कऱ्हाड : खरीप हंगामात अपेक्षित पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या हिमतीने खरिपातील पिके जगवली. सध्या त्यांची काढणी सुरू आहे. मात्र, अशातच पावसाने हजेरी लावल्याने काढणी झालेले भात, सोयाबीन, हायब्रीड भिजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कष्टावरच पाणी फेरल्यासारखी स्थिती झाली आहे.
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाल्याने जिल्ह्यात दाखल झालेल्या ऊसतोड मजूर स्थिरस्थावर होत असतानाच अवकाळीने हजेरी लावली. त्यामुळे ऊसतोड मजुरांच्या चंद्रमोळ्या झोपड्यांत पाणी जाऊन त्यांचे जीवनावश्यक साहित्य भिजून नुकसान झाले. त्यामुळे त्यांना निवारा शोधण्याची वेळ आली आहे.
भात, सोयाबीन काढणी लांबणीवर
सोयाबीन पिकाची काढणी सध्या अंतिम टप्प्यात आहे. अशातच पावसाने हजेरी लावल्याने अनेक ठिकाणचे सोयाबीन पाण्यातच आहे. त्याचबरोबर भाताची काढणीही अंतिम टप्प्यात आहे. त्यातच पाऊस आल्याने शेतात ओल आहे. त्यामुळे भात, सोयाबीन काढणी लांबणीवर जाणार आहे.
तोडलेल्या उसासाठी शेतकऱ्यांची पदरमोड
साखर कारखाने सुरू झाल्यामुळे गेल्या आठवड्यापासून ऊसतोडी सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काल ऊस तोडून ऊसतोड मजुरांनी शेतात ठेवला होता. मात्र, मध्यरात्रीनंतर आलेल्या पावसाने शेतातील ऊस बाहेर काढण्याचा प्रश्न निर्माण झाला. परिणामी, संबंधित शेतकऱ्यांना पदरमोड करून मजुरांमार्फत तोडलेला ऊस शिवारातून बाहेर काढण्याची वेळ आली.
ऊसतोडी थांबवाव्या लागणार
साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. ऊसतोड मजूर जिल्ह्यात दाखल झाले आहेत. मात्र, पावसाने अनेक शिवारात पाणी साचून राहिल्याने आणखी एक-दोन दिवस तरी ऊसतोडी बंद ठेवाव्या लागतील, असे चित्र आहे.
व्यावसायिकांनाही फटका
ऐन थंडीत वादळी पावसाने दिवाळीच्या तोंडावर हजेरी लावली आहे. त्यामुळे बाजारपेठेत साहित्य विक्रीसाठी बसणारे छोटे किरकोळ दुकानदार, फटाका विक्रेते, रस्त्यावर बसून सिझनल माल विकणारे, स्टॉलधारकांना पावसाचा फटका बसला आहे. पावसाने बाजारपेठेत ग्राहक कमी असल्याने त्यांच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे.
अशी आहे नुकसानीची स्थिती...
काढणी झालेले सोयाबीन, भात, हायब्रीड भिजून नुकसान
काढणी राहिलेली खरिपातील पिके शेतातच
पावसाचे पाणी शिवारात साचून ऊसतोडी थांबल्या
ऊसतोड मजुरांच्या झोपड्यांत पाणी जाऊन नुकसान
शेतातील ओल हटल्याशिवाय काढता येणार नाहीत पिके
पावसाची आकडेवारी
(मंडलनिहाय मिलिमीटरमध्ये)
कऱ्हाड - ४२.५
उंब्रज - २१.८
इंदोली -६.०८
सुपने - ३०
मसूर - ६
कवठे -१७.८
कोपर्डे हवेली - १८.३
सैदापूर - ३७.८
शेणोली - ३६
कोळे - ४१.३
काले - ४.३
मलकापूर - ८
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.