खासदार उदयनराजेंच्या मागणीचा अद्याप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचार केलेला नाही.
सातारा : जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत (Satara Bank Election) राखीव जागांचे वाटप अद्याप झालेले नाही. पण, महिला राखीवमधून सर्वाधिक २४ अर्ज आलेले आहेत. या मतदारसंघातील दोन जागांसाठी विद्यमान अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (MLA Shivendrasinharaje Bhosale) आणि सहकारमंत्री व पालकमंत्री बाळासाहेब पाटील (Minister Balasaheb Patil) आग्रही आहेत. त्यामुळे सातारा व कऱ्हाडमधील इच्छुक महिलेलाच संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, ऐनवेळच्या तडजोडीमध्ये इतर तालुक्यांतील महिलांचाही विचार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमध्ये (NCP Panel) कोणाला संधी मिळणार, याची आता उत्सुकता आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत आजपर्यंत महिला राखीव मतदारसंघातून कधीच नव्हते इतके उमेदवारी अर्ज दाखल झालेले आहेत. यापूर्वी अनेक महिला संचालिका झाल्या. पण, कामाचा ठसा उठविण्याइतके काम कोणाचेच झालेले नसल्याचे दिसते. मागील वेळी साताऱ्यातून कांचन साळुंखे व कोरेगावातून सुरेखा पाटील या दोघी संचालिका राहिल्या. या दोघींनी जिल्हा बॅंकेच्या विविध योजनांचा जास्तीत जास्त महिलांना लाभ मिळवून दिला आहे. तर कांचन साळुंखे यांनी आपल्या कामाचा ठसा उमटविला आहे. या वेळेस विद्यमान संचालिकाही पुन्हा इच्छुक आहेत. जिल्हा बॅंकेच्या इतिहासात प्रथमच यावेळेस महिला राखीवच्या दोन जागांसाठी तब्बल २४ अर्ज दाखल झालेले आहेत. यामध्ये सातारा तालुक्यातील सात, कऱ्हाड तालुक्यातील एक, खटाव तालुक्यातील पाच, कोरेगाव तालुक्यातील तीन, माण तालुक्यातील एक, पाटण तालुक्यातील चार, फलटण तालुक्यातील एक, वाई तालुक्यातील एक, जावळी तालुक्यातील एक असे २४ महिलांचे अर्ज दाखल झालेले आहेत. यातील काही महिला या नेत्यांच्या पत्नी आहेत. तसेच सातारा पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर यांनीही अर्ज भरलेला आहे.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक पॅनेलमधील नेत्यांमध्ये जागा वाटप झालेले नाही. कऱ्हाडला यावेळेस महिला राखीवमधील एका जागा द्यावी, अशी सहकारमंत्र्यांची मागणी आहे. तर आमदार शिवेंद्रसिंहराजेंनीही एका जागेची मागणी केली आहे. उदयनराजेंच्या कोट्यातून गीतांजली कदम यांनी अर्ज भरलेला आहे. पण, उदयनराजेंच्या मागणीचा अद्याप राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचार केलेला नाही. माजी आमदार (कै.) चिमणराव ऊर्फ सूर्याजीराव कदम, माजी आमदार (कै.) जी. जी. कदम, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, जितेंद्र पवार, रवींद्र कदम, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, राजेश पाटील-वाठारकर या नेत्यांच्या पत्नींचेही अर्ज संचालकपदासाठी दाखल झालेले आहेत. त्यामुळे आता नेत्यांच्या पत्नीला की सर्वसामान्य महिलेला संधी दिली जाणार, याची उत्सुकता आहे.
संचालकपदासाठी अर्ज भरलेल्या महिला...
दीपाली विश्वास पाटील, शशिकला मुगुटराव देशमुख, जयश्री वसंतराव मानकुमरे, विश्रांती विजय देशमुख, कांचन सतीश साळुंखे, गीतांजली संदीप कदम, सरिता संभाजी इंदलकर, रत्नमाला सुदाम निकम, ऋतुजा राजेश पाटील, विजया जितेंद्र पवार, अलका शंकर खामकर, चंद्रभागा शंकर काटकर, सुनीता बाळासाहेब भोईटे, मंदा शांताराम लोटेकर, जयश्री रवींद्र कदम, रेखा दादासाहेब पाटील, अनुराधा प्रभाकर देशमुख, साधना सिध्दार्थ गुंडगे, अर्चना किरण बर्गे, सुरेखा रमेश पाटील, अल्पना प्रताप यादव, शारदादेवी सूर्याजीराव कदम, आशालता गेनुजी कदम, इंदिरा प्रभाकर घार्गे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.