कारखान्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सोमय्या हे माध्यमांद्वारे कारखाना बंद पाडण्याची भाषा करत आहेत.
कोरेगाव (सातारा) : जरंडेश्वर कारखान्यावर (Jarandeshwar Sugar Factory) अवलंबून असलेल्या शेतकरी (Farmers) व कामगारांचा संसार राजकीय द्वेषापोटी उद्ध्वस्त करू पाहात असलेले किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर कारवाई करून त्यांचे राजकारण बंद करावे अन्यथा, सामूहिक आत्मदहन करू, असा इशारा चिमणगाव, कुमठे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी दिला आहे.
यासंदर्भात नवनाथ गायकवाड, जितेंद्र जगदाळे, रवींद्र चव्हाण, अनिल चव्हाण, अरीफ मुलाणी, कैलास साळुंखे, अक्षय साळुंखे, राजेंद्र जाधव, नारायण यादव यांनी शेतकरी, कामगारांच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की किरीट सोमय्या हे राजकीय द्वेषापोटी जरंडेश्वर कारखान्यावर येत आहेत. या कारखान्याने हजारो हेक्टर ऊस गाळपास आणून एफआरपीप्रमाणे, तर कधी त्याहीपेक्षा अधिक दर दिला आहे. आसपासच्या गावांना ‘सीएसआर’मधून मदत करत आहेत. पूर्वी अडीच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असताना ऊस गाळपास घालवण्यासाठी शेतकरी हवालदिल होत असत. या पार्श्वभूमीवर सध्याच्या व्यवस्थापनाने नियोजनबद्ध विस्तारीकरण केल्याने कोरेगावसह लगतच्या चार- पाच तालुक्यांना फायदा झाला आहे.
ऊसबिलाची रक्कम कोणताही गाजावाजा न करता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाते. ऊसतोडणीबाबत कधीही राजकारण केले नाही. उसाला योग्य भाव, अचूक वजन काटे, वेळेचे नियोजन करून ऊसतोडणी, ऊस विकास योजना राबवण्यात येत असल्याने शेतकरी, कामगार, तोडणी यंत्रणा, वाहतूक कंत्राटदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. असे असताना, तसेच कारखान्यासंदर्भात न्यायालयीन प्रक्रिया सुरू असताना सोमय्या हे माध्यमांद्वारे कारखान्यावर येण्याची आणि कारखाना बंद पाडण्याची भाषा करत आहेत. राजकारण करणाऱ्यांनी ते करावे; परंतु शेतकरी व कामगारांची अर्थवाहिनी बंद पाडून राजकारण करणाऱ्या सोमय्या यांना आम्ही त्यांची जागा दाखवू. आम्ही बँकांचे कर्ज काढून उभा केलेला ऊस वेळेत गाळपासाठी घालवणे आणि योग्य दर मिळणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अन्यथा, आम्हाला आत्महत्येशिवाय पर्याय नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.