कऱ्हाडमधील पोलिस खात्याच्या मालकीच्या ११२ गुंठे जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
कऱ्हाड : येथील पोलिस (Karad Police) उपअधीक्षक कार्यालयासमोरील पोलिस वसाहतीच्या जागी संरक्षक भिंतीचे काम पोलिस प्रशासनाकडून कालपासून सुरू करण्यात आले आहे. ते काम प्रार्थना स्थळालगत असून, त्याशेजारील रस्त्यावरून काल दुपारी संबंधित समाज बांधव आणि पोलिस प्रशासन एकमेकांना भिडले. या वेळी झालेल्या वादावादी आणि धराधरीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. पोलिसांनी याप्रकरणी सुमारे दहाहून अधिक जणांना ताब्यात घेतले.
दरम्यान, समाज बांधवांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांशी याप्रकरणी चर्चा केली. त्यानंतर तणाव निवळला. येथील पोलिस उपअधीक्षक कार्यालयासमोर (Deputy Superintendent Police Office) ब्रिटिशांच्या काळापासून पोलिस वसाहत होती. ती वसाहत वापरास अयोग्य झाल्याने त्याचा वापरही बंद होता. अनेक वर्षे ती जागा तशीच पडून होती. त्या जागेला संरक्षत भिंत बांधण्यासाठी सुमारे तीन महिन्यांपूर्वी पोलिस खात्याकडून मोजणीही करून घेण्यात आली होती. त्या वेळी पोलिसांच्या जागेच्या हद्दीच्या खुणाही करण्यात आल्या होत्या.
त्या वेळी संबंधित समाजाच्या शिष्टमंडळासोबत बैठकही झाली होती. त्या वेळी आचारसंहिता संपल्यानंतर काम सुरू करण्यात येणार असल्याचे संबंधितांना सांगितल्याचे पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी सांगितले. दरम्यान लोकसभा निवडणुकीची मतमोजणी संपल्यानंतर कालपासून पोलिसांनी संबंधित ठिकाणी संरक्षित भिंत बांधण्यासाठी काम सुरू केले. त्या वेळी काल त्यास विरोध झाला. त्या वेळी वरिष्ठ शहर पोलिस निरीक्षक के. एन. पाटील यांच्याशी त्यांचा वाद झाला. त्यावरून पोलिस उपअधीक्षक ठाकूर यांच्यासमवेत सायंकाळी बैठक झाली. त्या बैठकीत समाजाच्या शिष्टमंडळाने काही अवधी मागून घेत वरिष्ठ पातळीवरून आदेश आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते.
त्यानंतर पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी शिष्टमंडळास भेटीसाठी आज बोलावले होते. त्यानंतर पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस यांना जागेची पाहणी करण्यासाठी येथे पाचारण करण्यात आले होते. आज दुपारपर्यंत वरिष्ठ पातळीवरून कोणतेही आदेश आले नसल्याने दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस प्रशासनाने पुन्हा जेसीबीच्या साहाय्याने भिंतीसाठी चर खोदण्यास सुरुवात केली. या वेळी संबंधित समाजातील तरुण व लगतच्या दरवेशी वस्तीतील महिलांनी पोलिसांशी वाद घालत काम रोखण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गोंधळ वाढत गेला. त्या वेळी काही महिला जेसीबीच्या समोर येऊन त्यांना काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला. त्याचदरम्यान पोलिसांनीही त्या महिलांना बाजूला केले. त्यानंतर वाद वाढत गेला.
या वेळी झालेल्या वादावादीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या सुमारे १० हून अधिक युवकांना व काही महिलांनाही ताब्यात घेतले. सुमारे अर्धा तास गोंधळ झाल्यानंतर काही लोकांशी चर्चा करत परिस्थिती हाताळण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न केले. सायंकाळी पाचच्या सुमारास साताऱ्याला बैठकीसाठी गेलेले मजहर कागदी, अल्ताफ शिकलगार, फारुक पटवेकर, इसाक सवार, बरकत पटवेकर, साबीर मुल्ला यांच्यासह राजेंद्र यादव व समाजातील वरिष्ठ घटनास्थळी आले. शिवराज मोरे हे ही त्यानंतर तेथे आले. त्यांनी पोलिस उपअधीक्षक अतुल सबनीस, अमोल ठाकूर व के. एन. पाटील यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर साताऱ्यात झालेल्या बैठकीचा माहिती देत वाद मिटविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. सायंकाळनंतर त्यास यश आले. त्यामुळे निर्माण झालेल्या वादाला आजतरी पूर्णविराम मिळाला आहे.
कऱ्हाडमधील पोलिस खात्याच्या मालकीच्या ११२ गुंठे जागेवर संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यासाठी साडेतीन महिन्यांपूर्वी त्या जागेची सरकारी मोजणी संबंधित लोकांच्या समोर करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना दाद मागण्यासाठी तीन महिने मुदतही देण्यात आली होती. आज वरिष्ठांकडून काहीच सूचना नसल्याने पोलिस खात्याच्या जागेला संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरू केले आहे. यावेळी झालेल्या वादावादीत आणि धराधरीत तीन पोलिस कर्मचारी जखमी झाले आहेत.
-अमोल ठाकूर, पोलिस उपअधीक्षक, कऱ्हाड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.