'..त्यामुळं इतकं राजकारण कळण्यासारखा मी दुधखुळा नाही.'
सातारा : जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (Satara District Bank Election) आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendrasinharaje Bhosle) यांच्यामुळे माझा पराभव झाला, असा गौप्यस्फोट आमदार शशिकांत शिंदे (Shashikant Shinde) यांनी केला. हे त्यांचंच षडयंत्र आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. जिल्हा बँकेतील पराभवानंतर आमदार शिंदे यांनी आज सातारा शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधून आपली भूमिका जाहीर केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवरही टीका केली.
पराभवानंतर आज (गुरुवार) आमदार शिंदे यांनी माध्यमांसमोर त्यांचा नेमका का पराभव झाला? याबाबत विचार मांडले. दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे नाईक-निंबाळकर यांनी भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना पॅनलमध्ये कसे घेतले, असा सवाल पत्रकारांनी आमदार शिंदेंना विचारला. त्यावर शिंदे म्हणाले, ज्यांना आम्ही विरोध केला असं दाखविलं गेलं, त्या खासदार उदयनराजे भोसले यांना पॅनलमध्ये घेतलं. त्यांना सातत्यानं विरोध केला जात होता. मग, असं अचानक काय घडलं की महाराष्ट्रातील इतर कोणत्या नेत्याची जादूची काडी फिरवली गेली आणि उदयनराजेंना बिनविरोध करावं लागलं.
ते पुढे म्हणाले, एका बाजूला तुम्ही सगळे एकत्र येऊन बिनविरोध होता. ज्यांच्याशी तुमचे वाद आहेत, त्यांना घेऊन तुम्ही बिनविरोध करता. मग, दुसऱ्या बाजूला पाच वर्ष तुमच्यासोबत चांगलं काम करुन देखील, तुम्ही त्यांना पराभूत कसं करता. त्यामुळं इतकं राजकारण कळण्यासारखा मी दूधखुळा नाही. मात्र, फसवून पाडण्याचा प्रयत्न केला, हे चुकीचंच आहे, असंही त्यांनी नमूद केलं. मी सरळ पणानं निवडणूक केली, कोणतीही दादागिरी केली नाही. सातारा विधानसभा लढविणार का, या प्रश्नावर मी सध्या विधान परिषदेवर आहे. त्यामुळं या जिल्ह्यात पुन्हा राष्ट्रवादीचे 9 आमदार कसे होतील यासाठी प्रयत्न करणार आहे, असंही त्यांनी शेवटी सांगितलं.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.