पर्यटनाचा आनंद लुटा; पण जरा जपून

वन विभागाचे आवाहन; सातारा, जावळीतील धबधबे लागले ओसंडू
Enjoy rainy season tourism carefully Forest Department appeals to tourists
Enjoy rainy season tourism carefully Forest Department appeals to tourists
Updated on

सातारा - गेल्‍या काही दिवसांपासून सुरू असलेल्‍या मुसळधार पावसामुळे सातारा, जावळी तालुक्‍यांतील धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. तेथे निसर्ग सौदर्यांचा आनंद लुटण्‍याबरोबरच पर्यटनासाठी येणाऱ्या नागरिकांच्‍या संख्‍येत वाढ होत आहे. सेल्‍फी काढताना तसेच उत्‍साहाच्‍या भरात एखादी अप्रिय घटना घडू नये, यासाठी वन विभाग सतर्क आहे. वन विभागाने पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटा... पण जरा जपून, असे आवाहन पर्यटकांना केले आहे.

गेल्‍या आठ दिवसांपासून सातारा तालुक्‍यासह जिल्‍ह्याच्‍या पश्‍चिम भागात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा वाढीस लागला आहे. संततधार पाऊस, दाट धुके, बोचणारी थंडीचा आनंद लुटण्‍यासाठी शेकडो सातारकरांची पावले नंतरच्‍या काळात कास पठार, तलाव परिसरासह ठोसेघर व अन्य भागाकडे वळतात.

सद्य:‍स्‍थितीत सातारा तालुक्‍यातील ठोसेघर, भांबवली धबधबा सततच्‍या पावसामुळे पूर्ण क्षमतेने वाहण्‍यास सुरुवात झाली आहे. याचबरोबरच केळवली-सांडवली, एकीव धबधबाही गेल्‍या चार दिवसांपासून पूर्ण क्षमतेने वाहत आहे. धबधबा पाहण्‍यासाठी तसेच पावसाळी वातावरणाचा आनंद लुटण्‍यासाठी दररोज शेकडो पर्यटक त्‍याठिकाणी गर्दी करतात. त्यात युवक-युवतींची संख्‍या सर्वाधिक आहे.

धबधबा पाहता यावा, यासाठी धबधबा परिसरात सुरक्षित पॉइंटस उभारले आहेत. मात्र, काही अतिउत्‍साही पर्यटक त्‍याठिकाणी उभारलेले बॅरिकेटस ओलांडून धबधब्‍याजवळ तसेच पात्रात सेल्‍फी काढण्‍यासाठी जात असल्‍याचे दिसून येते. पाण्‍याचा प्रचंड वेग असल्‍यामुळे, वाटा घसरड्या असल्‍याने तसेच पावसाचा जोर अधूनमधून अचानक वाढत असल्‍याने पात्रात जाणाऱ्या पर्यटकांच्‍या जिवास धोका निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे.

धबधबा परिसरात अप्रिय घटना होऊ नये, यासाठी वन विभागाने याठिकाणी जास्‍तीचे कर्मचारी नेमले असून आवश्‍‍यक त्‍याठिकाणी स्‍थानिकांची मदत घेण्‍यात येत आहे. येणाऱ्या पर्यटकांना आवश्‍‍यक त्‍या सूचना करण्‍याबरोबरच त्‍याठिकाणची शांतता धोक्‍यात येऊ नये, यासाठी हुल्‍लडबाजांवरही वन कर्मचाऱ्यांनी लक्ष ठेवण्‍यास सुरुवात केली आहे.

ठोसेघर, भांबवली, एकीवसह केळवली-सांडवली धबधबे पूर्ण क्षमेतेने वाहू लागले आहेत. याठिकाणचे निसर्गसौंदर्य पाहण्‍यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे. त्‍यांना सुरक्षिततेबाबत सूचना देण्‍यात येत असल्‍या, तरी अनेकांकडून त्‍या पाळण्‍यात येत नसल्‍याचे दिसून आले आहे. निसर्गाविरोधात केलेली कृती जीव धोक्‍यात आणू शकते. यामुळे पर्यटकांनी सुरक्षित राहून पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटावा.

- डॉ. निवृत्ती चव्‍हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, सातारा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.