बुध : पर्यावरणसंवर्धन आणि वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी आयुष्य वाहून घेतलेले सर्वोदय सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जीवन इंगळे (वय ६६) यांनी सायकलवारी करत दहा वर्षांत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढत दोन हजारांवर पुस्तकांच्या माध्यमातून आबालवृद्धांना वाचनाची गोडी लावली. लोकांना वाचनाची सवय लागावी, महात्मा गांधी, विनोबा भावे, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आदी राष्ट्रपुरुषांचे विचार वाचनाच्या माध्यमातून तळागाळातील लोकांमध्ये रुजावेत या हेतून श्री. इंगळे यांचा हा प्रवास निरंतर सुरू आहे.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी श्री. इंगळे यांनी सायकलवरून प्रवास करीत संपूर्ण सातारा जिल्हा पिंजून काढला. नागपूर, कोकण, उत्तर महाराष्ट्र असे दौरे करून लोकांना पर्यावरण आणि वाचनाचे महत्त्व पटवून दिले. या काळात त्यांनी दोन हजारांहून अधिक पुस्तकांचा संचय केला. थोरांची चरित्रे, ललित साहित्य, कादंबरी, कवितासंग्रह, लहानांसाठी बाल साहित्याची पुस्तके गावोगावी फिरून नागरिकांना व मुलांना वाचनासाठी दिली. आजही श्री. इंगळे (काका) गावात आले, की पुस्तके घेण्यासाठी त्यांच्याभोवती लहान थोरांचा घोळका जमतो. श्री. इंगळे हे पर्यावरण संवर्धनाचा संदेश घेऊन गावोगावी सायकलवरून फिरतात. सायकल चालविण्याने शरीर सुदृढ राहते म्हणून ते रोज दहा किलोमीटर सायकल चालवतात. पर्यावरण आणि वाचन संस्कृती जोपासण्यासाठी श्री. इंगळे यांनी गेल्या दहा वर्षांत शाळा, कॉलेजमध्ये जाऊन शेकडो कार्यक्रम केले आहेत.
मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावे, यासाठी उन्हाळी शिबिरे व सहलींचे आयोजन ते करीत असतात. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन विविध संस्थांनी त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. समाज परिर्वतनाचा ध्यास घेतलेल्या श्री. इंगळे यांच्या मनावर विनोबा भावे यांच्या विचारांचा प्रभाव दिसून येतो. महात्मा गांधी, विनोबा भावे यांचे विचार पुढच्या पिढीकडे सुपूर्त करण्याचे काम श्री. इंगळे करत असून, त्यासाठी गांधीजींच्या आदर्श गाव संकल्पनेवर आधारित राजापूर (ता. खटाव) येथील महादेवदरा येथे ग्रांधीग्राम उभारण्याचा त्यांचा मानस आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.