Karad Court : आठ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून मृतदेह दरीत दिला फेकून; नराधमाला फाशीची शिक्षा
आरोपीस दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे, असे न्यायमूर्ती कल्पना होरे यांनी सांगताच आरोपी थोरातला अश्रू अनावर झाले.
कऱ्हाड : आठ वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिचा खून करणाऱ्या नराधमास अतिरिक्त जिल्हा व सत्र विशेष (Karad Court) न्यायाधीश श्रीमती कल्पना एस. होरे यांनी काल फाशीची शिक्षा ठोठावली. संतोष चंद्रू थोरात (वय ४३) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे.
ढेबेवाडी विभागात दीड वर्षापूर्वी २९ डिसेंबर २०२१ रोजी अत्याचार आणि गळा आवळून खून केल्याचा हा खळबळजनक प्रकार घडला होता. आरोपीने बालिकेचा मृतदेह दरीत फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये संतोष थोरातला दोषी धरत न्यायाधीश होरे यांनी फाशीची शिक्षा ठोठावली.
खुनासह बाललैंगिक अत्याचार विरोधी (पोक्सो) कायद्यांतर्गत (POCSO Act) येथे सुनावलेली ही राज्यातील पहिली फाशीची शिक्षा आहे. आरोपी संतोष थोरातने या बालिकेला चॉकलेट देण्याचा बहाणा दाखवून अत्याचार केला. त्यानंतर तिचा गळा आवळून खून करून मृतदेह एका ८० फूट खोल दरीत टाकला. त्यानंतर सायंकाळी पाचच्या सुमारास घरी निघून गेला.
रात्री साडेसातच्या सुमारास बालिका सापडत नसल्याने गावात गोंधळ उडाला. पोलिसांना माहिती देण्यात आली. सहायक पोलिस निरीक्षक संतोष पवार व पथक गावात दाखल झाले. त्यांनी गावात एकच असलेला सीसीटीव्ही तपासला. त्यात आरोपी थोरातसोबत बालिका जाताना दिसली. पोलिसांनी त्वरित त्याला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून सारा प्रकार तपासातच उघड केला. सहायक पोलिस निरीक्षक श्री. पवार यांनी २० जानेवारी २०२२ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. आरोपी थोरातवर १५ मे २०२२ रोजी दोषारोप ठेवून खटल्याची सुनावणी सुरू झाली. सरकार पक्षातर्फे अॅड. आर. सी. शाह यांनी खटल्याचे काम पाहिले. सरकारी वकील मिलिंद कुलकर्णी व अॅड. आर. डी. परमाज यांनी अॅड. शाह यांना खटल्यात सहकार्य केले.
पोलिसांतर्फे हवालदार प्रशांत तारळकर यांनी फिर्याद दिली होती. सरकार पक्षातर्फे ३३ साक्षीदार तपासण्यात आले. त्यातील १२ साक्षीदार महत्त्वाचे ठरले. त्या बालिकेला आरोपी थोरातबरोबर जाताना पाहिलेल्या दोन महिला, त्या बालिकेची मैत्रीण, आजी, सीसीटीव्ही फुटेज देणारा ग्रामस्थ, ग्रामसेवक, चॉकलेट विकणारा दुकानदार, वैद्यकीय अधिकारी डॉ. आराफा सुतार, डॉ. नागनाथ धर्माधिकारी, फॉरेन्सिक तज्ज्ञ प्रज्योत खेतमर, डीएनए तज्ज्ञ कोमल महाजन यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या.
आरोपीच्या बचावासाठी न्यायालयातर्फे वकिलांची नेमणूक केली होती. आरोपीनेच बालिकेचा मृतदेह दरीतून बाहेर काढून पोलिसांच्या हवाली केला होता. फॉरेन्सिक अहवालही गुन्हा सिद्ध करण्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी बाजू अॅड. शाह यांनी मांडली. आरोपीचे पूर्वनियोजित कृत्य होते, हेही सिद्ध करण्यात सरकारी पक्षाला यश आले.
साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे व सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून जिल्हा व सत्रच्या विशेष न्यायमूर्ती कल्पना होरे यांनी आरोपीस फाशीची शिक्षा ठोठावली. दरम्यान, हा निकाल उच्च न्यायालयात मान्यतेला पाठविण्यात येणार आहे. त्यांची मान्यता आल्यानंतर आरोपीला त्यावरही अपील करण्याची संधी असणार आहे.
याआधीची मोठी शिक्षा तीस वर्षांची
बाललैंगिक अत्याचार विरोधी कायदा (पोक्सो) अस्तित्वात आल्यानंतर राज्यात अनेक शिक्षा झाल्या आहेत. काही महिन्यांपूर्वी सोलापूरला त्या कायद्यांतर्गत एका आरोपीला तीस वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. ती सर्वांत मोठी होती. मात्र, कऱ्हाडला त्याच कायद्यांतर्गत सुनावलेली फाशीची शिक्षा ही राज्यातील पहिली शिक्षा ठरली आहे, असे कायदेतज्ज्ञांनी सांगितले. अत्याचार व खून असल्याने फाशीची शिक्षा झाल्याचेही कायदेतज्ज्ञांनी स्पष्ट केले.
सातारा जिल्ह्यातील फाशीच्या शिक्षा...
सातारा जिल्ह्यात विविध खटल्यांत आतापर्यंत चार फाशीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या आहेत. त्यात पहिली फाशी ४० वर्षांपूर्वी साताऱ्यातील न्यायालयाने दुहेरी खून खटल्यात ठोठावली होती. त्यानंतर २००४ मध्ये सातारा न्यायालयाने वाईच्या खूनप्रकरणी, २००५ मध्ये जिल्हा न्यायालयाने लोणंद येथील दुहेरी खूनप्रकरणी, त्यानंतर कऱ्हाडच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने पोक्सोअंतर्गत आज सुनावलेली फाशीची शिक्षा ही जिल्ह्यातील चौथी तर कऱ्हाडच्या इतिहासातील पहिली फाशीची शिक्षा ठरली आहे.
लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न
खटला सुरू असताना आरोपी संतोष थोरातने न्यायालयाला पत्र लिहिले होते. त्यात त्याने लवकर निकाल लावून जास्तीतजास्त शिक्षा करण्याची मागणी केली होती. त्यामुळे वकीलही विचलित झाले होते. मात्र, सरकारी वकील अॅड. शाह यांनी सखोल तपासाची मागणी पोलिसांना केली. त्यात झालेल्या तपासानुसार थोरातने ते पत्र दुसऱ्याकडून लिहून घेतले होते, हे सिद्ध झाले. त्या पत्राचा वापर तो खटल्यात बचाव म्हणून करणार होता, हेही सरकारी वकिलांनी न्यायालयात सिद्ध केले.
निकालानंतर अश्रू अनावर
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायमूर्ती कल्पना होरे यांच्या समोर आरोपीस सव्वाएक वाजता हजर करण्यात आले. यावेळी पोलिस बंदोबस्तही होता. आरोपीस दोषी ठरवत फाशीची शिक्षा ठोठावण्यात येत आहे, असे न्यायमूर्ती कल्पना होरे यांनी सांगताच आरोपी थोरातला अश्रू अनावर झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.