राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आल्यास विकास साधता येतो : सुनंदा पवार

राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आल्यास विकास साधता येतो : सुनंदा पवार
Updated on

दहिवडी (जि. सातारा) : इथली माणसं सोन्यासारखी आहेत. मानापमान व राजकारण बाजूला ठेऊन एकत्र आले, तर गावाचा विकास साध्य करता येतो. विषारी औषधांमुळे पिकांची चव गेली आहे; पण इथल्या वातावरणात उत्तम चवीची पिके येऊ शकतात. त्यांची प्रत, चव टिकवा, तसेच झाड हा आपला श्वास असून त्यांची जोपासना करा, असे आवाहन बारामती अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी केले. 

बोथे गावाला सुनंदा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी भगवानराव जगदाळे, कृषी तज्ज्ञ भालचंद्र पोळ, भांडवलीचे उपसरपंच सुनील सूर्यवंशी, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक अजित पवार, संजय साबळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल काटकर, रमेश शिंदे, आप्पासाहेब देशमुख आदी मान्यवरांनी नुकतीच भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पवार बोलत होत्या. यावेळी सरपंच खाशीबाई जाधव, ग्रामसेवक दीपक आढाव व ग्रामस्थ उपस्थित होते. 

पवार पुढे म्हणाल्या, दुष्काळ पाचवीला पुजलेल्या माण तालुक्‍यातील बोथे गावावर मात्र निसर्ग फिदा झालाय. इथं आल्यावर आपण माण तालुक्‍यात आहोत यावर विश्वास ठेवण कठीण जातेय, असेही त्यांनी सांगितले. भगवानराव जगदाळे यांनी बोथे गाव पर्यटनस्थळ होण्यासाठी आदर्श असून, त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. भालचंद्र पोळ यांनी योग्य बटाटा बियाणांची निवड करून विषमुक्त बटाट्याचा खास 'बोथे ब्रॅंड' निर्माण करूयात, असे आवाहन केले. 

गाव पाहणीत येलमारच्या शेत परिसरात बटाटा, सोयाबीन, उडीद पिकांची पाहणी केली. गार वारे, पावसाची भुरभुर, हिरवागार निसर्ग, खळाळणारे पाणी व पवनचक्‍क्‍यांची फिरणारी पाती असा हा येथील रमणीय परिसर पाहून सर्वांनीच "कशाला महाबळेश्वरला जायचं, बोथे महाबळेश्वरपेक्षा कमी नाही' असे उद्‌गार काढले. पाहणीनंतर पाहुण्यांचे ग्रामपंचायत कार्यालयात गावात पिकविलेल्या देशी- विदेशी भाज्या देऊन स्वागत करण्यात आला. बोथे हे पर्यटनस्थळ होण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करूयात, असा निर्धार सर्वांनी व्यक्त केला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.