आसू (सातारा) : गारपीरवाडी (ता. फलटण) येथील युवक शेतकरी नवनाथ जाधव (Farmer Navnath Jadhav) यांना भेंडी पिकाच्या पहिल्या तोड्यात दराअभावी फारसे उत्पन्न मिळाले नाही. मात्र, खचून न जाता त्यांनी पुढे शक्कल लढवत आगळावेगळा प्रयोग केला. त्यांनी भेंडी पीक खोडवा घेत त्यातून सुमारे सव्वालाखाचे उत्पन्न घेतले. भेंडी पिकाचा (Okra Crop) खोडवा घेता येतो, हे त्यांनी सिध्द करून दाखवले आहे.
शेतकरी नवनाथ जाधव यांनी आपल्यादहा गुंठे शेतात फेब्रुवारी महिन्यात एक किलो भेंडीची लागवड केली.
श्री. जाधव यांनी आपल्या केवळ दहा गुंठे शेतात फेब्रुवारी महिन्यात नेत्रा सीडसच्या महाराजा जातीच्या एक किलो भेंडीची लागवड केली. साधारणपणे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात त्यांची भेंडी तोडणीला आली. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन होते. मात्र, शेती उत्पादनांची निर्यात सुरू असल्याने त्यांना सुरवातीला महिनाभर चांगला भाव मिळाला. त्यानंतर शेती उत्पादनांच्या निर्यातीवरही बंदी आली. त्यामुळे सर्वच तरकारी उत्पादक शेतकऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली. त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत भेंडीसह अन्य पिकांचे दर कोसळले. अशा स्थितीत अनेक शेतकऱ्यांनी दराअभावी आपल्या भेंडी पिकात ट्रॅक्टर फिरवून पीक मोडून टाकले. त्यात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यास श्री. जाधवही अपवाद नव्हते. मात्र, श्री. जाधव यांनी न डगमगता आपले भेंडी पीक न मोडता पुढे जात जवळपास ६५ ते ७० तोडे करून पाच टन इतके विक्रमी उत्पादन घेतले. मात्र, दराअभावी त्यांनाही फारसा फायदा झाला नाही.
अशा स्थितीत श्री. जाधव यांनी नुकसान भरून काढण्यासाठी नामी शक्कल लढवत चक्क भेंडी पिकाचा खोडवा घेण्याचा निश्चय केला. यापूर्वी असा कोणीही प्रयोग केला नाही. मात्र, त्यांनी गेल्या वर्षीही खोडवा घेण्याचा अल्पसा प्रयत्न केला होता. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी यावेळेसही पहिल्या तोड्यानंतर मोठ्या जोमाने खोडवा घेण्याचा प्रयत्न केला. साधारणपणे जुलैमध्ये त्यांनी आपल्या दोन भेंडी पिकात एक फूट अंतर ठेऊन छाटणी करण्यास सुरवात केली. त्यानंतर जोमाने मशागत करून पुन्हा त्यांची भेंडी ४० दिवसांत तोडणीला आली. सद्य:स्थितीत दहा तोडे झाले आहेत. आणखी सुमारे ४० ते ५० तोडे होऊन तीन टन उत्पन्न मिळेल, असा त्यांचा विश्वास आहे. सरासरी २० रुपये प्रतिकिलो भाव मिळेल असे ते सांगतात. एकंदरीत आठ महिन्यांत एकूण आठ टन भेंडीच्या उत्पादनातून सुमारे सव्वालाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळेल, असे ते आत्मविश्वासपूर्वक सांगतात.
वडील पोपट जाधवांची मोलाची साथ
श्री. जाधव हे गेल्या वर्षापासून भेंडी पिकाचा खोडवा घेण्याचा अनोखा प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये ते यशस्वी ठरल्याने परिसरातील अन्य शेतकऱ्यांनी त्यांचे विशेष कौतुक केले. यासाठी त्यांना त्यांचे वडील पोपट जाधव यांची मोलाची साथ लाभली. तसेच त्यांना भेंडी निर्यातीसाठी श्रीदत्त व्हेजिटेबल ट्रान्स्पोर्टचे मालक किरण शेंडगे आणि नेत्रा कंपनीचे अधिकारी ऋषीकेश कदम आणि सागर गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.