आमचं बी नाव पंचायतीच्या बोर्डावर लागू दे की; फलटणला इच्छुकांतून आळवला जातोय सूर

आमचं बी नाव पंचायतीच्या बोर्डावर लागू दे की; फलटणला इच्छुकांतून आळवला जातोय सूर
Updated on

फलटण शहर (जि. सातारा) : फलटण तालुक्‍यात 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर होताच अनेकांच्या इच्छा-आकांक्षा उचंबळून आल्या आहेत. निवडणूक लढविण्यासाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. तेव्हा "आमचं बी नाव पंचायतीच्या बोर्डावर लागू दे की' असा सूर इच्छुकांमधून आळवला जाऊ लागला आहे. 

तालुक्‍यात 80 ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ग्रामपंचायतीमध्ये सदस्य, उपसरपंच व सरपंचपदासाठी अनेक जण इच्छुक असून, त्यांनी काहीही होवो; पण ही निवडणूक लढवायचीच असा चंग बांधला आहे. गावचा कारभार हाकण्यास आपण कसे "लायक' आहोत, हे दर्शविण्यासाठी अनेकांनी सोशल मीडियावर आपल्या "चेल्या- चपाट्यांना' कामाला लावले आहे. गावोगावी गाव पुढाऱ्यांच्या बैठकाही झडू लागल्या आहेत. या बैठकांत "आमचं बी नाव पंचायतीच्या बोर्डावर लागू द्या की!' अशी आर्जवे केली जात आहेत. जर संधी दिली नाही तर निवडणूक लढवूच, असा निर्धारही अनेकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीत जाण्यासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेल्या अनेक इच्छुकांची समजूत काढताना गावपुढाऱ्यांच्या नाकीनऊ येणार आहे. ग्रामपंचायतीत वर्षानुवर्षे ठिया मांडून बसलेल्यांना आता थांबवा व नव्यांना संधी द्या, अशीही बऱ्याच ठिकाणी मागणी होत असताना दिसून येत आहे. त्यामुळे डावलले गेलेल्या इच्छुकांच्या नाराजीचा फटका बसणार नाही याची खबरदारी निवडणूक लढविणाऱ्यांसह गाव पुढाऱ्यांनाही घ्यावी लागणार आहे. 

या निवडणुकीमध्ये तरुणाईलाही सत्तेची खुर्ची खुणावत आहे. त्यामुळे अनेक गावांत आता "तरुणांना संधी द्या व ज्येष्ठांनी मार्गदर्शक व्हा' अशी परखड भूमिका अनेक युवकांनी घेतली आहे. जर युवा शक्तीला विचारात घेणार नसाल. तर विरोधात उतरू, असा इशाराही दिला जात आहे. यामुळे जर गावोगावी युवा पिढी एक झाली, तर अनेक प्रस्थापितांना घरचा रस्ता धरावा लागण्याची शक्‍यता नाकारता येणार नाही. त्यामुळे गाव पुढाऱ्यांनाही आपल्या राजकीय चालींमध्ये युवा पिढीस विश्वासात घ्यावे लागणार आहे. गावागावांत जे कृतिशील व क्रियाशील कार्यकर्ते आहेत त्यांनीही आजवर आम्ही प्रामाणिकपणे काम केले आहे, तेव्हा आमची दखल घेतली जाणार आहे की नाही? का आम्ही नुसत्या संतरंजा उचलायच्या असा रोखठोक सवाल अशा कार्यकर्त्यांमधून विचारला जात आहे. 

इच्छुकांची "तारेवरची कसरत' 

ग्रामपंचायतीत सदस्यांच्या एकूण जागा, निवडणूक लढविण्यास इच्छुकांची मांदियाळी, कोण कोणास आपल्यासाठी माघार घेण्याची मनधरणी करावयास गेले तर "आमचं बी नाव पंचायतीच्या बोर्डावर लागू दे की!' असे ऐकावे लागत आहे. त्यामुळे या निवडणुकामध्ये ग्रामपंचायतीत आपली सत्ता प्रस्थापित करण्यासाठी व निवडून येण्यासाठी इच्छुकांना "तारेवरची कसरत' करावी लागणार असल्याचे आजतरी दिसून येत आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.