कोरेगाव : कृषिपंपासाठी दिवसा आठ तास अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी करणारा ठराव पंचायत समितीच्या सभेने केला आहे. प्रभारी सभापती संजय साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेस सदस्य राजाभाऊ जगदाळे, अण्णासाहेब निकम, साधना बनकर, शीला झांजुर्णे, सुप्रिया सावंत, मंगल गंगावणे, शुभांगी काकडे, मालोजी भोसले, गटविकास अधिकारी क्रांती बोराटे, तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
प्रारंभी भारतरत्न (कै.) लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभेत विविध विभागांचा आढावा संबंधित विभाग प्रमुखांनी सादर केला. त्यात स्वच्छ भारत अभियान, कुपोषण निर्मूलन कार्यक्रम, महिला व पुरुष जन्मदर, सर्वांगीण शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम, १५ वा वित्त आयोग, पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमांसह विविध योजनांचा समावेश आहे. शासनाकडील व जिल्हा परिषदेकडील परिपत्रकांचे सभेने अवलोकन केले.
पंचायत समिती सेसमधील विविध विभागांच्या योजनांच्या लाभार्थी यादीस, तसेच पंचायत समितीच्या सन २०२१-२०२२ च्या सुधारित व सन २०२२-२०२३ च्या मूळ अंदाजपत्रकास सभेने मंजुरी दिली. तालुक्यातील १४२ ग्रामपंचायतींच्या अंदाजपत्रकेही सभेने मंजूर केली. शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी अनियमित वीजपुरवठा होत आहे. परिणामी शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे कृषी पंपासाठी दररोज किमान आठ तास दिवसा अखंडित वीजपुरवठा करावा, अशी सर्वानुमते मागणी ठरावाद्वारे सभेने केली. राज्यातील पद्मविभूषण, पद्मभूषण, पद्मश्री सन्मान विजेत्यांचे सभेत अभिनंदन करण्यात आले. त्यामध्ये सोनू निगम, अनिल राजवंशी, डॉ. हिम्मतराव बावस्कर, सुलोचना चव्हाण, प्रभा अत्रे, सायरस पूनावाला, डॉ. भीमसेन सिंघल, डॉ. बालाजी तांबे, नटराजन चंद्रशेखरन, डॉ. विजयकुमार डोंगरे यांचा समावेश आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.