कातरखटाव परिसरात घडणाऱ्या लूटमारीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत.
कातरखटाव : कातरखटाव (ता. खटाव) परिसरात रस्त्यावर रात्री-अपरात्री दुचाकी, चारचाकी वाहने अडवून त्यांना लुटण्याचे प्रकार घडत आहेत. गेल्या १५ दिवसांत चार घटना घडल्या असून, वाहनचालक, नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. चारही लूटमारीच्या घटनांत एकच पद्धत असून, यामध्ये चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे.
सांगली-भिगवण (Sangli-Bhigwan) या प्रमुख राज्यमार्गावर कातरखटाव (Katarkhatav) हे गाव आहे. या राज्यमार्गाकडे जाण्यासाठी कातरखटाव परिसरातून जावे लागते. याशिवाय नजीकच पडळ येथे एक साखर कारखानादेखील आहे. याठिकाणी अन्य भागांतून ऊस गाळपासाठी येतो. तसेच या भागांतील ऊस औंध (घाटमाथा) येथील व कोरेगावच्या एका साखर कारखान्याला गाळपासाठी जात असतो. त्यामुळे या मार्गावर सातत्याने ऊस वाहतूक व अन्य दुचाकी, चारचाकी वाहनांची वर्दळ सुरू असते. गेल्या १५ दिवसांपूर्वी मध्यरात्री कातरखटाव-वडूज रस्त्यावर खरमाटे वस्तीनजीक एका लहान कालव्यावर ऊस वाहतूक करणारे दोन-तीन ट्रॅक्टर अडवून लुटण्याची घटना घडली.
कालव्यानजीक एक महिला रस्त्यावर उभी राहून वाहनचालकांना थांबविते. काहीतरी घटना घडली असावी व मदतीच्या भावनेने काही वाहनचालक थांबतात. वाहन थांबल्यानंतर कालव्यातून अज्ञात चार ते पाच जण अचानकपणे बाहेर येतात व संबंधितास मारहाण करून त्याच्याकडील काही ऐवज, रोख रक्कम, मोबाईल आदी वस्तू लुटतात. अशा प्रकारे एकाच रात्रीत दोन ते तीन ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकांना लुटण्यात आले होते. त्यानंतरही अशा एक ते दोन घटना घडल्या. त्यानंतर याच ठिकाणी गेल्या दोन दिवसांपूर्वी एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकावर अज्ञात चोरट्यांनी दगडफेक केल्याची घटनादेखील घडली.
दोन दिवसांपूर्वी रात्रीच्यावेळी कातरखटाव-पडळ रस्त्यावर मानेवाडी गावालगतच्या कालव्याजवळ याच प्रकारे एका खासगी चारचाकी वाहनचालकास अडवून त्याच्या गळ्याला चाकू लावून लुटण्याची घटना घडली. लुटमारीने भयभीत झाल्यानंतर संबंधित वाहनचालकाने कातरखटाव गावाजवळ येऊन काही ग्रामस्थांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळविल्यानंतर घटनेच्या ठिकाणावर जाऊन शोध घेतला. मात्र, चोरटे पसार झाले होते. कातरखटाव परिसरात गेल्या १५ दिवसांत लुटमारीच्या अशा चार घटना घडल्याने वाहनचालक व नागरिकांत घबराटीचे वातावरण पसरले आहे. या लुटमारीत चोरट्यांची मोठी टोळी सक्रिय असण्याची शक्यता असून पोलिसांनी शोध घेण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
‘‘कातरखटाव परिसरात घडणाऱ्या लूटमारीच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. त्याचा येथील बाजारपेठेवरही परिणाम होऊ लागला आहे. पोलिसांनी चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा.’’
-अजित सिंहासने, अध्यक्ष, व्यापारी संघटना, कातरखटाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.