाही यासाठी तात्काळ नियोजन करतील. कोविड 19 चे औषधोपचार न मिळाल्याचे कारणाने मृत्यु होणार नाहीत यासाठी औषध वितरण व्यवस्था सुरळीत पार पाडतील . जिल्ह्यात औषधांचा काळाबाजार, अवैध साठेबाजी होणार नाही यासाठी विशेष उपाययोजना राबविण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सिंह यांनी नमूद केले. जवंजाळ या त्यांच्या स्तरावरुन आवश्यक अधिकारी, कर्मचारी यांची नियुक्ती करुन त्यांच्या सहायाने कामकाज पार पाडतील असे त्यांनी स्पष्ट केले.
सातारकरांनाे! कोरोना चाचणीपासून ते प्लाझ्मा मिळण्यापर्यंतची महत्वाची माहिती जाणून घ्या एका क्लिकवर
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.