कुडाळ (जि. सातारा) : जावळी तालुक्यातील सर्वांत मोठी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे धुमशान पेटणार असून, ही निवडणूक दुरंगी होणार की तिरंगी, याकडे आता तालुक्याचे लक्ष लागले आहे.
जावळी तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून कुडाळ गावाकडे पाहिले जाते. राजकीयदृष्ट्या कुडाळ गावाला तालुक्यात मोठे महत्त्व आहे. त्यामुळे या गावची निवडणूक दरवर्षी मोठी चुरशीची, रंगतदार आणि खर्चिक होत आहे. 15 ग्रामपंचायत सदस्यांसाठी निवडणूक होत असून, सुधारित वॉर्ड रचनेनुसार एकूण 5,191 मतदार आहेत. दोन दिवसांपूर्वीच मतदार याद्या प्रसिध्द झाल्या असून, अंदाजे 15 डिसेंबरपर्यंत सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होणार आहे. त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होणार असून, जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात मतदान होईल, अशी माहिती ग्रामपंचायतीचे प्रशासक श्री. म्हासाळ यांनी दिली आहे. त्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी अगदी तोंडावर आल्याने त्या दृष्टीने सर्वच राजकीय गटांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
गतवर्षीच्या निवडणुकीत माजी आमदार (कै.) लालसिंगराव शिंदे गटाच्या तब्बल 25 वर्षांच्या सत्तेला हादरा देत पारंपरिक विरोधक सुरेशराव शिंदे यांच्या गटाने पहिल्यांदाच सत्तांतर केले होते. सत्ताधारी गटाकडून विरेंद्र शिंदे यांनी सरपंच म्हणून 5 वर्षे काम पाहिले होते. दरम्यानच्या काळात राजकीय समीकरणे पुन्हा बदलण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या पाच वर्षांत अनेक सत्ता समीकरणे बदलली असल्याने यंदाची निवडणूक अधिक चुरशीची ठरणार आहे. या निवडणुकीत उपसभापती सौरभ शिंदे यांनी रणशिंग फुंकल्याने यावेळची निवडणूक प्रतिष्ठेची होणार आहे. बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे व "प्रतापगड'चे संचालक मालोजीराव शिंदे यांची उपसभापती सौरभ शिंदे यांच्या गटासोबत गुप्तगू सुरू असल्याने त्यांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. या निवडणुकीसाठी "92 ग्रुप' या तिसऱ्या गटानेही आव्हान निर्माण केल्याने यावेळची लढत तिरंगी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौरभ शिंदे, विरेंद्र शिंदे व "92 ग्रुप' अशी तिरंगी लढत लागली तर कोण कुणाच्या मतांवर डल्ला मारणार आणि कुणाची जिरवणार, याचीही चर्चा सुरू झाली आहे.
प्राथमिक स्तरावर बैठका सुरू
सध्या प्राथमिक स्तरावर प्रत्येक गटाच्या स्वतंत्र बैठका सुरू झालेल्या आहेत. कुणासोबत आघाडी करायची, की स्वतंत्र लढायचे, या विषयीही काथ्याकुट सुरू झालेला आहे. जावळीतील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या कुडाळमध्ये काय होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.