रेठरे बुद्रुक : पशुखाद्य तयार करण्यासाठीच्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यातच पेट्रोल, डिझेलच्या किमती वाढल्याने पशुखाद्य वाहतूकही महागली आहे. त्यामुळे कंपन्यांनी खाद्याच्या पोत्यांची दरवाढ केली आहे. त्यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. पशुखाद्याच्या तुलनेत दुधाला दर कमी मिळत असल्याने उत्पादन खर्च व उत्पन्नाचा ताळमेळ बसेना झाला आहे. दूध व्यवसायातील तोट्यामुळे शेतकरी जेरीस आला आहे. व्यवसायातील आर्थिक गणित सुलभ राहण्यासाठी दूध खरेदी दर वाढण्याची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.
शेतीपूरक दुग्ध व्यवसाय करणारा शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. संकरित गाई पालन करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. व्यवसाय चिकाटी व सचोटीने केल्यास त्यातून चांगलेच अर्थाजन होते. मात्र, दुसऱ्या बाजूला दूध दराचा प्रश्न कठीण झाल्याने व्यवसायाची घडी बसवताना तितक्या अडचणी पेलत शेतकरी टिकून आहे. गाईच्या ३.५ फॅट दुधाला २५ ते २७ रुपये दर मिळतो.
दूध दराचे हे धोरण पाच वर्षांपासून जैसे थे आहे. दूध दर वाढीसाठी आंदोलने झाली आहेत. मात्र, शासन या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने हा व्यवसाय अडचणीत आला आहे. पशुखाद्य निर्मितीसाठी लागणारी कपाशी, मका व सोयाबीनची गेल्या दोन वर्षांत उत्पादकता घटल्याने कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे पशुखाद्याचे दर दीड ते दोन पटीने वाढवले आहेत. उसाला दर जादा मिळत असल्याने चाऱ्यासाठी ऊस उपलब्ध होईनासा झाला आहे. वीस ऊस वाड्याच्या पंचवीस पेंढ्या शंभर रुपयाला व कडब्याची एक पेंडी २५ रुपयास मिळते. दहा लिटर दूध देणाऱ्या गाईस तिच्या वजनाच्या तुलनेत सरासरी तीस किलो ओला, सुका चारा आणि पशुखाद्य द्यावे लागते. त्याचे २२० रुपये होतात. दहा लिटर दूध उत्पादनातून सरासरी २५० रुपये मिळतात. तीस रुपये शिल्लक रकमेतून मजुरी, लाईट बिल, औषधे, बँकेच्या कर्जाचा हप्ता भागवायचा कसा, या गुंत्यामुळे या व्यवसायापासून शेतकरी दुरावत चालला आहे.
दररोज २० लिटरच्या पुढे दूध देणारी गार्इ असेल, तरच नफा शिल्लक राहतो. पशुखाद्याचे दर भरमसाट वाढले आहेत. त्यातुलनेत दूध दर वाढलेला नाही. प्रति लिटर ३० ते ३२ रुपये दर मिळाला तरच हा शेतीपूरक व्यवसायात तग धरू शकेल.
- महेश जगताप, पशुपालक, वडगाव हवेली
पशुखाद्याचे सध्याचे दर...
सरकी पेंड (४० किलो) १६०० ते १७०० रुपये
गोळी पेंड (५० किलो) १४८० ते १५५० रुपये
गहू भुस्सा (४५ किलो) ८३० ते ८५० रुपये
मिनरल (पाच किलो) ६५० ते ८०० रुपये
कॅल्शियम (पाच लिटर) ७०० ते ८०० रुपये
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.